You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विजयापूर्वीच शशी थरुर गटाने केलेला 'हा' आरोप
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय झाला आहे. खर्गे यांना 7 हजार 897 मते मिळाली. तर शशी थरूर यांना 1072 मतेच मिळवता आली. त्यामुळे खर्गे यांच्या काँग्रेस अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झालं आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात झाली. परवा (17 ऑक्टोबर) या निवडणुकीसाठीचं मतदान झालं होतं. त्यानंतर आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
सध्या सोनिया गांधी या काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. 2001 साली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची शेवटची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या होत्या.
शशी थरूर यांनी मल्लिकार्जुन खरगेंचं अभिनंदन केलं असलं तरी थरुर कँपकडून या निवडणुकीत गोंधळ झाल्याचा आरोप केला आहे.
शशी थरूर यांच्या गटाने निकाल हाती येण्याआधीच या निवडणुकीची जबाबदारी सांभाळणारे काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहून निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
'उत्तर प्रदेशमध्ये मोठा घोटाळा'
थरुर कँपने आपल्या पत्रात आरोप लावताना म्हटलं आहे की, उत्तर प्रदेशात निवडणुकीदरम्यान नियमांचं पालन केलं गेलं नाही.
शशी थरुर यांचा दाखला देत काँग्रेस नेते सलमान सोझ यांनी म्हटलं, "आपल्या समर्थकांनी उत्तर प्रदेशमधे निवडणुकीदरम्यान घोटाळा केला असल्याची मल्लिकार्जुन खरगे यांना कल्पना होती की नाही याचा आमच्याकडे पुरावा नाही. जर त्यांना याची माहिती असती तर त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये हे काही होऊ दिलं नसतं. काँग्रेस पार्टीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या निवडणुकीवर त्यांनी हा डाग लागू दिला नसता."
मतपेटीवर अधिकृत शिक्का नाही
मतदान केल्यानंतर मतपेटीवर केंद्रीय निवडणूक यंत्रणेचा अधिकृत शिक्का मारून मतपेटी सील केली जावी, असं निवडणुकीसाठी बनवलेल्या नियम क्रमांक 14 अंतर्गत नमूद करण्यात आलं आहे. असं असतानाही उत्तर प्रदेशात या नियमाचं उल्लंघन करण्यात आल्याचं थरूर यांच्या गटानं लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
थरूर गटानं दावा केलाय की, "मतदानाच्या दिवशी आम्ही पीआरओ आणि एपीआरओ यांच्याकडे मतपेटी योग्यरित्या सील न करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर ते काम नंतर केले जाईल, असं आम्हाला सांगण्यात आलं. काही ठिकाणी पीआरओ, एपीआरओ, डीपीआरओ यांनी पोलिंग एजंट यांच्यासमक्ष सिरीयल क्रमांकासह अधिकृत शिक्का देण्याचं काम केलं नाही."
"प्रणव झा यांनी 17 ऑक्टोबर रोजी या विषयावर बोलताना म्हटलं होतं की, त्यांना केवळ अनधिकृत प्लास्टिकचे सील मिळाले आहेत. अशा कठीण परिस्थितीत तुमच्या ज्या कार्यालयानं निवडणूक घेतली, ते केवळ एका राज्यात पांढरे अनधिकृत सील पाठवेल, हे आम्ही स्वीकार करू शकत नाही."
मतदान केंद्रावर अनधिकृत लोकांची उपस्थिती
उत्तर प्रदेशातील मतदान केंद्रांवर अनधिकृत लोक उपस्थित होते, असंही या पत्रात लिहिलं आहे.
या पत्रात दावा करण्यात आलाय की, "निवडणूक नियमांनुसार, मतदान अधिकारी हे उमेदवाराच्या वतीने मतदान प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी एका पोलिंग एजंटला आणण्याची परवानगी देतात. यामुळे मतदानाची गुप्तता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. पण उत्तर प्रदेशात तीन अतिरिक्त लोक असे होते जे मतदान केंद्रात बसून पीठासीन अधिकाऱ्यासारखे वागत होते."
मतदान प्रक्रिया पूर्ण
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया 17 ऑक्टोबर रोजी पार पडली. या निवडणुकीत 96 टक्के मतदान झालं. या निवडणुकीत काँग्रेस प्रदेश समित्यांच्या 9,900 प्रतिनिधींपैकी 9,500 प्रतिनिधींनी मतदान केले. अनेक छोट्या राज्यांत 100 टक्के, तर मोठ्या राज्यांत जवळपास 90 टक्के मतदान झाले होते.
देशभरातील 40 केंद्रांवर 68 बूथ स्थापन करण्यात आले होते. राज्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडली.
9800 मतदार शशी थरुर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यापैकी एकाची निवड करतील. या निवडणुकीत भारत जोडो यात्रेच्या शिबिरात एक बूथ तयार करण्यात आला असून तेथे राहुल गांधी आणि सुमारे 40 मतदार मतदान करणार आहेत, असं सांगण्यात आलं होतं.
पक्षाच्या मुख्यालयात 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल आणि निकाल घोषित केले जातील. काँग्रेस अध्यक्षपदासाठी तब्बल 22 वर्षांनंतर निवडणूक होत असून तब्बल 24 वर्षांनंतर पक्षाची धुरा गांधी घराण्याबाहेर जाणार आहे.
मतदारांनी मतदानपत्रिकेवरील उमेदवाराच्या नावापुढे मतदान करताना एक क्रमांक टाकावा, असे आधी ठरले होते. मात्र, या मतदानपत्रिकेवरील अनुक्रमानुसार पहिल्या क्रमांकावर मल्लिकार्जुन खर्गे व दुसऱ्या क्रमांकावर शशी थरूर यांचे नाव आहे. जर पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढे क्रमांक टाकून मतदान केल्यास गोंधळात भर पडेल व दोन क्रमांकावरील थरूर यांना फटका बसू शकतो, अशी शक्यता थरूर गटाने व्यक्त केली होती.
काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांच्या नावापुढे पसंतीची खूण करावी, असे आवाहन काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने केले आहे. पक्षाध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांच्या गटाने आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी हा निर्णय जाहीर केला.
अशोक गेहलोत रिंगणाबाहेर...
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पक्ष नेतृत्वाचा पाठिंबा असल्याचं चित्र सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येत होतं.
त्यानंतर पुढचा काँग्रेस अध्यक्ष म्हणून गेहलोत यांच्या नावाची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली. मात्र गेहलोतांचा जीव मुख्यमंत्रीपदात अडकल्याचं दिसून आलं.
गेहलोत अध्यक्ष झाले तर सचिन पायलट हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री होतील असा अंदाज बांधला जाऊ लागला.
मात्र पायलट यांच्या नावाच्या चर्चेने सगळं राजकारणचं ढवळून निघालं. त्यांच्या नावाला प्रचंड विरोध सुरू झालाय.
गेहलोत यांच्या समर्थकांनी सचिन पायलट यांच्या नावाला उघडपणे विरोध केला. गेहलोत यांच्या समर्थकांनी आपले राजीनामे सादर केले.
शेवटी राजस्थानातील आमदारांच्या नाराजीनाट्यानंतर गेहलोत यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेऊन या निवडणुकीतून माघार घेतली.
राजस्थानातील आमदारांच्या बंडाची मुख्यमंत्री म्हणून नैतिक जबाबदारी घेत त्यांनी सोनिया गांधींची माफी देखील मागितली.
दिग्विजय सिंह यांनी घेतली माघार...
दरम्यान अध्यक्षपदासाठी होणाऱ्या या निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
खर्गे यांचं नाव जाहीर होताच अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याच्या तयारीत असणाऱ्या दिग्विजय सिंह यांनी या निवडणुकीतून माघार घेतली.
दिग्विजय सिंह यांनी यावेळी माध्यामांशी बोलताना सांगितलं की, "खर्गे हे माझे वरिष्ठ आहेत. मी काल त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो आणि त्यांना सांगितले की त्यांनी जर त्यांनी उमेदवारी अर्ज भरला तर मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. ते म्हणाले होते की ते अर्ज दाखल करणार नाहीयेत. नंतर माध्यमांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यावर मला समजलं की ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत."दिग्विजय सिंह पुढे म्हणाले की, "मी त्यांना सांगितलं आहे की ते माझे वरिष्ठ आहेत. मी त्यांच्या विरोधात लढण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)