कोरोना व्हायरस: खेळांच्या स्पर्धांना फटका; अनेक स्पर्धा लांबणीवर

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन न्यूझीलंड क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेतली आहे.

न्यूझीलंडचा संघ तीन वनडे खेळण्याकरता ऑस्ट्रेलियात दाखल झाला. मेलबर्न इथं झालेली पहिली वनडे रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आली. या मॅचनंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना मायदेशी परतण्याचा सल्ला दिला. यामुळे 15 मार्चला सिडनी इथं तर 20 मार्चला होबार्ट इथं होणार असलेले सामने पुढे ढकलण्यात आले आहेत.

या महिन्याच्या शेवटी ऑस्ट्रेलियाचा संघ तीन ट्वेन्टी-20 सामन्यांसाठी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार होता. तो दौराही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

चीनमधल्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसन गेल्या दोन-अडीच महिन्यात जगभर दहशत पसरवली आहे. युरोप, अमेरिका खंडातही कोरोना व्हायरसनं शिरकाव केलाय.

जागतिक आरोग्य संघनटनेकडून कोरोना व्हायरसला 'Pandemic' साथ म्हणून जाहीर केलीय. अमेरिकनं राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केलीय. जगभरात खबरदारीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

कोरोना व्हायरसचा परिणाम क्रीडा क्षेत्रावरही झालेला दिसतोय. काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या, काही स्पर्धांमधून खेळाडूंनी माघार घेतली, काही स्पर्धांना तात्पुरती स्थगिती देण्यात आलीय, तर काही स्पर्धा रद्दच करण्यात आल्या आहेत.

कोरोना व्हायरसचा क्रीडा क्षेत्रावर काय परिणाम झालाय, याचा आढावा बीबीसी मराठीनं घेतला आहे.

बॅडमिंटन स्पर्धा महिनाभरासाठी स्थगित

बॅडमिंटन वर्ल्ड फेडरशेनने 16 मार्च ते 12 एप्रिल या कालावधीसाठी सर्व स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑल इंग्लंड स्पर्धा संपताच बंदीला सुरुवात होईल. या निर्णयामुळे स्विस ओपन, इंडिया ओपन, ओरलन्स मास्टर्स, मलेशिया ओपन, सिंगापूर ओपन या स्पर्धांचं आयोजन स्थगित झालं आहे.

याआधी दिल्लीत होणारी इंडिया ओपन रिकाम्या स्टेडियममध्ये होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र नव्या निर्णयामुळे ही स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली आहे.

देशांतर्गत स्पर्धांचं वेळापत्रक कोलमडलं

भोपाळ इथं 6 ते 8 एप्रिल दरम्यान होणार असलेली फेडरेशन कप नॅशनल ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली आहे. बेंगळुरू इथं होणारी फिबा ऑलिंपिक पात्रता स्पर्धा लांबणीवर गेली आहे. 9 जूनला होणार असलेली फिफा वर्ल्ड कप क्वालिफायर भारत वि. अफगाणिस्तान मॅच लांबणीवर पडली आहे. ऐझॉल इथं 14 ते 27 एप्रिल कालावधीत होणार असलेली संतोष करंडक फुटबॉल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.

गुरुग्राम इथं 19 ते 22 मार्चदरम्यान होणार असलेली इंडिया ओपन गोल्फ स्पर्धा आता नंतर घेण्यात येईल. पॅरा नॅशनल स्पर्धाही लांबणीवर गेली आहे.

टोकियो ऑलिंपिकदृष्टीने राजधानी दिल्लीत होणारी नेमबाजी विश्वचषक स्पर्धा अनिश्चिक काळासाठी लांबणीवर पडली आहे. 15 ते 25 मार्च याकाळात ही स्पर्धा होणार होती. ISL अर्थात इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येईल. चेन्नई आणि कोलकाता दरम्यान हा सामना होणार आहे.

इंग्लंड क्रिकेट संघाची श्रीलंका दौऱ्यातून माघार

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेत असलेल्या इंग्लंड क्रिकेट संघाने दौरा रद्द करून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचा संघ श्रीलंका अध्यक्षीय संघाविरुध्द सराव सामना खेळत होता. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळ सुरू असतानाच दौऱ्यातून परतण्याचा निर्णय इंग्लंड संघ व्यवस्थापनाने घेतला. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात पहिली कसोटी 19 ते 23 मार्च गॉल इथं तर दुसरी कसोटी 27 ते 31 मार्च दरम्यान कोलंबो इथं होणार होती.

पाकिस्तान सुपर लीगमधून 10 विदेशी खेळाडूंची माघार

कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव लक्षात घेऊन पाकिस्तानात सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतून 10 विदेशी खेळाडूंनी माघार घेतली आहे. इंग्लंडचे टॉम बॅंटन, लायम लिव्हिंगस्टोन, अॅलेक्स हेल्स, जेसन रॉय, टायमल मिल्स, जेम्स विन्स, लायम डॉसन, लुईस ग्रेगरी यांच्यासह वेस्ट इंडिजचा कार्लोस ब्रेथवेट आणि दक्षिण आफ्रिकेचा रिले रोसू यांनी परदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. एका संघाचे प्रशिक्षक जेम्स फोस्टर यांनीही मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तान सुपर लीगचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. ही स्पर्धा नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधीच संपेल. 18 मार्चला अंतिम मुकाबला होणार आहे. दरम्यान स्पर्धेचे पुढचे सामने रिकाम्या स्टेडियममध्ये होतील.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे सीरिज रद्द

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील उर्वरित दोन सामनेही कोरोनामुळे रद्द करण्यात आले आहेत. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना 15 मार्चला लखनौ इथं होणार होता तर तिसरा सामना 18 मार्चला कोलकात्यामध्ये होणार होता.

IPL चे सामने 15 एप्रिलपर्यंत लांबणीवर

आयपीएलचे सामने 15 एप्रिलनंतर होतील असं बीसीसीआयने सांगितलं आहे. सर्व खेळाडू, चाहते आणि सर्वच जनतेच्या आरोग्याचा विचार करून IPL सामने 15 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला.

तिरंदाजी

ISSF इंटरनॅशनल सॉलिडॅरिटी चॅम्पियनशिप पुढे ढकलण्यात आलीय. ही स्पर्धा बांगलादेशची राजधानी ढाका इथं 22 ते 28 फेब्रुवारीला नियोजित होती.

चीनमधील शांघाय इथं 4 मे 2020 पासून नियोजित असणारी आगामी अर्चरी विश्वचषक स्पर्धा रद्द करण्यात आलीय.

फॉर्म्युला वन

फॉर्म्युला वन - ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये 15 मार्च रोजि नियोजित ऑस्ट्रेलियन ग्रां. प्रि. स्पर्धेतून मॅकलॅरेन या रेसिंग टीमनं माघार घेतलीय.

फॉर्म्युला वन - 19 एप्रिल रोजी साखीरमध्ये होणाऱ्या बहारीन ग्रां. पि. स्पर्धा प्रेक्षकांविना होईल.

फॉर्म्युला वन - 19 एप्रिल रोजी शांघायमध्ये होऊ घातलेली चिनी ग्रां. पि. स्पर्धा पुढे ढकलण्यात आलीय.

टेबल टेनिस

22 ते 29 मार्च दरम्यान नियोजित असलेली वर्ल्ड टीम चॅम्पियनशिप पुढे ढकलण्यात आलीय. ही चॅम्पियनशिप आता 21 ते 28 जून दरम्यान होणार आहे.

तसंच, 21 ते 26 एप्रिल दरम्यान होणाऱ्या जपान ओपन स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यात, तर साऊथ कोरिया ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन स्थगित करण्यात आल्यात.

टेनिस स्पर्धा

फेड अप कप या महिलांच्या टेनिस स्पर्धेचे अंतिम सामने पुढे ढकलण्यात आले आहेत. 14 ते 19 एप्रिल 2020 दरम्यान या स्पर्धेची अंतिम फेरी होणार होती.

असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स आणि इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन यांनी पुढील सहा आठवड्यांमधील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

वुमन्स टेनिस असोसिएशनची चीनमधील शिआन ओपन स्पर्धा रद्द करण्यात आलीय.

हेही नक्की वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)