कोरोनाच्या काळात वाढली जगभरातल्या श्रीमंतांची संख्या

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

जगभरातले 50 लाखांपेक्षा जास्त लोक 2020 च्या वर्षात कोव्हिड 19ची जागतिक साथ आणि त्यामुळे आर्थिक नुकसान होऊनही श्रीमंत झालेयत.

एकीकडे जगातले अनेक गरीब आणखीन गरिबीत ढकलले गेलेयत, तर दुसरीकडे जगातल्या दशलक्षाधीशांची संख्या 52 लाखांनी वाढून एकूण 5.61 कोटी झाल्याचं क्रेडिट सुईस रिसर्चने म्हटलंय.

2020 या वर्षामध्ये जगभरातल्या सज्ञानांपैकी 1 टक्क्यांपेक्षा जास्त लोक हे पहिल्यांदाच दशलक्षाधीश झाले.

सावरणारे शेअर बाजार आणि घरांच्या वाढलेल्या किंमतींमुळे अनेकांच्या संपत्तीत वाढ झाली.

कमी झालेले व्याजदर आणि सरकारांनी आणलेल्या मदत योजनांमुळे सार्वजनिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पैसा लोकांकडे आल्याचं या अहवालात म्हटलंय.

यामुळे घरगुती बचतीमध्ये वाढ झाली, परिणामी वैयक्तिक कर्जाचं प्रमाण एरवीपेक्षा कमी झालं.

3 कोटी डॉलर्सपेक्षा जास्तीची गुंतवणूक क्षमता असणाऱ्या अति-श्रीमंत व्यक्तींची संख्या 2020मध्ये जगभरात 24 टक्क्यांनी वाढली. 2003 पासूनची ही सर्वात मोठी वाढ आहे.

गुंतवणूक करण्याजोगी संपत्ती आणि राहत्या घरांसारखी इतर मालमत्ता यांची मोजदाद करण्यात आल्याने जगभरातला हा दशलक्षाधीशांचा आकडा इतर संस्थांपेक्षा जास्त असल्याचं क्रेडिट सुईसने म्हटलंय.

याविषयी बोलताना ग्लोबल वेल्थ रिपोर्टचे संशोधक आणि अर्थतज्ज्ञ अँथनी शोरॉक्स यांनी सांगितलं, "जागतिक साथीचा जगभरातल्या शेअर बाजारांवर लहान कालावधीसाठी मोठा परिणाम झाला, पण जून 2020 पर्यंत परिस्थिती सुधारली."

"जगभरातली संपत्ती या उलाढालीच्या काळामध्ये नुसती टिकूनच राहिली नाही तर वर्षाच्या उत्तरार्धात झपाट्याने वाढली," ते सांगतात.

पण याच 2020 च्या वर्षामध्ये जगभरातल्या सज्ञान व्यक्तींकडे असलेल्या संपत्तीमधली तफावत वाढली.

अँथनी शोरॉक्स सांगतात, "कमी संपत्ती असलेल्या ज्या गटाकडे आर्थिक मालमत्ता कमी असते, त्यांची संपत्ती आहे तशीच राहिली वा काही प्रकरणांमध्ये ही संपत्ती कमी झाली.

"यामधल्या काही गोष्टी पुढच्या काही काळात बदलतील. उदा. एका टप्प्यावर व्याजदर पुन्हा वाढायला लागतील, आणि याचा परिणाम मालमत्तांच्या मूल्यावर होईल."

या काळात जगभरातल्या संपत्तीत 7.4% वाढ झाल्याचं अहवाल सांगतो.

10 हजार ते 1 लाख डॉलर्सची मालमत्ता असण्यांची संख्या 2000 साली 50.7 कोटी होती. 2020च्या मध्यात ही संख्या वाढून 1.7 अब्ज झाली.

'जगभरातल्या चीनसारख्या उदयाला येणाऱ्या अर्थव्यवस्थांची भरभराट आणि विकसनशील देशांमध्ये मध्यमवर्गाची संख्या वाढत असल्याचं' या वाढलेल्या संपत्तीवरून दिसत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.

क्रेडिट सुईसच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी नॅनेट हेखलर - फेयडहर्ब सांगतात, "सरकारांनी आणि मध्यवर्ती बँकांनी लोक आणि उद्योगांना या जागतिक साथीच्या बिकट काळात मदत करण्यासाठी उचललेली पावलं आणि कमी केलेले व्याजदर यामुळे जगभरातल्या आर्थिक अडचणी भीषण होणं टळलं."

"मध्यवर्ती बँकांनी व्याजदर कमी केल्याचा कदाचित सगळ्यात जास्त परिणाम झाला. शेअर्सच्या आणि घरांच्या किंमती म्हणूनच वाढल्या आणि याचा परिणाम म्हणून घरगुती मालमत्तेचं मूल्य वाढलं, पण यासगळ्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली," त्या सांगतात.

"जगभरातल्या अनेक देशांमध्ये जीडीपीशी निगडीत सार्वजनिक कर्जांमध्ये 20 टक्यांपेक्षा जास्त वाढ झाली. पण लोकांना देण्यात आलेल्या मदतीमुळे लोकांकडचं उत्पन्न तुलनेने स्थिर राहिलं किंवा काही देशांमध्ये वाढलं देखील."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)