U19 वर्ल्ड कप: बांगलादेश चॅम्पियन; टीम इंडियाची झुंज अपयशी

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

गतविजेत्या टीम इंडियाला चीतपट करत बांगलादेशने पहिल्यांदा U19 वर्ल्ड कप जेतेपदावर नाव कोरलं. बांगलादेशने भारताला 177 धावांतच गुंडाळलं. या छोट्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची घसरगुंडी उडाली मात्र अकबर अलीने संयमी खेळी करत संघाला पहिलंवहिलं विश्वविजेतेपद मिळवून दिलं. बांगलादशने ही मॅच 3 विकेट्सने हा सामना जिंकला.

बांगलादेशने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा यांच्या दमदार भागीदारीनंतर बांगलादेशने टिच्चून बॉलिंग करत भारताच्या डावाला खीळ घातली.

भेदक बॉलिंग आणि त्याला मिळालेली सुरेख फिल्डिंगची साथ यामुळे बांगलादेशने भारताला दोनशेचा टप्पाही ओलांडू दिला नाही.

बांगलादेशतर्फे अविषेक दासने 3 तर शोरीफुल इस्लाम आणि तांझीम हसन साकीब यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

बांगलादेशने चांगली सुरुवात केली. मात्र रवी बिश्नोईचा पहिला स्पेल 6-1-15-4 असा होता. तांझिद हसन, महमदुल हसन जॉय, तौहीद हिदोय आणि कर्णधार शहादत होसेन यांना तंबूचा रस्ता दाखवला.

मात्र परवेझ होसेन इमॉनने 47 तर अकबर अलीने 43 धावांची दिमाखदार खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

बांगलादेशने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. दिव्यांश सक्सेना केवळ 2 रन्स करून बाद झाला. यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 94 रन्सची भागीदारी केली. तान्झीमच्या बॉलिंगवर शोरीफुल इस्लामने अफलातून कॅच टिपत तिलकला माघारी धाडलं.

रकीबुल हसनच्या फिरकीसमोर प्रियम गर्गने शरणागती पत्करली. त्याने केवळ 7 रन्स केल्या. शोरीफुल इस्लामने भरवशाच्या आणि शतकाकडे कूच करणाऱ्या यशस्वी जैस्वालला आऊट केलं. यशस्वीने 8 फोर आणि एका सिक्ससह 88 धावांची मॅरेथॉन खेळी केली.

पुढच्याच चेंडूवर सिद्धेश वीर एलबीडब्ल्यू झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही.

श्रीलंकेविरुद्ध दमदार सलामी

टीम इंडियाने सलामीच्या लढतीत श्रीलंकेविरुद्ध 297 धावांची मजल मारली. यशस्वी जैस्वाल, प्रियम गर्ग आणि ध्रुव जुरेल यांनी अर्धशतकी खेळी केल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताने श्रीलंकेचा डाव 207 धावांतच गुंडाळला. भारतातर्फे आकाश सिंग, सिद्धेश वीर, रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

जपानचा धुव्वा

दुसऱ्या लढतीत टीम इंडियाने जपानचा 41 धावांतच खुर्दा उडवला. नवख्या जपानच्या एकाही बॅट्समनला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. रवी बिश्नोईने 8 ओव्हर्समध्ये 3 मेडनसह केवळ 5 रन्स देत 4 विकेट्स पटकावल्या. कार्तिक त्यागीने 3 तर आकाश सिंगने 2 विकेट्स घेत रवीला चांगली साथ दिली.

डकवर्थ लुईसची मदत; रवी बिश्नोई चमकला

न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत भारतीय संघाने डकवर्थ लुईस प्रणालीच्या बळावर बाजी मारली. भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना बिनबाद 115 अशी मजल मारली. यशस्वी जैस्वालने 57 तर दिव्यांश सक्सेनाने 52 धावांची खेळी केली.

पावसाच्या व्यत्ययामुळे न्यूझीलंडला 192 धावांचे लक्ष्य देण्यात आले. मात्र त्यांचा डाव 147 धावांतच आटोपला. रवी बिश्नोईने 4 तर अथर्व अंकोलेकरने 3 विकेट्स घेतल्या.

दमदार सांघिक प्रदर्शन

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 233 धावांची मजल मारली. यशस्वीने 62 तर सातव्या क्रमांकावर बॅटिंग करणाऱ्या अथर्व अंकोलेकरने 55 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने 159 धावांतच शरणागती पत्करली. फॅनिंगच्या 75 रन्सचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही.

कार्तिक त्यागीने 4 तर आकाश सिंगने 3 विकेट्स घेत या विजयात निर्णायक भूमिका बजावली. या विजयासह टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये धडक मारली.

पाकिस्तानवर 'यशस्वी' मात

पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाच्या बॉलर्सनी भेदक बॉलिंग केली. यामुळे पाकिस्तानचा डाव 172 धावांतच आटोपला. पाकिस्तानचा कर्णधार रोहैल नझीरने 62 तर हैदर अलीने 56 धावांची खेळी केली. या दोघांना अन्य बॅट्समनची साथ मिळाली नाही. भारतातर्फे सुशांत मिश्राने 3 तर कार्तिक त्यागी आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना यशस्वी जैस्वालच्या दिमाखदार शतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने एकही विकेट न गमावता लक्ष्य गाठलं. त्याने 8 फोर आणि 4 सिक्सेससह नाबाद 105 धावांची खेळी केली. दिव्यांश सक्सेनाने 6 फोरसह 59 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली.

भारत-बांगलादेश समोरासमोर

भारत आणि बांगलादेश U19 वर्ल्ड कप स्पर्धेत चारवेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 3 तर बांगलादेशने एक लढत जिंकली आहे. आकडेवारीच्या तुलनेत भारताचं पारडं जड आहे मात्र बांगलादेशचा संघ यंदाच्या स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

इतिहास टीम इंडियाच्या बाजूने

टीम इंडियाने 2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये जेतेपदावर नाव कोरलं आहे. बांगलादेशने आतापर्यंत एकदाही विश्वविजेतेपदावर नाव कोरलेलं नाही. जेतेपद आपल्याकडेच राखण्यासाठी भारतीय संघ आतूर आहे तर पहिलंवहिलं जेतेपद पटकावण्यासाठी बांगलादेशचा संघ उत्सुक आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)