भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांची कामाची पद्धत कशी आहे?

    • Author, नितीन श्रीवास्तव,
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, ऑस्ट्रेलियाहून.
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरातून अडिलेडला जाण्यासाठी क्वांटस एअरवेजच्या विमानाने उड्डाण भरलं.

विमान पूर्ण भरलेलं होतं. भारतीय क्रिकेट संघही या विमानात होता. एका दिवसापूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यानंतर खेळाडू थोड्या विश्रांतीच्या मूडमध्ये होते. विमान चार तासांचं होतं.

पण इकॉनॉमी सेक्शनच्या एका कोपऱ्यावर बसलेल्या एका व्यक्तीने विमानाने उड्डाण घेताच आपला लॅपटॉप उघडलेला होता. बराच वेळ तो लॅपटॉपवर काहीतरी करत होता.

दरम्यान, बिझनेस क्लासमधून उठून भारतीय कर्णधार रोहित शर्मा त्या व्यक्तीकडे आला. काही गोष्टींवर चर्चा केली आणि परत गेला. राहुल द्रविड यांची काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे.

सरावादरम्यान प्रत्येक खेळाडूवर लक्ष

राहुल द्रविड नेट्समध्ये तासनतास फलंदाजीचा सराव करण्यासाठी ओळखले जायचे. त्याच पद्धतीने प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड आजही सराव तितक्याच गांभीर्याने घेतात.

नेट्समध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम खेळाडूचं निरीक्षण करणं, सल्ला देणं या गोष्टी ते करतात. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे हेसुद्धा यादरम्यान त्यांच्यासोबत असतात.

पर्थमध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला पराभूत केलं. पण भारतीय फलंदाजी संपल्यानंतर मध्यांतरादरम्यान खेळाडू क्षेत्ररक्षणाचा सराव करत होते. तेवढ्यात राहुल द्रविड आले आणि त्यांनी के. एल. राहुलला स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा सराव दिला.

दक्षिण आफ्रिकेचा डाव सुरू होऊन एकच षटक संपलं होतं. अर्शदीप सिंहने टाकलेल्या एका आऊटस्वींग चेंडूने क्विंटन डीकॉकच्या बॅटची कड घेतली आणि चेंडू थेट स्लिपच्या दिशेने गेला. तिथेच उभ्या असलेल्या के. एल. राहुल हा कॅच अलगद टिपला.

खेळाडूंसोबत डगआऊटमध्ये बसलेल्या राहुल द्रविड यांनी मोठ्या स्क्रिनवर हा कॅच पुन्हा एकदा पाहिला. त्यानंतर सामन्यावर लक्ष केंद्रीत केलं.

राहुल द्रविडसोबत क्रिकेट खेळलेला तसंच आता त्यांच्याकडून प्रशिक्षणाचे धडे घेत असलेला वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी म्हणतो, "आता राहुल द्रविड सेट झाले आहेत."

डॅरेन सॅमी म्हणाला, "द्रविडसारखे मेहनती खेळाडू खूपच कमी पाहिले आहेत. त्याच पद्धतीने त्यांनी ज्युनियर संघाचं प्रशिक्षण केलं होतं. आता त्यांना शिकवताना त्यांच्या संघात अर्ध्याहून अधिक सुपरस्टार खेळाडू आहेत. हे मोठं आव्हान आहे."

आव्हानात्मक वेळी संघाच्या प्रशिक्षकपदी

पर्थ ते अडिलेडच्या विमानात एकीकडे राहुल द्रविड बसून काम करत होते. त्याच वेळी विमानात बिझनेस क्लासच्या पहिल्या सीटवर माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीसुद्धा होते.

ज्या परिस्थितीत राहुल द्रविड यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ते खूपच आव्हानात्मक मानलं जाईल.

डिसेंबर 2021 मध्ये प्रशिक्षक म्हणून आपल्या पहिल्याच दौऱ्यावर जाण्यापूर्वी ते म्हणाले होते, "आम्ही 18 खेळाडूंना घेऊन जात आहोत. सगळेच सर्वोत्तम आहेत. पण फक्त 11 खेळाडूच सामन्यात खेळू शकतात. खेळू न शकलेल्या खेळाडूंमध्ये नाराजी असते. कधी कधी खेळाडूंना कठोर शब्दांत बोलावं लागतं. आपण सगळे प्रोफेशनल आहोत."

भारताच्या कसोटी किंवा वनडे टीमवर नजर टाकल्यास राहुल द्रविडसमोरील आव्हानांचा आपल्याला अंदाज येईल.

जुन्या-नव्या खेळाडूंना एकजूट ठेवण्याचं आव्हान

गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी दौऱ्यात गेलेल्या 18 पैकी 7 खेळाडूंचं वय 30 पेक्षा जास्त होतं. सध्या ऑस्ट्रेलियात खेळवल्या जात असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघात 8 खेळाडू 30 पेक्षा जास्त वयाचे आहेत.

स्वाभाविकपणे राहुल द्रविडला स्टार खेळाडूंना एकजूट ठेवायचं आहे. तसंच संघात युवा खेळाडूंना स्थान मिळावलं यासाठी काही कठोर निर्णयही घ्यायचे आहेत.

क्रिकेटवर लिहिणारे आणि पाकिस्तानचे क्रीडा पत्रकार शाहीद हाश्मी म्हणतात, "राहुल द्रविड खेळत असताना माझे त्यांच्याबाबत जे विचार होते, तेच अजूनही कायम आहेत."

ते पुढे म्हणतात, "द्रविड इतके मोठे खेळाडू होते की कसोटी आणि वनडेमध्ये मिळून त्यांनी 23 हजारपेक्षा जास्त धावा बनवलेल्या आहेत. तुम्ही विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंचे प्रशिक्षक असता, तेव्हा तुमच्याकडे अशा कामगिरीचा इतिहास असणं महत्त्वाचं असतं. द्रविड यांच्याकडे अनुभव आहे, यश आहे तसंच ग्लॅमरसुद्धा त्यांनी खूप पाहिलं आहे. ते फक्त कामावरच लक्ष केंद्रीत करतील."

राहुल द्रविड यांचं संघासोबतचं बाँडिंगसुद्धा विशेष मजबूत दिसून येत आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीच्या तीन सामन्यात के. एल. राहुल फ्लॉप ठरला. टीका आणि दबावाच्या ओझ्याखाली त्याला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वगळलं असतं तर चौथ्या सामन्यात त्याला अर्धशतकी खेळी करण्याची संधी मिळाली नसती.

विराट कोहली फॉर्मात येण्याच्या कहाणीमध्येही राहुल द्रविडचा सहभाग दिसून येतो. द्रविडने गेल्या वर्षी सातत्याने कोहलीला पाठिंबा दिला. आशिया कपमध्ये विराट कोहली फॉर्मात परतला.

कोहली नेट्समध्ये सराव करत असताना राहुल द्रविड त्याचं निरीक्षण करत असतात. आवश्यक सल्लाही ते कोहलीला देत असतात.

सामन्यादरम्यान ड्रिंक्स ब्रेक किंवा ओव्हर ब्रेकमध्येही द्रविड धावून मैदानात जातात आणि आवश्यक सूचना करतात.

सध्या राहुल द्रविड ज्याप्रकारे विजयाचा आनंद व्यक्त करतात. खरं तर त्यांच्या शांत स्वभावापेक्षा ते वेगळं आणि नवं आहे.

माजी कर्णधार आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष के. श्रीकांत यांच्या मते, "राहुल द्रविडचा आत्मविश्वास हाच त्यांच्या जमेची बाजू आहे. मोठे निर्णय घेण्यासाठी तो नेहमीच गरजेचा असतो."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)