कोरोना व्हायरस : 'अनेक कुटंब आम्हाला म्हणतात, मृतदेह एकदा शेवटचा तरी पाहू द्या'

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

जेव्हा आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला शेवटचा निरोप द्यायचा असतो, तो क्षण आपल्या आयुष्यातील सर्वांत मोलाचा असतो. मात्र, इटलीतल्या लोकांचा हाच क्षण कोरोना व्हायरस हिरावून घेतोय. यामुळे जगण्यातील दु:ख आणखी वाढतंय.

कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेलं जागतिक आरोग्य संकट एखाद्या माणसाला दोनवेळा मारतोय, असं अॅड्र्यू केरॅटो म्हणतात. सेरॅटो हे इटलीतल्या मिलान शहरातील स्मशानभूमीत काम करतात.

"तुमच्या मृत्यूआधी कोरोना व्हायरस तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तींपासून वेगळं करतो आणि नंतर जवळही येऊ देत नाही," असं म्हणत सेरॅटो भावनिक होत पुढे सांगतात, "अनके कुटुंबांना आपण उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतं. आपल्या जवळची व्यक्ती सोडून गेलीय, हे लोकांना स्वीकारणं कठीण झालंय."

एकांतातच मृत्यू

कोरोना व्हायरसचे अनेक रुग्ण अलगीकरणात (Isolation) असतानाच मृत्यूमुखी पडले. त्यांच्या शेवटच्या क्षणी ना कुणी मित्र-मैत्रिणी सोबत होते, ना नातेवाईक. कारण संसर्गाच्या शक्यतेमुळे नातेवाईक किंवा कुणालाही रुग्णाला भेटण्यास मनाई करण्यात आलीय.

रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्यातून विषाणू पसरत नाही, असं आरोग्य प्रशासन सांगत असलं, तरी मृतदेहाच्या कपड्यांवर काही तास विषाणू जिवंत राहू शकतात. त्यामुळं मृतदेह तातडीनं शवपेटीत बंद केले जातायत.

"अनेक कुटुंब आम्हाला विचारतात की, मृतदेह एकदा शेवटचं तरी पाहू द्या. पण तसं पाहण्यास मनाई करण्यात आलीय," असं क्रेमोनातल्या मॅसिमो मॅनकास्ट्रोपा यांनी सांगितलं.

कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा अंत्यविधी त्यांच्या आवडत्या कपड्यांमध्ये केले जाऊ शकत नाही. हॉस्पिटलनं दिलेल्या कपड्यांमध्येच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात.

तरीही नातेवाईकांच्या समाधानासाठी मॅसिमो मॅनकास्ट्रोपा जे शक्य आहे, ते करतायत.

अनेक कुटुंब मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे आवडते कपडे आणून देतात. हे कपडे मॅनकास्ट्रोपा त्या मृतदेहावर टाकतात.

'आमच्यावर विश्वास ठेवण्यापलिकडे त्यांच्याकडे पर्यायच नाहीय'

या अभूतपूर्व स्थितीत रुग्णांची काळजी घेणारे रुग्णाच्या नातेवाईकांची भूमिकाही निभावत आहेत. मृत व्यक्तीचे नातेवाईकही तेच बनतायत आणि अंत्यविधी करणारेही.

हे असं करण्याचं कारण म्हणजे, मृतदेहाच्या जवळ कुठल्याही खबरदारीविना कुणी गेल्यास त्यांचंही विलगीकरण करावं लागेल. कारण संसर्गाची भीती असते.

सेरॅटो सांगतात, मृतदेहाची सगळी जबाबदारी आम्हीच घेतो आणि सगळे विधी आम्हीच पार पाडतो.

"शवपेटीचे फोटो काढून आम्ही त्यांच्या नातेवाईकांना पाठवतो. त्यानंतर मृतदेह उचलून स्मशानभूमीत नेतो. अर्थात, अशावेळी आमच्यावर विश्वास ठेवण्यापलिकडे नातेवाईकांकडेही दुसरा पर्याय नसतो," असं ते सांगतात.

कोरोना व्हायरसमुळं मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या नातेवाईकांचं दु:खं कमी करण्यासाठी दुसरा कुठला मार्ग नसल्याची खंत व्यक्त करत सेरॅटो भावनिक होतात.

मृतदेहाबाबत नातेवाईक काय करू शकतात, हे सांगत बसण्यापेक्षा सेरॅटो आता काय करायला नको, हे सांगतात. हा सर्वांत कठीण काळ असल्याचंही ते म्हणतात.

"आपली जवळची व्यक्ती मृत्यूमुखी पडलेली असते, मात्र तिला चांगले कपडे घालून निरोप देऊ शकत नाही. ती शेवटचं एकदा सुंदर दिसेल, असं काहीही करू शकत नाही. हे खूपच वेदनादायी आहे," असंही सेरॅटो सांगतात.

'जीवलग व्यक्तीला शेवटचं पाहायला न मिळणं वेदनादायी आहे'

अॅड्र्यू सेरॅटो हे 30 वर्षांपासून मिलानमधील या स्मशानभूमीचं काम पाहतात. याआधी त्यांचे वडील हे काम पाहायचे.

सेरॅटो म्हणतात, एखाद्या दु:खी व्यक्तीला एक छोटी गोष्टही महत्त्वाची असते.

"आपल्या आवडत्या व्यक्तीच्या मृतदेहाला शेवटचा स्पर्श करणं, हात हातात घेणं, भावूक डोळ्यांनी त्या मृतदेहाकडं पाहणं, हेही करण्यास मिळू नये, हे फारच हृदद्रावक आहे," असं सेरॅटो म्हणतात.

आता कोरोना व्हायरसच्या काळात तर मृत्यूमुखी पडलेल्याच्या नातेवाईकांना गेटबाहेरच थांबावलं जातंय. तरीही काही नातेवाईक लिखित पत्र, घरातील काही वस्तू, चित्र, कविता अशा गोष्टी मृतदेहासोबत ठेवण्याची विनंती करतात. पण अर्थात, त्याही गोष्टी मृतदेहासोबत ठेवल्या जात नाहीत. कारण खासगी वस्तू मृतदेहासोबत पुरणं हे बेकायदेशीर आहे. हा खरंतर कठोर उपाय वाटेल, पण विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीचंच हे एक पाऊल आहे.

पण आवडत्या व्यक्तीला शेवटचं पाहण्यासाठी स्मशानभूमीपर्यंत आलेल्यांसाठी हे फारच त्रासदायक आणि वेदनादायक आहे.

स्मशानभूमीत काम करणाऱ्या अनेकांनी स्वत:ला विलगीकरण केलंय. काहींनी तर स्मशानभूमीही बंद केलीय. काळजीचं कारण म्हणजे, मृतदेहांची हाताळणी करणाऱ्या अनेकांकडे तर मास्क, ग्लोव्ह्जही नाहीत.

"आणखी एक आठवडा पुरतील, एवढ्याच संरक्षक गोष्टी आहेत. जेव्हा त्याही संपतील, तेव्हा आम्ही काहीच करू शकत नाही. इटलीतली सर्वांत मोठी स्मशानभूमी आमचीच आहे. तरी आम्ही इतक्या समस्यांचा सामना करतोय. बाकीच्या स्मशानभूमीत काय स्थिती असेल, याचा विचारही करवत नाही," असं सेरॅटो सांगतात.

अंत्यविधींवर बंदी

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी इटलीत अंत्यविधींवर कायद्यान्वये बंदी आणण्यात आलीय. हे पाऊल इटलीसाठी अभूतपूर्व आहेच, पण रोमन कॅथलिकच्या परंपरेलाही छेद देणारे आहे.

सेरॅटो दिवसाला एकाला तरी पुरतात. मात्र, त्या मृतदेहाला शेवटचा निरोप देण्यासाठी कुणीच नसतो. कारण मृत्यूमुखी पडलेली व्यक्ती विलगीकरण कक्षात राहिलेली असते.

"कधी-कधी एक-दोन व्यक्ती अंत्यसंस्कारावेळी असतात, मात्र तेही तेवढंच. शिवाय, तिथं कुणालाही बोलण्यास परवानगी नसते. केवळ शांतता असते," असं मॅसिमो सांगतात.

शवपेटींनी भरलेला देश

इटलीतली शवागृह भरलीयेत. मृतांची संख्या झपाट्यानं वाढतेय. कोरोना व्हायरसमुळे इटलीत आजपर्यंत (23 मार्च) 6000 हून अधिक जणांचा मृत्यू झालाय. कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू इटलीतच झालेत.

क्रेमोनातल्या स्मशानभूमीबाहेर तर रांगा लागल्याचं सेरॅटो सांगतात. उत्तर इटलीतले हॉस्पिटल भरले आहेत. क्रेमोनातल्या हॉस्पिटलना तर एखाद्या गोदामाचं स्वरूप आलंय.

अनेक शवपेट्या चर्चमध्ये जमा करण्यात आल्यात.

इटलीतल्या बर्गामोमध्ये कोरोना व्हायरसनं हाहाकर माजवलाय. इथंच सर्वाधिक मृत्यू झालेत. या शहरातील स्मशानभूमीत जागा नाहीय.

कालच रात्री लष्कराचं पथक जवळपास 70 शवपेट्या घेऊन शांतपणे स्मशानभूमीच्या दिशेनं जात असल्याचं इथल्या नागरिकांनी पाहिलं. या शवपेट्यांमध्ये कुणाचा मित्र होता, कुणाची मैत्रीण, तर कुणाचे आणखी कुठले नातेवाईक. हे सर्व चित्र फारच वेदनादायी होतं.

'मृतदेह वाहून नेणारे म्हणूनच आमच्याकडं पाहिलं जातं'

इटलीतल्या डॉक्टर आणि नर्स यांचं नायक, तारणहार अशा शब्दांत वर्णन केलं जातंय. मात्र, स्मशानभूमीत काम करणाऱ्यांचा म्हणावा तितका सन्मान होताना दिसत नाहीय.

अनेकजण तर मृतदेह वाहून नेणारे इतक्याच दृष्टीनं आमच्याकडे पाहतात, अशी खंत मॅसिमो व्यक्त करतात.

"इटालियन आमच्याकडे पौराणिक दंतकथांमधील त्या व्यक्तीसारखं पाहतात, जी मृत आणि जीवित लोकांना विभागणाऱ्या नदीपलिकडे मृतदेह वाहून नेते," अशीही खंत मॅसिमो व्यक्त करतात.

पण काहीही असो, मृतदेहांनाही आदर मिळेल, असा प्रयत्न आमच्याकडून होत राहील, असं मॅसिमो सांगतात.

दुसरीकडे, इटलीत सध्या #Andratuttobene हा हॅशटॅग ट्रेण्ड होतोय. याचा अर्थ असा आहे की, 'सर्वकाही ठीक होईल'. या हॅशटॅगसोबत इंद्रधनुष्याची इमोजीही जोडली जातेय.

मात्र, वस्तुस्थिती फार भयंकर आहे. सध्या आशेचा किरणंही दिसत नाहीत. शिवाय, हे सर्व कुठं जाऊन थांबेल, हेही कुणाला सांगता येत नाहीय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)