उद्धव ठाकरे आज राजीनामा देऊ शकतात का?

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

'महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने..'

शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही मिनिटांपूर्वीच हे ट्वीट त्यांनी केले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजच राजीनामा देतील का अशी चर्चा सुरू आहे.

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाराष्ट्राचे राजकीय वातावरणच ढवळून काढले आहे. एकनाथ शिंदे हे उद्धव यांचे निकटवर्तीयच नाही तर कट्टर शिवसैनिक मानले जातात. त्यामुळे या बंडांच्या बातमीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

आधी राज्यसभेच्या निवडणुकीत आणि नंतर विधान परिषदेत महाविकास आघाडीला मिळालेल्या धक्क्यानंतर सावरण्याचा वेळ मिळतो न मिळतो तोच एकनाथ शिंदेंचा फोन नॉट रिचेबल आला.

सकाळ उजाडयाच्या आत बातम्या पसरल्या की एकनाथ शिंदे सुरतमध्ये आहे. त्यांच्यासोबत 11 आमदार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक ठेवलेली असतानाच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या मनसुब्यांचे तीन तेरा वाजवले. पुन्हा बातम्या येऊ लागल्या की एकनाथ शिंदेंसोबत 11 नाही तर 20 हून अधिक आमदार आहेत नंतर तो आकडा 30 च्या पार गेला. सुरतहून शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार गुवाहाटीत पोहोचले. तिथे पोहोचल्यावर एकनाथ शिंदेंनी आणखी एक धक्का दिला. ते म्हणाले, आमच्यासोबत 31 नाही तर 40-41 आमदार आहेत.

उद्धव ठाकरे राजीनामा देतील का?

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की आमच्यासाठी सत्ता महत्त्वाची नाही तर आमची प्रतिष्ठा महत्त्वाची नाही. केवळ संजय राऊतच नाही तर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील सांगितलं की उद्धव ठाकरे हे राजीनामा द्यायला तयार होतील.

मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकर या शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या बंडावर बोलताना भावनिक झाल्या आणि बोलता बोलता त्यांचे अश्रू अनावर झाले.

"एकनाथ शिंदे साहेब, उद्धवजी तुमच्यासाठी चांगला निर्णय घेतील. तुम्ही परत या," पेडणेकरांनी म्हणाल्या.

पेडणेकर पुढे म्हणाल्या, "उद्धवसाहेब सकाळीच म्हणाले की, एकनाथजी तुम्ही परत या, मी तुम्हाला मुख्यमंत्रिपद देतो. तुम्हाला गाजरं दाखवतायेत, ते मुख्यमंत्रिपद देणार नाहीत आणि दिलं तर मी तुमचं सगळ्यात पहिलं अभिनंदन करेन. इतक्या मोठ्या मनाचा आमचा नेता आहे."

"आमचं घर फोडण्याचा भाजपनं प्रयत्न केलाय. भाजपच्या आमिषाला एकनाथ शिंदेंनी बळी पडू नये," असंही पेडणेकर म्हणाल्यात.

वेळ आल्यावर उद्धव ठाकरे राजीनामा देतील, याबाबत शिवसेनेचे दोन महत्त्वाचे नेतेच बोलताना दिसत आहेत. त्यामुळे जर त्यांनी राजीनामा दिला तर आश्चर्य वाटायला नको.

'शिंदेंकडे मॅजिक फिगर नाही'

एकनाथ शिंदे यांच्याकडे मॅजिक फिगर नाही त्यामुळे अद्याप तरी राजीनामा देण्याची गरज दिसत नसल्याचे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी सांगितले.

देसाई सांगतात "एकनाथ शिंदे यांच्याकडे 37 आमदार असते तर कदाचित त्यांनी शिवसेनेचा वेगळा गट असल्याचे जाहीर केले असते पण अशा वेळी आकडा फुगवून सांगण्याची शक्यता असते."

"पण सध्या ज्या तीव्र वेगाने घडामोडी सुरू आहेत आणि संजय राऊतांनी ट्वीट केले आहेच तर ही देखील एक शक्यता आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभा बरखास्तीची सूचना देऊ शकतात," असं देसाई सांगतात.

उद्धव ठाकरे यांच्यासमोर काय पर्याय आहे?

आज उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक निमंत्रित केली आहे. या बैठकीत विधानसभा बरखास्त करायची की नाही यावर विचार केला जाऊ शकतो. विरोधात बसायचं की भाजपसोबत जायचं या पर्यायाची चाचपणी केली जाऊ शकते.

विधानसभा बरखास्त झाली तर आधी राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि यथवकाश नव्याने निवडणुका होतील. पण निवडणुकांसाठी सर्व पक्षांचे आमदार तयार आहेत की नाही हा देखील प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

विधानसभा बरखास्तीची सूचना ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे द्यावी लागेल. पण यावेळी ते रिलायन्स रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना कोरोना झाला आहे. पण त्यांनी सांगितलं आहे की ते व्हीडिओ कॉन्फरन्सहून उपलब्ध राहतील. पण त्यांना थेट भेटता येणार नाही.

महाविकास आघाडी सरकारविरोधात बहुमत नसल्याचे तज्ज्ञ सांगतात.

"उद्धव ठाकरेंकडे एक जमेची बाजू आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन तृतीआंशपेक्षा जास्त आमदार नाहीत आणि भाजप आणि ते एकत्र आले तरी सरकार पडेल इतकं बहुमत होत नाही," असं देसाई सांगतात.

पुढे काय होऊ शकतं?

संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभा बरखास्तीची सूचना देऊ शकतात असे अंदाज बांधले जात आहेत.

पण, "विधानसभा बरखास्त झाल्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांची आमदारकी जाईल, त्यामुळे ते या गोष्टीला पाठिंबा देतील अशी शंका येते," असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अशोक चौसाळकर सांगतात.

"विधानसभा बरखास्तीचा प्रस्ताव दिला गेला तर राज्यपाल तो स्वीकारतील की नाही हे देखील सांगता येणार नाही. हे सरकार बहुमतात नाही, असं राज्यपाल म्हणू शकतात. शिंदेंचा गट काय म्हणतो यावर देखील राज्यपाल विचार करू शकतात. त्यामुळे ते सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात. त्यानंतर विश्वासदर्शक ठराव होईल. यात जर ते बहुमत सिद्ध करू शकले नाही तर भाजप आणि शिंदेंचा गट सत्तास्थापनेसाठी दावा करू शकतो," अशा काही शक्यता आहेत असं चौसाळकर सांगतात.

शिंदेसमर्थक आमदार

1- प्रताप सरनाईक (माजिवडा, ठाणे)

2- श्रीनिवास वनगा (पालघर)

3- अनिल बाबर (खानापूर)

4- नितिन देशमुख (अकोला)

5-लता सोनवणे (चोपडा)

6- यामिनी जाधव (भायखळा)

7- संजय शिरसाठ (औरंगाबाद पश्चिम)

8- महेंद्र दळवी (अलिबाग)

9- भारत गोगवले (महाड)

10.प्रकाश सर्वे (मागाठणे)

11.सुहास कांदे (नांदगाव)

12. बच्चू कडू , प्रहार पार्टी (अचलपूर)

13- नरेन्द्र बोंडेकर, अपक्ष (भंडारा)

14- संजय गायकवाड (बुलडाणा)

15- संजय रायमूलकर (मेहेकर)

16-बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर)

17- रमेश बोरनारे (वैजापूर)

18- चिमणराव पाटील (एरंडोल)

19- किशोर पाटील (पाचोरा)

20-नितीनकुमार तळे (बाळापूर)

21-संदीपान बुमरे (पैठण)

22-महेंद्र थोरवे (कर्जत)

23-शंभूराजे देसाई (पाटण)

24- शहाजी पवार

25- तानाजी सावंत (परांडा)

26- शांताराम मोरे (भिवंडी)

27-विश्वनाथ भोईर (कल्याण)

28- शहाजी पाटील (सांगोला)

29-प्रदीप जैसवाल (औरंगाबाद मध्य)

30-किशोर पाटील

31-उदयसिंह राजपूत

32-महेश शिंदे (कोरेगाव)

33-ज्ञानराज चौगुले (उमरगा)

34- राजकुमार पटेल

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)