You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तान : हिंदू मंदिराची रावळपिंडीमध्ये अज्ञातांकडून नासधूस
- Author, शुमाइला जाफरी
- Role, बीबीसी प्रतिनिधी, इस्लामाबाद
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
पाकिस्तानमधील रावळपिंडीतल्या जुन्या किल्ल्यामध्ये असलेल्या पुरातन हिंदू मंदिराची शनिवारी (28 मार्च) पहाटे नासधूस करण्यात आली. इस्लामाबादमधल्या बणी गाला पोलिस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात याबद्दलचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं.
ईश्वर निंदा, दंगल घडवणं आणि बेकायदेशीरित्या जमा होणं यासाठीच्या पाकिस्तानातल्या दंड संहितेच्या कलमांखाली हे गुन्हे दाखल करण्यात आली आहे.
या मंदिराच्या ठिकाणी 24 मार्चपासून दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं होतं आणि त्यासाठी या ऐतिहासिक देवळाच्या समोर असणारी काही अतिक्रमणं काढून टाकण्यात आली होती, असं FIR मध्ये म्हटलंय.
रविवारच्या दिवशी मंदिराची दुरुस्ती करणारे कामगार सुटीवर होते. संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास 10-15 जण या परिसरात शिरले आणि त्यांनी या इमारतीत तोडफोड केली. त्यांनी या वास्तूचा दरवाजा मोडला, पायऱ्यांची नासधूस केली आणि मंदिराचंही नुकसान केलं.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहराचे पोलिस प्रमुख घटनास्थळी मोठ्या पोलीस ताफ्यासह दाखल झाले. पोलिसांतल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या देवळाच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्याने ते सध्या बंद होतं. त्यामुळे तिथे देवतांच्या मूर्ती वा कोणतेही पवित्र ग्रंथ नव्हते.
पाकिस्तानमधल्या इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (Evacuee Trust Property board) चे सहाय्यक सुरक्षा अधिकारी सय्यद रझा अब्बास यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी FIR दाखल केली आहे. पाकिस्तानातलं इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड हे फाळणीनंतर भारतात गेलेल्यांच्या आणि अल्पसंख्याकांच्या पाकिस्तानातल्या शैक्षणिक, धार्मिक आणि धर्मादाय संस्था आणि मालमत्तेची देखरेख करतं.
या देवळासमोरची अतिक्रमणं काढून टाकल्यानंतर स्थानिक प्रशासनाने दुरुस्तीसाठी देवळाचा ताबा ETPB ला दिला होता. या घटनेमागे हात असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि या परिसराला सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी अब्बास यांनी केली आहे.
हे देऊळ दर्शनासाठी सुरू नसलं तरी इथली अतिक्रमणं काढून देवळाचं हस्तांतरण केल्यानंतर 25 मार्चला काही लोकांनी इथे जमत उत्सव साजरा केला होता. 74 वर्षांनंतर देवळाचा जीर्णोद्धार होत असल्याचा आनंद इथला समाजाने व्यक्त केला होता. फाळणीपासून हे देऊळ वापरात नव्हतं.
अतिक्रमण करणाऱ्यांनी या परिसरात कपडे बाजार सुरू केला होता आणि मंदिर परिसराच्या भिंतीच्या आता आणि देवळाच्या प्रवेशद्वाराशी दुकानं उभी केली होती. रावळपिंडीमधल्या जुन्या शहर भागामध्ये सध्या अनेक पुरातन बांधकामांची दुरुस्ती सुरू आहे. यातल्या सुझन सिंह हवेलीच्या एक किलोमीटर परिसरातल्या 7 लहान देवळांचा जीर्णोद्धारही यामध्ये करण्यात येतोय. 'पुराना किला' मंदिरही यापैकीच एक आहे.
पाकिस्तानात यापूर्वी घडलेल्या घटना
डिसेंबर 2020मध्ये खैबर पखतुख्वा प्रांतातल्या कारक जिल्ह्यामध्ये जमावाने एका हिंदू समाधीवर हल्ला केला होता.
या घटनेची पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने स्वतःहून दखल घेत (Suo Moto) दोन आठवड्या समाधी पुन्हा उभारण्याचे आदेश दिले होते. यामध्ये सहभागी असणाऱ्या एका मौलवींसह जमावातल्या लोकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर खैबर पखतुख्वा प्रशासनाने समाधी पुन्हा उभारण्याचं घोषित केलं आणि कारकमधली परिस्थिती सुधारण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम स्थानिकांमध्ये - जर्गा (Jirga) म्हणजेच बैठक पार पडली होती.
देशातल्या अल्पसंख्यांकांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध असल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी वेळोवेळी बोलून दाखवलंय.
देशाच्या घटनेनुसार हिंदूंना नागरिक म्हणून समान हक्क असून हिंसाचाराच्या काही घटना घडत असल्या तरी पाकिस्तानमधलं प्रशासन आणि सरकार हिंदूंच्या हक्कांचं संरक्षण करण्यास कटिबद्ध असल्याचं पाकिस्तान हिंदू काऊन्सिलचे पेट्रन - इन - चीफ डॉ. रमेश कुमार यांनी म्हटलंय. यापूर्वी जेव्हा कधी हिंदू समाजावर किंवा त्यांच्या मालमत्तेवर हल्ला झाला त्यावेळी प्रशासनाने कारवाई केली असून यापुढेही अशाप्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना सोडलं जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)