कोरोना व्हायरस : 3 महिने हॉस्पिटलमध्ये घालवून जिवंत परतण्याची कहाणी

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

युकेत राहणारे 61 वर्षांचे बबाक खजरोशाही यांना 22 मार्च रोजी पहाटे चार वाजता हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं.

त्यानंतर तब्बल 86 दिवस आजाराशी संघर्ष केल्यानंतर बबाक यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. मात्र, 86 दिवसांचा हा लढा सोपा नव्हता.

कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर बबाक जेवढे दिवस हॉस्पिटलमध्ये होते तेवढ्या दिवसात 40 हजार लोकांचा कोव्हिड-19 आजारामुळे मृत्यू झाला होता.

86 दिवसांचा संघर्ष, बबाक यांच्याच शब्दात

खरं सांगायचं तर मला कोरोना विषाणूची लागण कशी झाली, माहिती नाही. मी आजही विचार करतो. पण उत्तर मिळत नाही.

मी खूप काळजी घेत होतो. नियमित हात स्वच्छ धुवायचो. कधीच सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला नाही. कुठे जायचंच असेल तर स्वतःच्या कारनेच जायचो.

मात्र, या सगळ्यांची सुरुवात कुठे झाली, हे मी सांगू शकतो.

शुक्रवारचा दिवस होता. 13 मार्च. माझी पार्टनर मला भेटायला आली होती. त्यावेळी मला सारखं जाणवत होतं की काहीतरी गडबड आहे. आता वाटतं की तेव्हा मला ताप होताच. पण फार नसल्यामुळे माझ्या ते लक्षात आलं नाही.

माझी पार्टनर घरी आली तेव्हा मी तिच्यापासून लांबच होतो. कारण मला सारखी भीती वाटत होती की कदाचित मला कोव्हिडची लागण झाली असावी. दुसऱ्या दिवशीही तसंच वाटत होतं.

माझ्याकडे जुना थर्मामीटर होता. मी तो शोधला आणि शरीराचं तापमान मोजू लागलो. बघितलं तर 38.5 अंश सेल्सियस ताप होता. तेव्हाच स्वतःला सांगितलं, 'हे गंभीर आहे.'

एक फुफ्फूस निकामी

मी 111 या हेल्पलाईनवर कॉल केला. त्यांनी सांगितलं 7 दिवस वाट बघा. त्यानंतर 999 या क्रमांकावर कॉल करा. तोवर माझा ताप खूप वाढला होता आणि प्रकृती ढासळत होती.

एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाणंही अवघड झालं होतं. उठून कुठली वस्तूही घेता येत नव्हती. माझी तब्येत खूपच खराब झाली होती. तेव्हा एका मित्राने तातडीने 999 क्रमांकावर फोन केला.

मी 22 मार्च रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. हॉस्पिटलमधला हा माझा पहिला दिवस होता. पहाटेचे चार वाजले होते आणि तरीही मला हॉस्पिटलमध्ये नेणारे पॅरामेडिक्स हसतमुखाने काम करत होते. मला याचं खूप आश्चर्य वाटलं. तिथल्या कोपऱ्यातल्या एका खोलीत मला झोपवण्यात आलं. एका नर्सने मला जेवण वाढलं. मला चिकन देण्यात आलं. ते खायलाही मला खूप मेहनत करावी लागली.

मला फक्त एवढंच आठवतं. ती खोली. ते शेवटचं जेवण. त्यानंतर काय झालं, मला काहीच आठवत नाही.

डॉक्टरांनी मला इंजेक्शन देण्याआधी मी काही कॉल केले. कुटुंबीयांना मेसेज पाठवले. डॉक्टरांशी बोललो. पण मला यातलं काहीच आठवत नाही.

साडे तीन आठवड्यांनंतर मला अतिदक्षता विभागात जाग आली.

बबाक यांना गुंगीचं औषध देण्यात आलं त्यानंतर त्यांना जाग आली त्या दरम्यानच्या काळात त्यांना श्वास घेता यावा, यासाठी त्यांना ट्राचेस्टोमीची मदत देण्यात आली होती.

त्यावेळी मला श्वास घ्यायला त्रास होत होता. मी व्हेंटिलेटरवर होतो आणि मला खूप जास्त ऑक्सिजनची गरज होती. माझं डावं फुफ्फुस निकामी झालं होतं.

मला चांगलं आठवतं साडेतीन आठवड्यांनंतर मी डोळे उघडले तेव्हा मी कुणालाच विचारलं नाही की मी कुठे आहे आणि मला इथे का आणण्यात आलंय. मी इथेच असायला हवं, याचा माझ्या मनाने स्वीकार केला होता.

पण, माझा चश्मा कुठेय, हा विचार माझ्या मनात आला होता. कारण चश्म्याशिवाय मला दिसत नाही. मला काही बोलता येत नव्हतं आणि मी खूप गोंधळलेला होतो.

मला काय बोलायचे ते लिहिण्यासाठी नर्सने मला पेपर आणि पेन दिलं. मात्र, लिहिण्याचेही त्राण माझ्यात नव्हते. मग त्यांनी मला अक्षरांचा एक बोर्ड दिला. त्या अक्षरांवर बोट ठेवून सांगता यावं, यासाठी तो बोर्ड होता. पण मला तेही जमत नव्हतं.

काही दिवसांनंतर मात्र, मला अक्षरं दाखवता येऊ लागली.

हे असं सगळं सुरू असताना एक दिवस हॉस्पिटलमध्ये माझ्या फिजियोथेरपिस्टने मला असं काही सांगितलं जे माझ्या कायम स्मरणात राहिलं.

त्या म्हणाल्या होत्या, "तुम्ही या हॉस्पिटलमधून नक्की बाहेर पडाल."

चार डॉक्टर, एक रुग्ण

माझ्या हालचाली वाढवण्यासाठी फिजियोथेरपी सुरू होती. त्यांनी मला बेडच्या एका टोकाला बसायला सांगितलं. त्यानंतर एका खुर्चीवर बसायला सांगितलं. उठायला सांगितलं आणि उठून हळू-हळू चालायला सांगितलं.

मी कृत्रिम ऑक्सिजनच्या मदतीने हे सगळं करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि म्हणाले हे मॅरेथॉनची स्पर्धा पार करण्यासारखं आहे.

जवळपास 30 दिवस मला साधं उभंही राहता येत नव्हतं. माझ्या मनात विचार सुरू होते - मी बरा होईल का?

मला दिर्घ श्वास घेता येत नव्हता. त्यासाठी मला मशीनची मदत घ्यावी लागत होती.

मात्र, दुसऱ्या दिवशी मी पुन्हा उठायचा प्रयत्न केला आणि फिजियोथेरपिस्टने पुन्हा तेच शब्द उच्चारले. तेव्हापासून तेच माझं ध्येय बनलं. मला त्या हॉस्पिटलमधून बाहेर पडायचं होतं.

जवळपास 50 दिवसांनंतर मला नॉर्मल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. म्हणजे मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची ही तयारी होती. मात्र, एक-दोन दिवसातच मला थंडी वाजून ताप आला. मी ताबडतोब नर्सला हाक मारली.

काही सेकंदात चार डॉक्टर्स माझ्या अवतीभोवती जमले आणि अर्ध्या तासात माझी एक एएमयू चाचणी झाली. त्यात मला संसर्ग असल्याचं कळलं.

पण मी हॉस्पिटलमधून परतलो

माझ्या गळ्याचे स्नायू खूप कमजोर झाले होते आणि त्यामुळेच मी इतके दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. डॉक्टरांनी मला घशाच्या स्नायूंसाठी बरेच व्यायाम सांगितलं. शिवाय, थोड्याथोड्यावेळाने पाण्याचे घोट घ्यायला सांगितलं. घोट प्यायल्याने घशाच्या स्नायूंचा व्यायाम होतो.

या सगळ्यांचा फायदा झाला आणि माझी घशातली फूड ट्यूब काढण्यात आली. म्हणजेच आता कुठल्याही वायर किंवा ट्युब माझ्या शरीराला जोडलेल्या नव्हत्या.

केवळ दोन गोष्टींसाठी मी भावनिक झालो आहे. एक एनएचएस (ब्रिटनची नॅशनल हेल्थ सर्विस) आणि दुसरं माझं कुटुंब. केवळ आणि केवळ एनएचएसमुळेच मी आज जिवंत आहे. त्यांनी माझे प्राण वाचवले.

इतक्या दिवसांनंतर हॉस्पिटलमधून बाहेर पडताना काय वाटतंय, हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी हॉस्पिटलमध्ये आलो त्यावेळी झाडांवर पानं नव्हती आणि आज घरी जाताना झाडांना पालवी फुटली आहे.

मी ज्यांच्याकडे काम करायचो त्यांना सांगितलं की मी लवकर कामावर परतू शकेल, असं मला वाटत नाही. मी स्वतःला सेमी-रिटायर मानतो. विषाणू माझ्या शरीरातून गेला आहे. मात्र, हॉस्पिटलमध्ये भर्ती होण्याचा अनुभव… त्याचं काय? त्यातून बाहेर पडण्याचा माझा अजूनही प्रयत्न सुरू आहे.

आजही चालल्यानंतर मला थाप लागते. मी अजूनही हलकं जेवण घेतो. पण हॉस्पिटलमधून परतल्यानंतर माझं वजनही थोडं वाढलं आहे. असं असलं तरी, इराणी कबाब मी खूप मिस करतोय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)