You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रॉबर्ट मुगाबे: झिंबाब्वेच्या राष्ट्रपतींचं 95 व्या वर्षी निधन
रॉबर्ट मुगाबे, झिंबाब्वेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेले देशाचे पहिले पंतप्रधान, यांचं आज 95 व्या वर्षी निधन झालं आहे. एप्रिल महिन्यापासून त्यांना सिंगापूरमधल्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं.
नोव्हेंबर 2017 मध्ये झालेल्या एका अंतर्गत बंडानंतर त्यांना पदच्युत करण्यात आलं होतं. ते जवळपास 3 दशकं सत्तेत होते.
स्वातंत्र्यानंतर झिंबाब्वेमध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकांमध्ये ते विजयी झाले होते. 1980 साली ते पंतप्रधान बनले. त्यांनी 1987 साली पंतप्रधान पदच रद्द केलं आणि ते स्वतः राष्ट्राध्यक्ष बनले.
आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसात मुगाबे यांनी कृष्णवर्णीय समुदायासाठी आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा पुरवण्यासाठी जी पावलं उचलली त्यांचं कौतुक झालं. पण त्यांनी जमिनीसंदर्भात जे वादग्रस्त कायदे आणले त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था बिघडली. त्यांच्या कारकिर्दीचा उत्तरार्ध आपल्या अधिकारांचा गैरवापर आणि भ्रष्टाचारांच्या आरोपांनी व्यापला होता.
त्यांचे उत्तराधिकारी आणि झिंबाब्वेचे सध्याचे राष्ट्रपती एमर्सन म्नंग्वावा यांनी मुगाबे यांच्या मृत्यूबद्दल अतिव दुःख व्यक्त केलं आहे. मुगाबे झिंबाब्वेचे राष्ट्रपिता आणि इथल्या लोकांसाठी स्वातंत्र्याचं प्रतीक होते असंही म्नंग्वावा यांनी म्हटलं.
मुगाबे यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1924 साली तत्कालील ऱ्होडेशियामध्ये झाला होता.
ऱ्होडेशियामध्ये एका दशकाहून अधिक काळ त्यांनी तुरुंगात व्यतीत केला. सरकारवर टीका केल्याप्रकरणी त्यांना 1964 साली कोणत्याही खटल्याशिवाय तुरुंगात पाठवण्यात आलं होतं.
सन 1973 मध्ये ते तुरुंगात असतानाच त्यांना झिंब्बाब्वे आफ्रिकन नॅशनल युनियन (झानू)चे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. झानूची स्थापन करणाऱ्यांपैकी मुगाबे एक होत.
झिम्बाब्वेचं भारतीय कनेक्शन
झिम्बाब्वेच्या स्वातंत्र्य लढ्याला भारताने पाठिंबा दिला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी झिम्बाब्वेच्या स्वातंत्र्य सोहळ्याला 1980मध्ये हजेरी लावली होती.
दोन्ही देशांच्या उच्चपदस्थांनी आतापर्यंत अनेकदा एकमेकांच्या देशांना भेटी दिल्या आहेत. यामध्ये द्विपक्षी चर्चा किंवा NAM,CHOGM आणि G-15 सारख्या परिषदांना लावलेली हजेरी याचाही समावेश आहे.
UNGA आणि NAM परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी 2003 साली अध्यक्ष मुगाबेंना दोनदा भेटले. दिल्लीमध्ये 2015मध्ये झालेल्या IAFS - IIIसाठी माजी अध्यक्ष मुगाबे उपस्थित होते.
इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनी (IRCON), रेल इंडिया टेक्निकल अॅण्ड इकॉनॉमिक सर्व्हिसेस (RITES), वॉटर अॅण्ड पॉवर कन्सलटन्सी सर्व्हेसेस (WAPCOS) आणि टेलीकम्युनिकेशन्स इंडिया लिमिटेड (TCIL) या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या झिम्बाब्वेमध्येही कार्यरत आहेत. किर्लोस्कर आणि जैन इरिगेश कंपन्या झिम्बाब्वेला पंप आणि पाणीपुरवठा यंत्रणा पुरवतात. भारतीय फार्मा कंपन्याही झिम्बाब्वेच्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत असून झिम्बाब्वेच्या बाजारामध्ये भारतीय बनावटीची औषधं अगदी सहजपणे मिळतात.
एप्रिल 2018मध्ये व्हिक्टोरिया फॉल्सजवळच्या हवांग थर्मल पॉवर स्टेशनच्या चार युनिट्सच्या दुरुस्तीच्या कामाचं कंत्राट चढ्ढा पॉवर ऑफ इंडिया कंपनीला मिळालं.
1890पासूनच भारताचं अस्तित्व झिम्बाब्वेमध्ये पहायला मिळतं. 1890मध्ये वर्णभेदी असलेल्या दक्षिण आफ्रिकेतून भारतीय कामगार तेव्हाच्या दक्षिण ऱ्होडेशियाममध्ये गेले होते. सध्याच्या घडीला भारतीय वंशाच्या झिम्बाब्वेच्या नागरिकांची संख्या 9000च्या आसपास असल्याचा अंदाज आहे.
यातले बहुतेक सर्वजण गुजरातचे आहेत. धर्माच्या आधारावर आता हा समाज एकत्र आला असून झिम्बाब्वेमध्ये सर्वांसोबत गुण्यागोविंद्याने राहतो. भारतीय वंशाचा हा समाज मुख्यतः व्यापार आणि आयात-निर्यात व्यवसायात असून बहुतेकांची तरूण पिढी नोकरीच्या चांगल्या संधींच्या शोधात देशाबाहेर पडलेली आहे.
भारतीय वंशाच्या शेकडो लोकांकडे ब्रिटीश वा ऑस्ट्रेलियन पासपोर्ट आहेत. तर तिथे नोकरी करणाऱ्या भारतीयांची संख्या 500च्या घरात आहे. त्यातल्या काही जणांकडे दीर्घकालीन व्यापारी परवाना किंवा कामासाठीचा परवाना आहे. यातले बहुतेकजण कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, अकाऊंटन्सी आणि बँकिंग क्षेत्रात काम करतात.
एकंदरीतच भारतीयांना झिम्बाब्वेमध्ये मान आहे आणि त्यांच्यासोबत सर्वांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. सिनेटर के. जी. पटेल हे सध्या सरकारमध्ये असणाऱ्या पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे आणि मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य होते.
2011मध्ये त्यांचं निधन झालं. आणि 2012मध्ये त्यांना 'हिरोचा' मान देण्यात आला. भारत पटेल हे झिम्बाब्वेच्या सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत. त्यांची 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
निवृत्त न्यायमूर्ती अहमद इब्राहीम यांचा 2004च्या प्रवासी भारतीय संमेलनात गौरव करण्यात आला होता. झिम्बाब्वेच्या संसदेचे सदस्य म्हणून राज मोदी यांची दक्षिण बुलावायो मधून निवड झाली. सप्टेंबर 2018मध्ये त्यांची उद्योग आणि वाणिज्य खात्याचे उपमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)