You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिकागोत गोळीबारात 4 ठार; अमेरिकेत वर्षात गोळीबारात 13 हजार मृत्यू
अमेरिकेतील शिकागो शहरातील एका हॉस्पिटलमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी ठरलेल्यांमध्ये हॉस्पिटलचे दोन कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि गोळीबार करणारा हल्लेखोर यांचा समावेश आहे.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये हॉस्पिटलमधील एक डॉक्टर आणि फार्मासिटीकल सहाय्यक यांचा समावेश आहे. महापौर रहम इम्यॅन्युअल यांनी ही माहिती दिली.
हल्लेखोर आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत हल्लेखोर ठार झाला.
हल्लेखोराला एका महिलेला लक्ष्य करायचे होते. हल्लेखोर आणि या महिलेचे कथित संबंध होते. मात्र अंदाधुंद गोळीबारामागचा हा उद्देश होता की नाही हे पोलिसांनी स्पष्ट केलं नाही.
नक्की काय घडलं?
शिकागोमधल्या मर्सी हॉस्पिटलमध्ये रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
कार पार्किंगमध्ये एकमेकांना ओळखणाऱ्या व्यक्तींमध्ये सुरू झालेल्या वादाचं पर्यावसान चकमकीत झालं.
हल्लेखोराने महिलेला लक्ष्य करत तिच्या दिशेने गोळाबार केला. हल्लेखोर महिलेला ओळखत असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली. महिलेच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर हॉस्पिटलच्या बिल्डिंगमध्ये शिरला. हल्लेखोराला पाहून पोलिसांचा ताफाही बिल्डिंगच्या दिशेने सरसावला. एकमेकांच्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या.
हॉस्पिटलमधील अन्य रुग्णांचा जीव वाचवण्याच्या दृष्टीने मर्सी हॉस्पिटलमधील माणसांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, त्यामुळे अन्य रुग्ण तसंच कर्मचाऱ्यांचे जीव वाचले असं हॉस्पिटल प्रशासनाने स्पष्ट केलं.
घटनास्थळाच्या छायाचित्रांमध्ये लोक सैरावैरा पळत असल्याचं दिसत होतं.
पीडित कोण?
या हल्ल्यात सॅम्युअल जिम्नेझ या अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. कठीण प्रसंगातही सॅम्युअल यांनी प्रसंगावधान दाखवत हॉस्पिटलमधील रुग्ण तसेच कर्मचाऱ्यांचे जीव वाचवण्याकरता प्रयत्न केले. कर्तव्य निभावत असतानाच त्यांचे निधन झाले.
हल्लेखोराने एलिव्हेटरमधून बाहेर पडणाऱ्या महिलेच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला.
गोळीबाराची गंभीर समस्या
सोमवारी अमेरिकेत अशाच स्वरूपाच्या दोन घटनांची नोंद झाली. फिलाडेल्फिया प्रांतात पेनिनस्युइलामध्ये गोळीबारात चारजणांनी जीव गमावला.
डेन्वर येथे गोळीबारात एकाचा मृत्यू झाला.
अमेरिकेत यंदा अशा स्वरूपाच्या गोळीबारात 13,000 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. Gun violence archive या संघटनेने गोळीबारासंदर्भात ही आकडेवारी सादर केली आहे.
गोळीबारात 25,000 नागरिक जखमी झाले असून, अडीचशे पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)