बर्मिंगहॅम: ब्रिटनमधील चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, तर सातजण जखमी

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

ब्रिटनच्या बर्मिंगहॅम सिटी सेंटरमध्ये झालेल्या चाकूहल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर सातजण जखमी आहेत. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, जवळपास दोन तासांपर्यंत हल्लेखोर लोकांवर हल्ले करत सुटला होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, पहिला हल्ला साडेबारा वाजण्याच्या सुमारास कंस्टिट्युशन हिलमध्ये करण्यात आला आणि त्यानंतर हल्लेखोरानं दक्षिणेकडील लोकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली.

वेस्ट मिडलँड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "या हल्ल्यात सहभागी हल्लेखाराचा कुठल्या कट्टरतावादी किंवा गुन्हेगारी टोळीशी संबंध असल्याचं अजूनतरी समोर आलं नाही. जे सातजण जखमी झाले आहेत, त्यातील एक पुरुष आणि एक महिला गंभीर आहेत, तर इतर पाचजणांवरील हल्ला तितकासा जीवघेणा नाहीय."

'मेजर इन्सिडंट'

पोलिसांनी या हल्ल्याला 'मेजर इन्सिडंट' म्हणून घोषित केलंय. म्हणजेच, 'मोठी घटना' असल्याची पोलिसांचं म्हणणं आहे.

पोलीस एखाद्या घटनेला 'मेजर इन्सिडंट' म्हणून संबोधित केल्यास ती घटना अत्यंत गंभीर असल्याचं मानलं जातं. म्हणजेत अशा घटनांमध्ये सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झालेला असतो.

यावेळी स्थानिक पोलीस आवश्यक उपाययोजना आणि बंदोबस्त करून आपत्कालीन सेवेतील लोकांना आपल्यासोबत कामासाठी आणतात.

पोलिसांना सकाळी मिळाली माहिती

रविवारी पहाटे चाकूहल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे, अशी माहिती वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी सुरुवातीला दिली.

काहीवेळाने एकाच वेळी अनेक नागरिकांना चाकूने मारल्याची घटना नोंदवण्यात आल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या.

"अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे, पण किती जण जखमी झाले आहेत, त्यापैकी कोण गंभीर आहे, याबाबत माहिती देणं सध्यातरी शक्य नाही. आपत्कालीन सेवेतील लोक घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत," अशी माहिती पोलिसांनी काहीवेळाने दिली होती.

मात्र, आता जखमींची नेमकी संख्या समोर आली आहे.

संयम बाळगण्याचं आवाहन

वेस्ट मिड्सलँड्स पोलिसांनी याप्रकरणी एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे.

नेमकं काय घडलं, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. यामध्ये थोडा वेळ जाऊ शकतो. त्यानंतरच याची माहिती सर्वांना दिली जाईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

आता लगेच याच्या कारणांबाबत कयास लावणं, योग्य ठरणार नाही. आपत्कालीन सेवेतील लोकांकडे अशा प्रकारच्या मोठ्या घटनांदरम्यान काम करण्याचा अनुभव आहे. नाकाबंदीही करण्यात आली असून काही रस्ते बंद राहतील, असं पोलीस प्रशासनाने म्हटलं.

बीबीसी प्रतिनिधी सायमन जोन्स यांनी घटनेबाबत अधिक माहिती दिली.

"लोकांना संयम बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शांत पण सतर्क राहा. घटनास्थळापासून दूर राहा, अशी सूचना देण्यात आली आहे. पोलिसांनी बर्मिंगहॅम शहराच्या मध्यभागी असलेल्या गे व्हिलेज परिसराची नाकाबंदी केली आहे," असं जोन्स यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)