तालिबानसमोर पंजशीरचे योद्धे कशाच्या आधारे टिकून राहिले आहेत?

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

तालिबाननं अफगाणिस्तानवर वेगानं वर्चस्व मिळवलं. सरकार स्थापनेच्या दृष्टीनेही तालिबाननं पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. मात्र, तरीही त्यांच्यासमोर एक अडचण आहेच, ती म्हणजे 'पंजशीर खोरं'.

अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या ईशान्येकडील पंजशीर खोऱ्यातील राष्ट्रीय प्रतिरोध मोर्चाचे योद्धे तालिबानसमोर आव्हान बनून उभे आहेत. चहूबाजूंनी तालिबानने घेरलेले असूनही हे योद्घे हार मानायला तयार नाहीत.

तालिबानचे वरिष्ठ नेते आमिर खान मोतकी यांनी पंजशीर खोऱ्यात राहणाऱ्या योद्धांना आपली शस्त्र खाली ठेवण्याचं आवाहन केलंय. मात्र, या आवाहनला पंजशीर खोऱ्यातून काहीच प्रतिसाद देण्यात आला नाहीय.

वेगवेगळ्या वृत्तांनुसार, 15 ऑगस्टला काबुलवर तालिबानच्या ताब्यानंतर आतापर्यंत पंजशीर खोऱ्याच्या सीमांवर झालेल्या संघर्षात तालिबानचे डझनभर तरी लोक मारले गेलेत आणि संघर्ष अद्यापही सुरूच आहे.

पंजशीरमध्ये नेमकं काय सुरू आहे आणि तालिबानला त्यामुळे का चिंता वाटायला हवीय, याचा हा आढावा.

कोण आहेत हे योद्धे?

अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील हे खोरं राष्ट्रीय प्रतिरोध मोर्चा (NRF) च्या योद्ध्यांचं घर बनलंय. अनेक समूह-गटांशी जोडलेले हे लोक अफगाण सुरक्षा दलाचे माजी सदस्य आहेत. यांची संख्या हजारोंच्या संख्येत आहे. याच आठवड्यात जारी झालेले त्यांचं सुसंघटन, आधुनिक शस्त्रास्त्र आणि उत्तम प्रशिक्षणाची साक्ष देतात.

अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह सुद्धा NRF मध्ये सहभागी झाले. मात्र, या योद्ध्यांचा नेता 'पंजशीरचा वाघ' म्हटलं जाणाऱ्या अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूद आहे.

अहमद शाह यांनी 1980 च्या दशकात सेव्हिएत युनियनच्या आक्रमणाला रोखलं होतंच. मात्र, 1990 च्या दशकात तालिबानलाही पंजशीरपासून दूर ठेवलं होतं.

11 सप्टेंबर 2001 च्या घटनेच्या दोनच दिवासंनी अहमद शाह यांची हत्या करण्यात आली होती.

अहमद शाह यांचा 32 वर्षीय मुलगा अहमद मसूदही आता तीच गोष्ट करताना दिसतोय. त्यानेही पंजशीर खोऱ्यात तालिबानला पाय ठेवण्यापासून रोखलंय.

अहमद मसूद लंडनच्या किंग्ज कॉलेज आणि सँडहर्स्ट मिलिट्री अॅकॅडेमीचा पदवीधर आहे.

अहमद मसूद केवळ अफगाणवासियांकडूनच मदतीची अपेक्षा ठेवून नाहीय, तर इतर देशांमधूनही मदतीसाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला त्याची फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशीही चर्चा झाली होती

सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत मसूदने तालिबानबाबत म्हटलं की, तालिबान बदललं नाहीय.

मसूद पुढे म्हणाला, "मी आणि माझे योद्धे मानतो की, जात आणि लिंगाची पर्वा न करता, सर्व नागरिकांनी लोकशाही, हक्क आणि स्वातंत्र्य वाचवण्याची गरज आहे."

तालिबानला काय हवंय?

तालिबानने म्हटलंय की, अफगाणिस्तानचा इस्लामिक अमिरात सर्व अफगाणांचं घर आहे.

मात्र, पंजशीर खोऱ्यातला विरोधाचा आवाज तालिबानच्या आवाहनाला छेद देणारा ठरतोय. सोशल मीडियावरही पंजशीर खोऱ्यातल्या योद्ध्यांना समर्थन मिळताना दिसतोय.

तालिबान आणि एनआरएफ चर्चाही करतंय. मात्र, दोन्ही बाजूकडील लोक संघर्ष टाळू इच्छित आहेत, मात्र तरीही कुठलाच मार्ग निघताना दिसत नाहीय. या चर्चेनं उलट लढाईचा मार्ग प्रशस्त केल्याचंच दिसून येतंय.

तालिबानचं म्हणणं आहे की, शेकडो योद्धे पंजशीरच्या दिशेनं पाठवले, मात्र पंजशीर तयार नाहीय.

AFP वृत्तसेवा संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, पंजशीर खोऱ्याच्या सीमेवर पोहोचणाऱ्या तालिबान योद्ध्यांचं स्वागत मशीनगन, मोर्टार आणि वाळूच्या पिशव्यांनी बांधलेल्या चौक्यांनी केलं जाईल.

दोन्ही बाजूंनी दावा केला जातोय की, आम्ही आमच्या विरोधकांवर मात केली. या संघर्षात जीव गेलेल्यांची संख्या सांगणं कठीण आहे. पंजशीर खोऱ्यातील काही भागावर ताबा मिळवल्याचा तालिबानचा दावा NRF ने फेटाळलाय.

वृत्तानुसार, तालिबान पंजशीर खोऱ्यातील सप्लाय लाईन कापण्याच्या प्रयत्नात आहे. जेणेकरून NRF चे योद्धे विरोध करणं सोडून देतील.

पंजशीर खोरं कसं आहे?

अफगाणिस्तानातील छोट्या प्रांतातील एक पंजशीर खोरं आहे. दीड ते दोन लाख लोक या भागात राहतात.

या खोऱ्याच्या मधोमध पंजशीर नदी वाहते आणि हा परिसर चहूबाजूंनी 9 हजार 800 फूट उंच पर्वतरांगांनी वेढलेला आहे.

शांततेच्या काळात या भागात येणारे लोक हे रमणीय, विहंगम दृश्य पाहून मंत्रमुग्ध होतात.

या परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये सर्वात मोठा समूह ताजिक समूहाचा आहे. बाहेरील आक्रमणांशी लढण्यामुळे या भागातील लोकांना प्रतिष्ठा मिळत गेली.

ऐतिहासिक संदर्भ सांगायचे झाल्यास या भागात हिरे-रत्न आणि खाणींसाठी हे खोरं प्रसिद्ध आहे. गेल्या दोन दशकात या भागात विशेष गुंतवणूक झालीय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)