कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन 'सुपर स्प्रेडर,' 70 टक्के अधिक वेगाने पसरतो - नीती आयोग

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असताना या विषाणूमध्ये बदल झाल्याचं समोर आल्याने चिंता पुन्हा वाढली आहे. कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे.

नवीन प्रकारच्या या कोरोना विषाणूच्या प्रसाराचा वेग प्रचंड आहे. हा नवा प्रकाराचा विषाणू 70 टक्के अधिक वेगाने पसरतो आणि म्हणूनच त्याला 'सुपर स्प्रेडर' असंही म्हटलं आहे.

मात्र, या नव्या प्रकाराच्या कोरोना विषाणूची लागण झालेली एकही व्यक्ती सध्यातरी भारतात आढळली नसल्याचं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी बदललेल्या स्वरुपाच्या कोरोना विषाणुविषयी माहिती दिली.

प्रत्येक विषाणू हा स्वतःमध्ये बदल करत असतो. त्याला म्युटेशन असं म्हणतात. विषाणू म्युटेट होऊन म्हणजेच स्वतःच्या संरचनेत काही बदल करून नवीन प्रकाराच्या विषाणूत रुपांतरित होतो. यालाच विषाणूचा नवा स्ट्रेन असं म्हणतात.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या डेटानुसार भारतात अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्तांची संख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. मंगळवारी अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्तांची संख्या होती - 2,92,518. गेल्या 163 दिवसांतली ही सर्वांत कमी आकडेवारी आहे. मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, "आपण चांगल्या स्थितीत आहोत आणि आपण हाच वेग कायम ठेवला पाहिजे. यापुढेही सावधगिरी बाळगून विषाणूवर आळा घालता येईल. युकेमध्ये विषाणूमध्ये बदल झाल्याचं आढळून आलं आहे."

ते पुढे म्हणाले, "युकेतील संशोधकांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं आहे की विषाणूमध्ये झालेल्या बदलामुळे त्यांची लागण होण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या विषाणूची संक्रमित करण्याची क्षमता 70% असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे हा विषाणू 'सुपर स्प्रेडर' बनल्याचं आपण म्हणू शकतो."

"कोरोना विषाणूमध्ये काही बदल घडून आले असले तरी त्यामुळे आजाराची तीव्रता वाढलेली नाही. इतकंच नाही तर मृत्यूदर किंवा हॉस्पिटलायझेशनच्या दरावरही त्याचा परिणाम झालेला नाही. युकेमध्ये कोरोना विषाणूचा जो नवीन स्ट्रेन आढळला आहे तो सध्यातरी भारतात आढळलेला नाही. त्यामुळे चिंतेचं किंवा घाबरण्याचं कारण नाही. सध्या आपल्याला केवळ सावध रहायला हवं."

युकेमध्ये आढळलेल्या नवीन प्रकाराच्या विषाणूमध्ये एकूण 17 बदल दिसून आले आहेत. यापैकी N501Y या बदलामुळे विषाणूची मानवी पेशी संक्रमित करण्याची क्षमता वाढली आहे. नवीन विषाणूमुळे आजाराची तीव्रता वाढलेली नसली तरी विषाणू प्रसाराची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढल्याने पूर्वीच्या तुलनेत अधिक वेगाने विषाणूची लागण होऊ शकते आणि हीच चिंतेची बाब असल्याचं डॉ. पॉल यांचं म्हणणं आहे.

कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन समोर आल्यानंतर केंद्र सरकारने कोणती पावलं उचलली याविषयी बोलताना डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, "सरकारचं याकडे संपूर्ण लक्ष आहे. आपल्याकडे उत्तमोत्तम प्रयोगशाळा आहेत आणि आपण हजारो विषाणूंच्या जनुकीय संरचनेचा अभ्यास करत आहोत. युकेमध्ये विषाणूत जे बदल दिसून आले ते भारतात तरी दिसलेले नाहीत. ऑस्ट्रेलिया आणि इतरही काही देशांमध्येही कोरोना विषाणूचं हे बदललेलं स्वरूप आढळलं आहे आणि अशा परिस्थितीत लोक एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करत आहेत त्यामुळे आपण अधिक सतर्क राहण्याची गरज आहे."

31 डिसेंबरपर्यंत युकेतली विमानसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसंच सोमवारपासून प्रयोगशाळेत येणाऱ्या नमुन्यांचं जनेटिक सिक्वेंसिंग करणं सुरू केल्याचंही डॉ. पॉल यांनी सांगितलं.

युकेतून भारतात आलेल्या प्रवाशांना ट्रॅक करून त्यांची कोव्हिड चाचणी करून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. यापैकी जे कुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळतील त्यांचे नमुने घेऊन त्या नमुन्यांचे जनेटिक सिक्वेंसिगं करण्यात येईल.

कोरोना लसीवर परिणाम होईल का?

कोरोना विषाणूच्या बदललेल्या स्वरुपामुळे कोरोना लसीवर काही परिणाम होईल का? आतापर्यंत ज्या लसी विकसित करण्यात आल्या आहेत त्या विषाणूच्या बदललेल्या स्वरुपावरही परिणामकारक ठरतील का? याचीही चिंता लागून आहे.

याविषयी बोलताना डॉ. पॉल म्हणाले, "सध्यातरी युकेमध्ये आढळलेल्या कोव्हिड-19 च्या नव्या स्ट्रेनचा लसींच्या परिणामकारकतेवर काही फरक पडेल, असं दिसत नाही."

ते पुढे म्हणाले, "युकेतल्या संशोधकांशी, जागतिक आरोग्य संघटनेतल्या आपल्या सहकाऱ्यांशी केलेल्या चर्चेतून आणि आम्ही केलेल्या अभ्यासातून घाबरण्याची गरज नाही, असं आपण म्हणू शकतो. विषाणूमधल्या म्युटेशनमुळे उपचाराची पद्धत आणि मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. या म्युटेशनचा लसीच्या क्षमतेवर कुठलाही परिणाम होणार नाही."

मात्र, कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराची संक्रमित करण्याची वाढलेली क्षमता बघता लोकांना यापुढे अधिक सावधगिरी बाळगायला हवी आणि वारंवार हात धुणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, मास्क लावणे, दारं, खिडक्या उघड्या ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे, या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं, गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)