You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस स्ट्रेन : दक्षिण आफ्रिकेतही पसरतोय कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्यानंतर संपूर्ण जगाची चिंता वाढली होती. आता दक्षिण आफ्रिकेतही कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन (विषाणूमध्ये काही बदल घडून तयार झालेला नवीन प्रकार) आढळला आहे.
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या या नव्या प्रकाराचे दोन रुग्ण ब्रिटनमध्येही सापडले आहेत. ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी ही माहिती दिली. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन आढळला आहे. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतही या विषाणूचा नवीन स्ट्रेन आढळला आहे. नवीन स्ट्रेनमुळे कोव्हिड-19 ची दुसरी लाट येऊ शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेत मॅट हँकॉक म्हणाले, "ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराची लागण झालेले जे दोन बाधित आढळून आले ते काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या काही लोकांच्या संपर्कात आले होते."
ते पुढे म्हणाले, "विषाणूच्या नवीन स्ट्रेनची संक्रमण करण्याची क्षमता जास्त आहे आणि म्हणूनच विषाणूचा नवीन स्ट्रेन आढळणं चिंताजनक आहे. तसंच ब्रिटनमध्ये आढळलेल्या नवीन स्ट्रेन व्यतिरिक्तही विषाणूत बदल झाले असावे, असा अंदाज आहे."
यानंतर ब्रिटनने दक्षिण आफ्रिकेतून होणारी हवाई वाहतूक तात्पुरती स्थगित केली आहे. तसंच गेल्या 15 दिवसात दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या आणि अशा लोकांच्या संपर्कात आलेल्यांनाही क्वारंटाईन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन आढळल्यानंतर संपूर्ण जगाचीच चिंता वाढली आहे. बदललेल्या स्वरुपातील (mutated) या कोरोना विषाणूची संक्रमण क्षमता 70% जास्त आहे. यानंतर जगातल्या अनेक देशांनी ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेसाठीची हवाई वाहतूक स्थगित केली आहे.
पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या डॉ. सुसॅन हॉपकिन्स म्हणतात, "दक्षिण आफ्रिकेत सापडलेला कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये आम्हाला आढळलेल्या स्ट्रेनहून खूप वेगळा आहे. दोघांमध्येही झालेले म्युटेशन म्हणजेच बदल वेगवेगळे आहेत."
"कोरोना विषाणूचे हे दोन्ही प्रकार वेगाने पसरतात, असं दिसतंय. ब्रिटनमध्ये आढळलेल्या नवीन स्ट्रेनविषयी आम्हाला अधिक माहिती आहे. कारण आम्ही त्याचा अतिशय सखोल अभ्यास करतोय. याउलट दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेनवर आता अभ्यास सुरू करण्यात आला आहे."
दक्षिण आफ्रिकेतील नव्या स्ट्रेनच्या प्रसारावरही नियंत्रण मिळवता येईल आणि येऊ घातलेल्या लसी या दोन्ही स्ट्रेनवर प्रभावी ठरतील, अशी आशा डॉ. हापकिन्स यांनी व्यक्त केली आहे.
त्या म्हणाल्या, "नवीन स्ट्रेनवर लस परिणामकारक ठरणार नाही, याचे या क्षणीतरी कुठलेही पुरावे आढळलेले नाही. याचाच अर्थ लस परिणामकारक ठरेल, याचीच शक्यता आहे."
याविषयी सविस्तर सांगताना त्या म्हणाल्या, "एखादा नवीन विषाणू शरीरात गेला तर त्याविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती तयार करणे, हे काम लस करत असते. लस ही व्यापकपद्धतीने हे काम करते आणि एकाच विषाणूच्या वेगवेगळ्या प्रकारावरही ती प्रभावी असते."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)