Pension च्या पैशासाठी मुलानं आईचा मृतदेह वर्षभर ममीसारखा तळघरात ठेवला

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आईच्या मृत्यूनंतरही पेन्शची रक्कम मिळत राहावी म्हणून एका व्यक्तीनं चक्क आईचा मृतदेह वर्षभर ममीसारखा बेसमेंटमध्ये (तळघर) ठेवल्याचा प्रकार ऑस्ट्रियात घडला आहे. ऑस्ट्रियाच्या पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

स्मृतीभ्रंशाचा त्रास असलेल्या या 89 वर्षीय महिलेचा सुमारे वर्षभरापूर्वीच म्हणजे गेल्यावर्षी जूनमध्ये नैसर्गिक मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या महिलेच्या 66 वर्षीय मुलानं आईचा मृतदेह तळघरात ठेवला होता अशी माहिती दिली. तसंच, मृतदेहाची दुर्गंधी पसरू नये म्हणून बर्फ आणि बँडेजचा वापर केल्याचंही त्यानं सांगितलं.

त्याने बेकायदेशीररित्या जवळपास 50 हजार युरो (43 लाख रुपयांपेक्षा अधिक) एवढी रक्कम अशाप्रकारे पेन्शनद्वारे मिळवली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ऑस्ट्रियातील वेस्टर्न टायरॉल भागात नवीन पोस्टमनमुळं हा प्रकार उघडकीस आला. या पोस्टमननं महिलेला मिळणारे लाभ तिला भेटून तिलाच देणार असल्याचं म्हटलं. त्यानंतर हे प्रकरण समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

या प्रकारानंतर चौकशी झाली आणि ही धक्कादायक अशी घटना समोर आली.

या व्यक्तीनं मांजरींच्या बसण्यासाठी किंवा बिछाण्यासाठी, वापरल्या जाणाऱ्या भुशासारख्या साहित्याचा वापरही आईचा मृतदेह झाकण्यासाठी केला होता. मृतदेहाला जणू ममीसारखं ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती पोलिस अधिकारी हेल्मथ गफलर यांनी ऑस्ट्रियातील ORF या सरकारी वाहिनीला दिली. तसंच या व्यक्तीनं कबुली दिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

या व्यक्तीकडं उत्पन्नाचं दुसरं कोणतंही साधन नव्हतं. त्यानं जर महिलेच्या मृत्यूची माहिती दिली असती, तर त्याला मिळणारे पैसे लगेचच थांबले असते. तसं झालं असतं तर आईचा अंत्यसंस्कार किंवा एखाद्याबरोबर मिळून घर भाड्यानं घेणंही त्याला शक्य झालं नसतं, असं गफलर म्हणाले.

संशयित आरोपीनं भावालाही त्यांच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगितलं होतं. आई कोणालाही ओळखत नाही, त्यामुळं त्यांना भेटण्यात काहीही अर्थ नाही असंही त्यांनी सांगितल्याचं ORF च्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)