You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोहित कंबोज यांनी चौकशीची मागणी केलेला सिंचन घोटाळा काय आहे?
सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा एक मोठा घोटाळा पत्रकार परिषद घेऊन उघड करणार असं ट्विट त्यांनी केलं आहे.
आपण लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्याला एक्सपोझ करणार आहोत, असं ट्वीट मोहित कंबोज यांनी मंगळवारी (16 ऑगस्ट) रात्री 10 वाजता केलं.
2019 मध्ये परमबीर सिंह यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करायला हवी, असंही ट्वीट त्यांनी केलं आहे.
मोहित कंबोज यांचा स्ट्राईक रेट 100 टक्के आहे, असं ट्वीट भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी केलं आहे. त्यामुळे सिंचन घोटाळ्याची फाईल उघडते की नाही यावर लक्ष लागून राहिलं आहे.
सिंचन घोटाळा काय आहे?
1999 ते 2009 या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला. सिंचनावर 70,000 कोटी रुपये खर्च झाले, पण सिंचन क्षेत्रात केवळ 0.1 टक्क्यांची सुधारणा झाली असं निरीक्षण सरकारच्याच आर्थिक पाहणी अहवालात होतं. या काळात अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते.
सिंचन प्रकल्पांच्या कंत्राट वाटपात तसंच त्यांच्या पूर्ततेमध्ये अनियमतता आढळली अशी नोंद CAG ने आपल्या अहवालात केली होती.
2001 ते 2011-12 या काळात CAGने जलविभागाचे सात ऑडिट केले. त्यात दीर्घकालीन नियोजनाचा अभाव, प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात अनिश्चितता, प्रकल्प पूर्ण करण्यास लागलेला वेळ, वन विभागाची परवानगी न घेता काही ठिकाणी प्रकल्प सुरू करणं याबाबतीत नियमांची पायमल्ली झाल्याचं निरीक्षण CAGनं मांडलं होतं.
अनेक प्रकल्पांसाठी नियोजित केलेल्या किमतींमध्ये अनेक पटींनी वाढ झाल्याचं CAGनं म्हटलं. 601 प्रकल्पांपैकी 363 प्रकल्पांची नियोजित रक्कम वाढून 47,427 कोटी रुपयांवर गेल्याचं CAG ने म्हटलं.
अजित पवारांवर काय आरोप होते?
जेव्हा CAGने सिंचन प्रकल्पांमध्ये अनियमितता आहे असं म्हटलं तेव्हा अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते. त्यामुळे या नियमितता आणि गैरव्यवहाराची जबाबदारी अजित पवारांची आहे, असे तत्कालीन विरोधी पक्षांनी म्हटलं होतं.
प्रकल्पांच्या किमतीमध्ये वाढ, अनियमितता आणि जास्त किमतीची बिलं काढण्यात आली, असा आरोप भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला होता.
2012मध्ये आघाडी सरकारनं श्वेतपत्रिका काढली होती त्यात अजित पवारांना क्लिन चीट देण्यात आली होती. भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध खात्यातर्फे (ACB) चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.
सिंचन घोटाळ्यात अजित पवारांचा नेमका सहभाग काय आहे यावर सरकारनं आपली बाजू मांडावी. तसंच आतापर्यंत अजित पवारांना चौकशीसाठी का बोलवण्यात आले नाही असा प्रश्न मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं विचारला होता.
अजित पवार यांच्या चौकशीबाबतची काय स्थिती आहे, हे सांगण्यासाठी शपथपत्र सादर करावे असं न्यायालयाने सांगितलं होतं.
मोहित कंबोज कोण आहेत?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोहित कंबोज यांचा उल्लेख केला होता.
मोहित कंबोज हे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे 'फ्रंटमॅन' आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. मोहित कंबोजने पत्रा चाळीत स्वत: जमीन विकत घेतली आहे असंही ते म्हणाले होते.
क्रूझ ड्रग केसमध्ये आर्यन खान आणि इतर आरोपींची अटक आणि जामिनावर सुटका झाली असली तरी हे प्रकरण इथेच थांबलं नाही. यात दररोज नवे आरोप समोर येत होते.
आर्यन खान हे प्रकरण अपहरण आणि खंडणीचं आहे असा दावा नवाब मलिक यांनी केला असून या प्रकरणाचा सूत्रधार मोहित कंबोज आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. मोहित कंबोज यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
मोहित कंबोज यांचा जन्म 30 एप्रिल 1984 रोजी झाला. ते व्यावसायिक असून केबीजे नावाची त्यांची खासगी कंपनी आहे.
सप्टेंबर 2013 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते मुंबई भाजपचे माजी सचिव आणि माजी उपाध्यक्ष राहिले आहेत. तसंच ते भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष होते.
2016 ते 2019 पर्यंत ते भाजप मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. 2019 साली त्यांना मुंबई भाजपच्या महासचिवपदी नियुक्त करण्यात आलं.
2014 साली ते दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते. शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी त्यांचा पराभव केला.
2012 ते 2019 दरम्यान सराफ उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 'इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन'चे कंबोज माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत. तसंच 'प्राऊड भारतीय' संस्थेचे ते संस्थापक आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)