You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकाही विद्यार्थ्याला शिकवता न आल्याने प्राध्यापकांनी परत केला 23 लाख रुपये पगार
बिहारमध्ये सरकारी शाळा आणि कॉलेजांमध्ये शिकवण्याच्या पद्धतीची नेहमी चर्चा होत असते. पण सध्या बिहारमधील एका बातमीने सर्वच माध्यमांमध्ये स्थान मिळवलं आहे.
याविषयी बोलण्याचं कारण म्हणजे घडलं असं की बिहारमधीलच एका प्राध्यापकांनी एकाही विद्यार्थ्याला शिकवता न आल्याने आपला 23 लाख रुपये पगार चक्क परत करून टाकला आहे.
आपला संपूर्ण पगारच परत करून त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक उदाहरण सर्वांच्या डोळ्यासमोर ठेवलं आहे.
हे प्रकरण बीआरए बिहार विद्यापीठ, मुजफ्फरपूर येथील आहे.
विद्यापीठाच्या अखत्यारित येणाऱ्या नितीश्वर महाविद्यालयात प्रा. डॉ. ललन कुमार हे हिंदीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
आपल्या तासाला विद्यार्थ्यांची उपस्थिती सातत्याने शून्य येत असल्याने त्यांनी दोन वर्षे, 9 महिन्यांचा संपूर्ण पगार परत केला आहे. ही रक्कम 23 लाख 82 हजार 228 रुपये इतकी आहे.
डॉ. ललन कुमार यांनी मंगळवारी वरील रकमेचा चेक विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आर. के. ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केला.
या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार सांगतात की कुलसचिवांनी सुरुवातीला चेक घेण्यास नकार दिला होता. पण डॉ. ललन कुमार आपल्या निर्णयावर ठाम होते. चेक स्वीकारला नाही तर नोकरी सोडण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर त्यांचा चेक विद्यापीठ प्रशासनाने स्वीकारला.
याविषयी प्रा. डॉ. ललन कुमार यांनी सांगितलं, "मी माझ्या अध्यापन कार्याप्रति समाधानी नव्हतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दर्शवलेल्या मार्गाचा विचार करून तसंच आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून मी माझ्या नियुक्तीच्या तारखेपासून ते आतापर्यंतचा सगळा पगार विद्यापीठाला परत केला आहे."
डॉ. ललन कुमार कोण आहेत?
मूळचे वैशाली जिल्ह्यातील रहिवासी असलेले डॉ. ललन कुमार हे सर्वसामान्य कुटुंबातील सदस्य आहेत.
बारावीपर्यंतचं शिक्षण बिहारमधून घेतल्यानंतर डॉ. ललन यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. पुढे दिल्ली विद्यापीठातून त्यांनी PHD चं शिक्षण पूर्ण केलं.
गोल्ड मेडल सन्मानित डॉ. ललन कुमार यांना अकॅडमिक एक्सिलन्स प्रेसिडेंट सन्मानही मिळाला आहे.
डॉ. ललन कुमार यांनी नियुक्ती बिहार विद्यापीठात 24 सप्टेंबर 2019 मध्ये झाली होती.
डॉ. ललन कुमार सांगतात, "शिक्षक अशा प्रकारे पगार घेत राहतील, तर पाच वर्षांत त्यांची शैक्षणिक कारकिर्द संपुष्टात येईल. ही कारकिर्द पुढे जावी, असं वाटत असेल तर शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होत राहिली पाहिजे."
ते म्हणाले, "विद्यापीठात नियुक्त झाल्यापासून कॉलेजात शिक्षणाचं वातावरण दिसून आलं नाही. हिंदी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1100 च्या आसपास आहे. पण डॉ. ललन कुमार यांच्या तासिकेला जवळपास शून्य उपस्थिती असायची. यामुळे शैक्षणिक कार्य आपण पूर्ण करू शकले नाही. अशा स्थितीत आपलं वेतन स्वीकारणंही अनैतिक ठरेल."
प्रा. ललन कुमार यांनी पुढे म्हटलं, "कॉलेजची स्थिती पाहता मी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आर. के. ठाकूर यांच्याकडे अनेक वेळा विनंती केली की माझी बदली दुसऱ्या कोणत्या तरी कॉलेजात केली जावी. जिथे विद्यार्थी येतात, अशा ठिकाणी आपल्याला पाठवावं. पण तसं घडलं नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)