You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोकाट मांजरींना खाऊ घातलं म्हणून या आज्जींना मिळाली 10 दिवसांची शिक्षा
79 वर्षांची एक महिला मोकाट मांजरांना खाऊ घालत असल्याचं अमेरिकेतल्या ओहायोमध्ये पोलिसांनी अनेक वेळा पाहिलं होतं. याबद्दल या महिलेला 10 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नॅन्सी सेगुला या मोकाट मांजरींविषयी 2015पासून अधिकाऱ्यांकडे तक्रारी करत आहेत. तर पूर्वीचे शेजारी या मांजरींना सोडून निघून गेल्याचा सेगुलांचा दावा आहे.
"मला मांजरी आवडतात," कायाहोगा काऊंटी जेलमध्ये आपल्या तुरुंगवास भोगावा लागणार असल्याचं समजल्यानंतर क्लिव्हलंडमधल्या फॉक्स 8 चॅनलशी बोलताना त्यांनी सांगितलं.
11 ऑगस्टपासून सेगुला यांचा हा तुरुंगवास सुरू होणार असल्याचा निर्णय न्यायाधीशांनी सुनावला आहे.
नॅन्सी सेगुलांच्या शेजाऱ्यांनी या बाईंच्या घराच्या परिसरात भरपूर मांजरी असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर गेल्या 4 वर्षांमध्ये पोलिसांनी त्यांना चारदा या मांजरींना खाऊ घालताना पाहिलं.
नेमकं काय घडलं?
क्लिव्हलंडचं उपनगर गार्फिल्ड हाईट्समधल्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार 2015मध्ये स्थानिकांनी तिथल्या 'ऍनिमल वॉर्डन'शी संपर्क केला आणि सेगुला आणि मांजरींविषयीच्या या कायदेशीर वादाला सुरुवात झाली.
•जुलै 2015 मध्ये त्यांनी शहर कायदा 505.23चं उल्लंघन केल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आलं. या कायद्यानुसार मोकाट जनावरांना खाऊ घालण्यावर बंदी आहे.
•मे 2017मध्ये आपल्या घरी मांजरींना खाऊ घालण्याबद्दलचे विविध आरोप त्यांच्यावर लावण्यात आले.
•त्याच वर्षी जुलैमध्ये घरामध्ये जास्त मांजरी असल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आलं आणि त्यांना 'प्रोबेशन' कालावधी देण्यात आला.
•प्राण्यांच्या विष्ठेची योग्य रितीने विल्हेवाट न लावल्याचा आरोप त्यांच्यावर पुढच्या महिन्यात लावण्यात आला.
आपण अजूनही मांजरींना अन्न देत असल्याचं त्यांनी गेल्या आठड्यात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांसमोर मान्य केलं. आणि यामुळे न्यायालयाचा अवमान केल्यामुळे त्यांना 10 दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली.
"श्रीमती सेगुला यांना पोलिस खात्याने किंवा ऍनिमल वॉर्डन्सनी कधीही अटक केलेली नाही," लोकांकडून टीका करण्यात आल्यानंतर पोलिसांनी एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं.
'मला मांजरी आवडतात'
"आतापर्यंत सहा ते आठ मोठ्या मांजरी यायच्या आता काही पिल्लंही येतात," मंगळवारी क्लिव्हलंड.कॉमशी बोलताना सेगुलांनी सांगितलं.
"मला माझ्या मांजरींची आठवण येते, त्यांचा मृत्यू झाला, माझ्या नवऱ्याचंही निधन झालं. मी एकटी आहे. म्हणूनच मग या बाहेरच्या मांजरींची आणि पिलांचा मला आधार वाटतो. या मांजरी माझ्या घरी येतात, मग मला त्यांची दया येते आणि मी त्यांना काहीतरी खायला देते," त्यांनी सांगितलं.
या गुन्ह्यासाठी इतकी शिक्षा देणं योग्य नाही असं त्यांनी फॉक्स 8शी बोलताना सांगितलं. शिवाय याबद्दल त्यांनी आतापर्यंत 2000 डॉलर्सचा दंड भरल्याचंही त्या सांगतात.
"मी जे काही केलं त्यासाठी ही फार मोठी शिक्षा आहे. बाहेर अशी अनेक माणसं आहे जे वाईट गोष्टी करत आहेत," त्या म्हणतात. त्यांचा मुलगा डेव्ह पॉवलोव्हस्की यांनी चॅनलला सांगितलं, "माझी आई जे सांगत होती त्यावर माझा विश्वास बसत नव्हता. तिला काऊंटी जेलमध्ये 10 दिवस तुरुंगवास भोगावा लागणार आहे, हे अविश्वसनीय आहे."
"त्या तुरुंगामध्ये कायकाय चालतं याविषयी सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. आणि ते माझ्या 79 वर्षांच्या आईला तिथे पाठवणार आहेत?"
पण या सेगुला यांना तुरुंगावास भोगावा लागणार नाही याची पुसटशी शक्यता आहे.
गार्फिल्ड हाईट्स म्युनिसिपल कोर्टाच्या बेलिफ, जज जेनिफर विलर यांच्यामते दुसरी कोणती शिक्षा देणं शक्य आहे का हे ठरवण्यासाठी न्यायाधीश आणखी एक सुनावणी घेण्याच्या विचारात आहेत. शहराचे कायदे संचालक (Legal Director) टिम रायली म्हणतात, "सरकारी अधिकाऱ्यांना हे माहीत आहे की जनावरांबद्दल आणि पाळीव प्राण्यांबद्दल प्रेम असणारे अनेकजण आहेत."
"आम्हाला हे ही माहित आहे की असं न वाटणारेही अनेकजण आहेत," ते सांगतात. "शहरामध्ये नियमांची अंमलबजावणी करणं आणि त्रासदायक समस्यांचं निराकरण करणं " इतकाच यामागचा हेतू असल्याचंही ते सांगतात.
सेगुलांच्या घरातून आतापर्यंत 22 मांजरी काढण्यात आल्याचं रायली यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)