You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'आमच्या परी आणि मंजुळा या दिवाळीत मनमोकळं बागडतील'
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
दुपारची वेळ असते, गल्लीच्या कोपऱ्यात कोणाचाही नसणारा पण येता-जाता सगळ्याच्या हातून पारले-जी खाणारा मोत्या निवांत बसलेला असतो आणि अचानक आवाज होतो धडाम...
मोत्या जीव खाऊन पळत सुटतो, शेपटीतून बहुधा रक्तही येत असतं, मोठ्या आवाजामुळे त्याला काही कळत नसतं आणि मागे टारगट पोरं हसत असतात.
दिवाळीच्या आगे-मागे आपल्या आसपास दिसणारं हे प्रातिनिधिक चित्र.
आणि समजा अगदी कोणी कुत्र्यांच्या शेपटीला फटाके जरी बांधले नाहीत तरी कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने त्यांना होणारा त्रास तर टाळता येत नाहीच.
कोल्हापूरला प्राण्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या दीपा शिपूरकर सांगतात की, "फटाक्याच्या आवाजाचे प्राण्यांवर दुष्परिणाम होतात. मोठ्या आवाजाने प्राणी प्रचंड बावचळून जातात. त्यांना काय घडतंय ते कळत नाही आणि अनेकदा ते बहिरेही होतात."
दीपा यांनी अनेक मांजरी पाळल्या आहेत आणि रस्त्यावरच्या अनेक भटक्या कुत्र्यांच्या त्या पालक आहेत. दिवाळीत फटाक्यांच्या वापरावर निर्बंध यावेत, जेणेकरून प्राण्यांना कमी त्रास होईल यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आहेत.
सुप्रीम कोर्टाने मंगळवारी, 23 ऑक्टोबर रोजी फटाक्यावर पूर्णपणे बंदी घालण्याची याचिका फेटाळून लावली. तसंच, फटाके वाजवण्यासाठी दिवाळीच्या काळात रात्री 8 ते 10ची वेळ ठरवून दिली आहे.
मुके प्राणी त्यांना होणाऱ्या त्रासाविषयी बोलू शकत नाहीत.
"फटाक्यांच्या आवाजाने प्राणी खूप घाबरून जातात. अनेकदा तर पिल्लांचा मृत्यू झाल्याचंही दिसून आलं आहे. माझी मांजरं सहसा बाहेर खेळत असतात. पण दिवाळीच्या काळात ती बाहेर पडत नाहीत. बेडरूममध्येच लपून बसतात. त्यांचं जेवणावरून लक्ष उडतं आणि ती खूप आक्रमकही होतात."
कुत्र्या-मांजरांना तसंच इतर प्राण्यांना होणारा त्रास पाहून दीपा काळजीत असल्या तरी सुप्रीम कोर्टाच्या निकालाने त्या आनंदी आहेत.
"फटाक्यांच्या कालावधी मर्यादित झाला तरी खूप आहे. तेवढे दोन तास सोडले तर दिवसभर फटाके वाजत नाही हे कळलं तरी प्राण्याचा त्रास बराच कमी होऊ शकतो. जर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी झाली तर माझी मांजरं, परी आणि मंजूळा तसंच प्लुटो कुत्रा यांना दिवाळीतही मनमोकळं बागडता येईल. थोडा काळ वगळता त्याच्या स्वातंत्र्यावर घाला येणार नाही," त्या सांगतात.
अंमलबजावणी होणार का?
कोर्टाचा निर्णय कितीही चांगला असला तरी त्याने विशेष फरक पडणार नाही, असं नाशिकच्या प्राणिमित्र सुखदा गायधनींना वाटतं. अडचणीत सापडलेल्या प्राण्यांना सुखदा मदत करतात. तसंच त्या 'शरण' या प्राण्यांच्या संस्थेसाठी कामही करतात.
"दोन मिनिटं असो वा दोन तास प्राण्यांना आवाजाचा जो त्रास होणार तो होणारच आहे. दुसरं म्हणजे या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होणार का?"
"मला वाटतं, फटाके वाजवण्याची एखादी वेळ निर्धारित करण्यापेक्षा एखादी जागा ठरवून द्यावी. सगळ्यांना तिथेच फटाके वाजवणं बंधनकारक असावं, म्हणजे शहरात इतर ठिकाणी प्राण्यांना त्रास होणार नाही."
तज्ज्ञांचं म्हणणं काय?
फक्त कुत्रे-मांजरीच नाहीत तर अनेक प्राणी आणि पक्ष्यांना मोठ्या आवाजाचा त्रास होतो. "फटाक्यांच्या आवाजाने पक्षी त्यांचं दिशाज्ञान गमावतात. ते त्यांच्या जीवावर बेतू शकतं," ठाण्यातले व्हेटरनरी डॉ. किरण शेलार सांगतात.
"कुत्र्या-मांजरांची आवाज ऐकण्याची क्षमता माणसांपेक्षा अनेकपटींने जास्त असते. त्यामुळे आपल्याला हळू वाटणारा आवाज त्यांच्यासाठी फार मोठा असतो, मग फटक्यांचा आवाज ऐकून त्यांचं काय होत असेल याची कल्पनाही न केलेली बरी. मोठ्या आवाजामुळे कुत्र्यांची अस्वस्थता वाढते. त्यांच्या मनावरही याचा ताण येतो. मांजरींवर जास्त ताण येतो."
केवळ ध्ननीप्रदूषणाच नव्हे तर फटाक्यांमुळे होणाऱ्या हवेतल्या प्रदूषणाचाही प्राण्यांना त्रास होतो.
"त्यांना श्वसनाचे रोग जडतात. विशेषतः ज्या प्राण्यांना दमा असेल त्यांना जास्त त्रास होतो," डॉ. शेलार यांनी सांगितलं.
अशा परिस्थितीत उपाय काय?
घरातल्या पाळीव प्राण्यांना त्रास होऊ नये असं वाटत असेल तर निदान आपण स्वतः तरी फटाके वाजवून ध्वनी आणि वायू प्रदूषणात भर घालू नये, असा सल्ला डॉ. शेलार देतात.
"फटाक्यांचा घरातल्या पाळीव प्राण्यांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणून त्यांना अशा खोलीत ठेवता येईल जिथे कमीत कमी आवाज पोहोचतो. जमल्यास दारं खिडक्या बंद ठेवाव्यात आणि त्यांची काळजी घ्या."
"पण कधी कधी मात्र काही प्राण्यांना हा आवाज सहन करणं अगदी अशक्य होतं. त्यांच्यावर फटाक्यांच्या आवाजाचा वाईट परिणाम होतो, अशावेळेस आम्ही त्यांना काही औषध देतो त्यानं हे प्राणी शांत होतात," असं डॉ. शेलार म्हणाले.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय?
फटाके विक्री तसंच ते वाजवण्याचा काळ याबद्दल सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. फटाक्यांच्या विक्रीवर सरसकट बंदीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती अर्जन कुमार सिक्री यांनी हा निर्णय दिला.
पर्यावरणाची हानी करणार नाहीत, अशा हरित स्वरूपाच्या फटाक्यांचीच विक्री करता येईल, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.
फटाके विक्री आणि वाजवण्याला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. मात्र ते करण्यासाठी नियमांची चौकट आखून दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)