कोरोना लस ट्रायल दरम्यान एकाचा मृत्यू पण लस सुरक्षित असल्याचा ऑक्सफर्ड दावा

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

ब्राझीलमध्ये अॅस्ट्राझेंका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांनी एकत्र येत कोरोना व्हायरसवरच्या लसीची चाचणी सुरू केली आहे. पण या लसीच्या चाचणीत एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला. यानंतर घेतलेल्या आढाव्यात लस सुरक्षित असल्याचं ऑक्सफर्डने स्पष्ट केलं आहे.

'पूर्णपणे खातरजमा' केल्यानंतर ही लस सुरक्षित असल्याचं आमच्या लक्षात आल्याचं ऑक्सफर्डने म्हटलं आहे. पण या स्वयंसेवकाच्या मृत्यूविषयी अधिक माहिती 'सुरक्षेच्या कारणास्तव' देत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयालाही याबद्दल पूर्ण माहिती दिलेली नाही. स्वयंसेवकाला लस दिली नसल्याची माहिती बीबीसीला मिळालेली आहे.

या चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांपैकी फक्त निम्म्या स्वयंसेवकांना कोरोना व्हायरसची लस दिलेली आहे तर उरलेल्या अर्ध्या स्वयंसेवकांना मेनिंजायटिसची आधीच परवाना मिळालेली लस दिलेली आहे.

पण स्वयंसेवक किंवा त्यांच्या कुटुंबापैकी कोणालाही कोणत्या व्यक्तीला कोणती लस दिलेली आहे याची माहिती दिलेली नाही. यामुळे अभ्यासकांना दोन्ही गटांच्या निष्कर्षांची तुलना करणं शक्य होतं आणि कोरोना व्हायरसवरची लस किती परिणामकारक आहे हे समजणं शक्य होतं.

अॅस्ट्राझेंकाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की आम्ही कोणत्याही एका केसवर प्रतिक्रिया देणार नाही पण "संपूर्ण प्रकरणाचा योग्य प्रकारे आढावा घेतल्यानंतरच खात्रीपूर्वक सांगू शकतो."

"चाचणीची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या घटनेतल्या बाबी काळजीपूर्वक अभ्यासल्या आहेत. तसंच एका स्वतंत्र निरीक्षक समितीने या घटनेची चौकशी केली आहे आणि चाचणी नियंत्रित करण्याऱ्या अधिकाऱ्यांनीही माहिती घेतली आहे. या सगळ्या चौकशीमध्ये सुरक्षेच्या कोणत्याही त्रुटी आढळून आलेल्या नाहीत," असंही त्यांनी म्हटलं.

ऑक्सफर्ड/अॅस्ट्राझेंकाच्या या लसीकडून अनेक अपेक्षा आहेत आणि बाजारात येणाऱ्या लसींपैकी ही पहिली असेल असं अनेकांना वाटतंय. या लसीच्या फेज -1 आणि फेज -2 च्या चाचण्या यूके, ब्राझील आणि भारतात यशस्वी ठरल्या आहेत तर फेज- 3 च्या चाचण्या चालू आहेत.

यूकेमधल्या एका पेशंटला लसीमुळे काही साईडइफेक्ट जाणवल्यानंतर ऑक्सफर्डच्या या लशीच्या चाचण्या महिनाभर थांबवल्या होत्या. पण या लसीच्या चाचण्या सुरक्षित आहेत असा अहवाल आल्यानंतर त्या पुन्हा सुरू झाल्या.

अमेरिकेत मात्र फेज- 3 च्या चाचण्या अजूनही थांबवलेल्या आहेत आणि तिथे एका स्वतंत्र संस्थे मार्फत या चाचण्यांचं मुल्यांकन सुरू आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ब्लुमबर्ग या माध्यमसंस्थेला सांगितलं की अमेरिकेतल्या चाचण्याही लवकरच सुरू होतील.

'चाचण्या सुरू राहाव्यात'

ब्राझीलचा आरोग्य विभाग, अन्विसाने सांगितलं की त्यांना या पेशंटच्या मृत्यूबद्दल 19 ऑक्टोबरला माहिती दिली गेली होती.

ब्राझीलच्या माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार ही व्यक्ती 28-वर्षीय डॉक्टर होती आणि कोव्हिड -19 मुळे शरीरात झालेल्या गुतांगुतींमुळे मरण पावली. पण ब्राझीलच्या आरोग्य विभागाने या माहितीला दुजोरा दिलेला नाही.

ऑक्सफर्डने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की, "या चाचणी दरम्यान घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या आरोग्यविषयक घटनांचा स्वतंत्रपणे तपास झालेला आहे. तसंच ब्राझीलच्या नियमकांनी घेतलेल्या आढाव्यातही या चाचण्या सुरू राहाव्यात अशी शिफारस केलेली आहे."

जर या लशीला मान्यता मिळाली तर त्यांची खरेदी करण्याचा ब्राझीलचा मानस आहे. ब्राझीलमध्ये आत्तापर्यंत कोरोना व्हायरसच्या 53 लाख अधिकृत केसेस समोर आलेल्या आहेत तर 1 लाख 55 हजार मृत्यू झाले आहेत. अमेरिका आणि भारतानंतर ब्राझीलचा जगात कोरोना व्हायरस केसेसमध्ये तिसरा नंबर लागतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)