You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दोन दगडांसाठी मिळाली एक कोटीहून जास्त रक्कम, कारण...
दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये खोदकाम करणाऱ्या एका जोडीला दोन दगड मिळाले...ज्यांची किंमत जवळपास अडीच लाख अमेरिकन डॉलर म्हणजे 1 कोटी 87 लाख रुपयांहून अधिक होती. कारण हे दगड चक्क सोन्याचे होते.
ब्रेंट शॅनॉन आणि एथन वेस्ट या जोडगोळीला सोन्याचा हा शोध व्हिक्टोरिया राज्यातील टार्नागुल्ला शहराजवळ खोदकाम करताना लागला.
त्यांचा हा शोध प्रसिद्ध टीव्ही शो 'ऑस्ट्रेलियन गोल्ड हंटर्स'वर दाखवण्यात आला होता.
या जोडीनं मेटल डिटेक्टरचा वापर करून सोन्याचा शोध लावला आणि त्या भागात खोदकाम करून सोनं शोधलं. ही संपूर्ण प्रक्रिया टीव्हीवरही दाखविण्यात आली होती.
सीएनएनसोबत बोलताना एथन वेस्टनं म्हटलं की, हा निश्चितपणे आमचा सर्वात मोठा शोध आहे. एकाच दिवसात सोन्याचे दोन दगड मिळणं खूप अद्भुत आहे.
हा कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या डिस्कव्हरी चॅनेलनं या शोधमोहिमेबद्दल बोलताना म्हटलं, "एथन वेस्ट आणि त्यांच्या वडिलांना मिळून अवघ्या काही तासात सोनं शोधून काढलं. या सोन्याचं वजन जवळपास साडेतीन किलो आहे.
'ऑस्ट्रेलियन गोल्ड हंटर्स' या टीव्ही शोमध्ये सोन्याचा शोध घेणाऱ्या जोड्या दाखवल्या जातात. जमिनीतल्या सोन्याच्या साठे या जोड्या कशा शोधतात, हे या शोमधून दाखवतात.
ऑस्ट्रेलियन टीव्ही शो 'सनराइज'वर बोलताना ब्रेंट शॅनॉननं म्हटलं, "आम्हाला एक संधी हवी होती. ते एक मोकळं मैदान होतं. म्हणजेच तिथे याआधी खोदकाम झालेलं नव्हतं.
एथन वेस्ट यांच्यानुसार गेल्या चार वर्षांपासून खोदकाम करताना त्यांना सोन्याचे जवळपास हजारो तुकडे मिळाले आहेत.
2019 मध्ये ऑस्ट्रेलियातल्या एका व्यक्तीनं मेटल डिटेक्टरचा वापर करून 1.4 किलो सोनं शोधलं होतं. त्याची अंदाजे किंमत 69 हजार अमेरिकन डॉलर म्हणजे 51 लाख रुपयांहून अधिक होती.
ऑस्ट्रेलियामध्ये सोन्याच्या खोदकामाला 1850 च्या दशकात सुरूवात झाली होती. आजही हा या देशाचा महत्त्वाचा उद्योग आहे.
एका स्थानिक वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार टार्नागुल्ला शहराची स्थापनाच 'व्हिक्टोरिया गोल्ड रश' दरम्यान झाली होती. या शहरात सोन्याचा शोध घेत आपलं नशीब आजमवायला अनेक लोक येतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)