You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पोलिसांना एका लॉरीमध्ये सापडले तब्बल 39 मृतदेह
लंडनच्या एसेक्स भागात पोलिसांना एका लॉरीमध्ये तब्बल 39 मृतदेह सापडले आहेत.
ग्रेजमधल्या वॉटरग्लेड इंडस्ट्रीअल पार्कमध्ये अॅम्ब्युलन्स सेवेकडून पोलिसांना फोन करून ही माहिती देण्यात आली.
लॉरीच्या चालकाला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर खुनाचा संशय आहे. लॉरीचा 25 वर्षीय चालक उत्तर आयर्लंडचा आहे.
ही लॉरी बल्गेरियातून हॉलिहेडमार्गे शनिवारी ब्रिटनमध्ये आल्याचं एसेक्स पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार लॉरीमध्ये 38 प्रौढ माणसं आणि एक किशोरवयीनचा मृतदेह आहे.
पोलीस अधीक्षक अँड्रू मार्निअर यांनी मृतांची ओळख पटवण्याचे आदेश पोलिसांना दिले होते, परंतु ही प्रक्रिया फारच गुंतागुंतीची आहे, असं त्यांनी सांगितलं.
पोलिसांनी लॉरी ताब्यात घेतली असून, वॉटरग्लेट इंडस्ट्रीअल पार्क सध्या बंद करण्यात आलं आहे.
पत्रकार परिषद घेऊन लवकरच याबाबत अधिक माहिती देण्यात येईल, असं एसेक्स पोलिसांनी सांगितलं आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. याप्रकरणी त्यांनी ट्वीटही केले आहे, "मी गृह मंत्रालय आणि एसेक्स पोलिसांबरोबर सतत संपर्कात आहे आणि या प्रकरणातील खरा गुन्हेगार लवकरात लवकर पकडण्यात येईल," असं त्यांनी म्हटलं आहे.
ब्रिटनच्या गृहमंत्री आणि एसेक्सच्या खासदार प्रीति पटेल यांनीही ट्वीट केलं आहे, यात त्या म्हणतात की, "या घटनेचा मला धक्का बसला आहे. पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांना हा तपास पूर्ण करण्याची पूर्ण सूट मिळायला हवी."
थुरॉकचे खासदार डोएल प्रिंस म्हणाले की, "मानवी तस्करी अतिशय वाईट आणि भयंकर व्यवसाय आहे.''
या प्रकरणी पोलीस खऱ्या गुन्हेगाराला पकडतील अशी त्यांना आशा वाटते.
काही वर्षांपूर्वी जून 2000 मध्ये डोव्हरमध्ये एका ट्रकमध्ये अशाच प्रकारे 58 चिनी प्रवाशांचे मृतदेह सापडले होते.
या प्रकरणी ट्रक चालकाला या गुन्ह्यासाठी शिक्षा सुनावण्यात आली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)