अमेरिका निवडणूक निकाल 2020 : मतदान यंत्रांमध्ये गडबड होती या ट्रंप यांच्या दाव्यात किती तथ्य?

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

अमेरिका निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टिमसंदर्भात (मतदान यंत्र) डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. या मतदान यंत्रामुळे त्यांना लाखो मतांचं नुकसान झाल्याचा दावा ट्रंप यांनी केला आहे.

हे मतदान यंत्र डोमिनियन वोटिग सिस्टम्स नावाची कंपनी तयार करते.

या यंत्रातून ट्रंप यांची मतं डिलीट केली गेली आणि विरोधकांनी त्यासाठी दबाव टाकला असा आरोपही डोनाल्ड ट्रंप यांनी केला आहे.

ट्रंप यांच्या दाव्यांमध्ये किती तथ्य?

ट्रंप : "देशभरात डोमिनियनने आमची 27 लाख मतं डिलीट केली."

रिपब्लिक पक्षाची समर्थक असलेली वृत्तसंस्था 'आऊटलेट वन अमेरिकन न्यूज नेटवर्क' यांच्या रिपोर्ट्सच्या आधारे ट्रंप यांनी हा दावा केला आहे.

या वृत्तानुसार, देशभरातून राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांना देण्यात आलेली मतं डिलीट केली आहेत. ओएनएनने एडिसन रिसर्चच्या एका अहवालाचा आधार घेऊन हा दावा केला आहे.

कंपनीचे अध्यक्ष लॅरी रोसीन यांनी मात्र हा दावा फेटाळला आहे. ते सांगतात, "एडिसन रिसर्चने असे कोणतेही संशोधन केलेले नाही. निवडणुकीत घोटाळा झाल्याचाही आमच्याकडे पुरावा नाही."

ओएएनएननेही आपण केलेल्या दाव्याचा पुरावा दिलेला नाही.

ट्रंप यांचे समर्थक आणखी एक न्यूज रिपोर्ट पुढे करत आहेत. या रिपोर्टमध्ये फॉक्स न्यूजचे अँकर शॉन हेनिटी यांनी दावा केला आहे की, "डोमिनियन मतदान यंत्राने महत्त्वाच्या राज्यांमध्ये ट्रंप यांची मते बायडन यांना दिली आहेत."

या रिपोर्टमध्ये मिशिगन येथील एंट्रीम काऊंटी या क्षेत्रात डोमिनियन मशीन्स वापरण्यात आली आणि तिथे काही अडचणीही निर्माण झाल्या यासंदर्भात माहिती दिली आहे. यामुळे दुसऱ्या काऊंटीतही सॉफ्टवेअरमध्ये समस्या आली असावी ही शक्यता नाकारता येत नाही असा दावा केला जात आहे.

एंट्रीम काऊंटीमध्ये काही अडचणी आल्या होत्या पण त्या डोमिनियन सॉफ्टवेअरच्या नव्हत्या. मिशिगन राज्याचे सचिव जॉसलीन बेन्सन यांनी सांगितले की, याठिकाणी उद्भवलेली समस्या ही मानवी चुकीमुळे निर्माण झाली होती.

"एंट्रीम काऊंटी येथील कर्मचाऱ्याने मशीनमधील रिपोर्टिंग फंक्शन योग्यरीत्या चालू केले नव्हते आणि म्हणून सुरूवातीचे निकाल चुकीचे आले. यामुळे बायडन तीन हजार मतांनी निवडून आले होते. पण रिपब्लिकन क्षेत्रात अनपेक्षित निकाल आल्याने अधिकाऱ्यांनी रिपोर्टिंग फंक्शन नव्याने सुरू केले आणि ट्रंप अडीच हजार मतांनी विजयी झाले," असं बेन्सन यांनी म्हटलं.

"ही चूक सुरुवातीलाच लक्षात आली आणि तात्काळ त्यानुसार सुधारणा झाली असे स्पष्टीकरण बेन्सन यांनी दिले. ही चूक तशीही समोर आली असती कारण आमची तपास यंत्रणा अशा चुका दाखवण्याच्या दृष्टीने तयार केली आहे," असंही बेन्सन यांनी सांगितलं.

ते म्हणाले, "अशी चूक राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी झाली आहे असा एकही पुरावा नाही."

अँकर शॉन हेनिटी यांनी जॉर्जियाचाही उल्लेख केला जिथे डोमिनियन यंत्रांचा वापर झाला. इथे मतमोजणी सुरू होण्यास विलंब झाला पण सॉफ्टवेअरमध्ये कुठेही तांत्रिक समस्या आली नाही अशी माहिती जॉर्जियाच्या सचिवांनी दिली.

डोमिनियन वोटिंग सिस्टम्स यांनीही आपली बाजू स्पष्ट केली आहे. "डोमिनियनच्या माध्यमातून मतं बदलण्यात आली किंवा डिलीट केली गेली अशा दाव्यांमध्ये अजिबात तथ्य नाही," असे संस्थेने स्पष्ट केले.

ट्रंप : "डोमिनियन वोटिंग सिस्टम्स डाव्या पक्षांचे आहे"

ट्रंप यांचा हा दावा योग्य नाही. कारण ही कंपनी डाव्या पक्षांची नाही. पूर्वी या कंपनीने रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट दोघांसाठीही देणगी दिली आहे.

'जहाल डावे' असा उल्लेख करताना ट्रंप यांचा इशारा नेमका कुणाकडे आहे हे स्पष्ट नाही. बहुधा सोशल मीडियावरील दाव्यांसंर्भात ते बोलत असावेत. या कंपनीचे संबंध क्लिंटन कुटुंबाशी आणि इतर डाव्या नेत्यांसोबत आहेत ज्यामध्ये अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांचाही सहभाग आहे असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

डोमिनियन कंपनीचा मालकी हक्क आणि कंपनीचे लॉबिंग किंवा सामाजिक कार्यासाठी दिल्या गेलेल्या देणग्या या दोन गोष्टींमध्ये फरक आहे हे सुद्धा स्पष्ट केले पाहिजे.

डोमिनियन वोटींग कंपनी ही एक निष्पक्ष संस्था असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. पलोसी कुटुंब किंवा क्लिंटन ग्लोबल इनिशियेटीव्ह सोबत आपले कोणतेही मालकी संबंध नाहीत असंही संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

क्लिंटन फाऊंडेशनकडून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात डोमिनियन वोटींग कंपनीसोबत आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या कंपनीच्या कोणत्याही कामासोबत आपला कधीही संबंध आला नव्हता आणि आजही नाही असं या निवेदनात म्हटले आहे.

डॉमिनियनने 2014 मध्ये क्लिंटन फाउंडेशनला देणगी दिली होती आणि कंपनी गरीब देशांमध्ये निवडणूक तंत्रज्ञान पोहोचवेल असं आश्वासन दिले होते.

कंपनीने रिपब्लिकन सीनेट नेता मिच मॅक्कॉनल यांच्या सीनेट समितीलाही देणगी दिली होती. पलोसी यांच्यासंदर्भातील अफवांमुळे माजी चीफ ऑफ स्टाफ नादीम एलशामी डोमिनियनमध्ये काम करतात. पण कंपनीने यापूर्वीही रिपब्लिकन पक्षाशी संबंधित लोकांना नोकरी दिली आहे.

डोमिनियनशी लागेबांधे असल्याचे आरोप आता बायडन यांच्या ट्रंजिशन टीमपर्यंत पोहचले आहेत. सोशल मीडियावरील एका पोस्टनुसार, बायडन यांच्या टीमचे स्वयंसेवक पीटर नेफएंगर हे डोमिनियनची सहयोगी संस्था स्मार्टमेटिकचे अध्यक्ष आहेत.

पीटर नेफेंगर स्मार्टमेटीकचे अध्यक्ष आहेत पण ही संस्था डोमिनियनची स्पर्धकही नाही आणि सहयोगी संस्थाही नाही.

ट्रंप : "टेक्सास आणि इतर राज्यांनी ही मशिन्स सुरक्षित नसल्याचे सांगत वापरण्यास नकार दिला होता"

टेक्सासने हे यंत्र प्रमाणित केले नाही हे सत्य आहे. त्यांची पद्धत इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे.

संपूर्ण देशात समान मापदंड असावेत यासाठी अमेरिकेचे केंद्र सरकार मतदान यंत्रांना प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करते.

पण टेक्सासने यासोबत आणखी काही गोष्टींवर भर दिला आहे ज्यात डोमिनियनचे मतदान यंत्र पात्र ठरत नाही. उदाहरणार्थ-प्रत्येक मतदानापत्रावर एक विशिष्ट क्रमांक असला पाहिजे.

टेक्सासच्या राइस विद्यापीठाचे संगणक शास्त्रज्ञ डॅन वॉलेक मतदान यंत्रांसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे सल्लागार आहेत.

ते सांगतात, "मतदानपत्रांवर क्रमांक न दिल्यास मतदारांची गोपनीयता राखली जाऊ शकते. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही एका उत्तम सुरक्षा पर्यायाशी तडजोड करत आहात."

प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम आणि कायदे आहे. पण अमेरिका सरकारच्या सायबर सुरक्षा एजंसीने या मतदान यंत्रांवर विश्वास दाखवला आहे.

ते सांगतात, "मतदान यंत्रांमधून मतं गहाळ झाली, डिलीट झाली, बदलली किंवा त्यात काही गडबड केली हे सिद्ध करणारा एकही पुरावा नाही."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)