पैसा आणि सत्ता पुरुषांच्या आत्मसन्मानावर का परिणाम करतात?

    • Author, मेलिसा होगेनबुम
  • Published
  • वाचन वेळ: 11 मिनिटे

आपण जे काही कमवतो, त्याचा आपल्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः जेव्हा आपण आपली तुलना आपल्या आसपासच्या लोकांशी करतो. विशेषत: पुरुषांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, या सगळ्याचा पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर अतिशय नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

"घर चालवण्यासाठी लागणारा सगळा पैसा आपली पत्नी कमवत आहे, ही गोष्ट तुमच्या पुरुषी अभिमानाला कुठेतरी थोडी टोचते," घरात राहून मुलांचा सांभाळ करणाऱ्या डेव्ह यांनी आपल्या परिस्थितीबद्दल सांगताना हे मत व्यक्त केलं.

"मी एक पारंपरिक विचारांचा, पुरुषांमध्ये उठणारा-बसणारा माणूस आहे. जेव्हा तुम्ही इतरांना सांगता की, तुम्ही घर सांभाळता तेव्हा लोक तुम्हाला कमकुवत किंवा स्त्रियांसारखे स्वभाव असलेला समजतात," टॉम म्हणाला.

एका सखोल संशोधन अभ्यासात टॉम आणि डेव्ह हे दोघेही सहभागी झाले होते, जिथे नात्यामध्ये स्त्रिया मुख्य कमावत्या असल्यावर पुरुषांवर त्याचा काय परिणाम होतो, याविषयी स्त्री-पुरुषांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.

यातील दुसरी एक व्यक्ती ब्रेंडन याच्याकडे तर 'लोक आपल्यावर हसतात किंवा नाव ठेवतात' असं मानण्याचं पक्कं कारण होतं. कारण त्याच्याच कुटुंबातील सदस्यांनी त्याला घरचा नोकर असं हिणवलं होतं.

घराबाहेर पडून नोकरी-व्यवसाय न करणाऱ्या आणि ज्यांच्या जोडीदार या घरातील मुख्य कमवत्या आहेत, अशा पुरुषांना सहन कराव्या लागणाऱ्या सामाजिक टीकेची ही केवळ तीन उदाहरणे आहेत.

या संशोधनात पुरुषांनी सांगितलं की, लोक आपल्याला नाव ठेवतात किंवा कमी लेखतात, असं त्यांना वाटतं. याचं कारण म्हणजे, 'घर चालवायला पुरुषानेच पैसे कमवले पाहिजे' असा विचार समाजात फार पूर्वीपासून चालत आला आहे.

पण आता काळ बदलतोय आणि पतीपेक्षा जास्त पगार असणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महिला कमवत्या होण्याच्या या बदलामुळे एक गोष्ट समोर येत आहे की, घरात पैसा नेमका कोण आणतंय, यावरच घराचा ताबा आणि समाजातील वर्चस्वाची समीकरणं बऱ्याच अंशी ठरत असतात.

घराघरांमध्ये घडणाऱ्या या बदलांचा एवढा मोठा परिणाम होण्यामागचं खरं कारण म्हणजे पैसा आणि घरातील वर्चस्व यांचा खूप जवळचा संबंध आहे. जेव्हा एखादा पुरुष घरात पत्नीपेक्षा कमी कमवतो. पण समाजातल्या काही लोकांची मात्र तोच मुख्य कमवता असावा अशी अपेक्षा असते. तेव्हा त्याचा स्वतःवरचा ताबा किंवा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. याचा थेट परिणाम त्याच्या मानसिक शांततेवर होतो आणि अनेकदा यामुळे घटस्फोटाची वेळही येते.

जगभरात आजही एक चित्र बदललेलं नाही ते म्हणजे पुरुष सहसा महिलांपेक्षा जास्त कमवतात आणि संसारी जोडप्यांमध्ये महिलाच घराची आणि मुलांची जास्त जबाबदारी सांभाळतात. असं असण्यामागे एकीकडे स्त्री-पुरुषांकडून असणाऱ्या सामाजिक अपेक्षा कारणीभूत आहेत.

तर दुसरीकडे ही काळाची आर्थिक गरजही असू शकते. अनेकदा घरात जो जास्त कमवतो त्याच्या करिअरला आधी महत्त्व दिलं जातं. यामुळे कुटुंबासाठी महिलांनाच अनेकदा आपल्या नोकरीत तडजोड करावी लागते किंवा पार्ट-टाइम काम स्वीकारावं लागतं.

कमवत्या महिलांची संख्या जरी वाढत असली तरी नोकरी आणि घरच्या जबाबदाऱ्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन मात्र अजूनही खूप हळूहळू बदलत आहे. आजही घरात पत्नी जास्त कमवती असली तरी कमी उत्पन्न असलेल्या पतीपेक्षा तीच घराची आणि मुलांची जास्त जबाबदारी सांभाळताना दिसते. शिवाय, काही वयोगटांमध्ये स्त्री-पुरुष समानतेचा विचार वाढीस लागला असला तरीही पत्नी आपल्यापेक्षा जास्त कमवत असेल तर पुरुषांना मानसिकदृष्ट्या त्यांच्यातील समाधानाची भावना कमी होते.

पत्नी आपल्यापेक्षा जास्त पैसे कमवतेय ही गोष्ट पुरुषाचा आत्मविश्वास आणि आनंद कमी करू शकते असं नवनवीन संशोधनातून समोर येत आहे. पण ही समस्या खरंच किती गंभीर आहे? आणि पुरुषांना या बदलत्या वास्तवाशी जुळवून घेण्यासाठी काय मदत केली जाऊ शकते?

पत्नी स्वतःपेक्षा जास्त कमवती झाल्यावर मनावर काय दडपण येतं याबद्दल पुरुषांनी उघडपणे बोलणं अजूनही आपल्या समाजात चुकीचं किंवा लाजिरवाणं मानलं जातं. अनेकदा पुरुषांना आपल्या पत्नीच्या यशाचं कौतुक तर असतंच पण दुसरीकडे पुरुषत्वाशी संबंधित अनेक जुन्या समजुती आजही समाजात कायम असल्यामुळे आपण 'मुख्य कमवत्याची' आपली भूमिका पार पाडत नसल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होऊ शकते.

स्वतःच्या आवडीने नाही तर नोकरी सुटल्यामुळे किंवा दुसऱ्या शहरात जावं लागल्यामुळे जेव्हा पुरुषांवर अचानक घरी बसून मुलं सांभाळण्याची वेळ येते तेव्हा हा ताण जास्त वाढतो.

ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे राहणारे माजी सल्लागार आणि आता सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असलेले इन्फ्लुएंसर हॅरी बंटन यांची नुकतीच नोकरी गेली. या घटनेनंतर त्यांनी सोशल मीडियावर हजारो लोकांसमोर पोस्ट शेअर करत लिहिले की, यामुळे "एक पुरुष, पती आणि पिता म्हणून त्यांच्या आत्मसन्मानावर खोल परिणाम झाला आहे.

"अशा परिस्थितीत असणाऱ्या पुरुषांमध्ये नैराश्याचे आणि त्याहूनही गंभीर पाऊल उचलण्याचे प्रमाण इतके जास्त का आहे, हे मला आता समजते आहे. जेव्हा गोष्टी नियोजनानुसार घडत नाहीत तेव्हा ते मनाला खूप तोडणारे असते आणि 'पुरुष असणे' म्हणजे नेमके काय या तुमच्या संकल्पनांनाच ते थेट आव्हान देते."

बंटन यांनी लिहिले की, "मी माझी ही कहाणी यासाठी सांगतोय की, इतर लोकही यातून स्वतःला समजून घेऊ शकतील आणि अशा संकटामुळे आपली किंमत कमी होत नाही हे त्यांना पटेल. आता मला एक बाप म्हणून मुलांची जी जबाबदारी सांभाळायची आहे, त्यासाठी माझ्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला आहे."

बंटन यांनी आपल्या जीवनशैलीतील या बदलाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले असले तरी त्यांची ही परिस्थिती हे दर्शवते की, जोडीदाराच्या तुलनेत पुरुष किती कमावतो यावर त्यांचं मानसिक स्वास्थ्य अवलंबून असू शकतं.

उदाहरणार्थ, स्वीडनमध्ये झालेल्या एका ताज्या संशोधनात जोडप्यांच्या 10 वर्षांच्या कमाईचा आणि त्यांच्या मानसिक आरोग्याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. संशोधकांना असं आढळून आलं की, ज्या क्षणी पत्नी आपल्या पुरुष जोडीदारापेक्षा जास्त कमावू लागली त्या क्षणापासून पुरुषांमध्ये मानसिक तणाव किंवा आजार वाढल्याचं दिसून आलं.

ज्यांचे जोडीदार जास्त कमावतात अशा सर्व सहभागींमध्ये ज्यात महिलांचाही समावेश होता. मानसिक त्रासाच्या प्रमाणात 8 % पर्यंत वाढ झाली असली तरी पुरुषांच्या बाबतीत ही वाढ 11 % पर्यंत म्हणजेच अधिक स्पष्ट आणि चिंताजनक होती.

माझ्या आगामी 'ब्रेडविनर्स' या पुस्तकाच्या लेखनादरम्यान मी या संशोधनाचे प्रमुख आणि डरहम युनिव्हर्सिटीच्या इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटचे असिस्टंट प्रोफेसर डेमिड गेटिक यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की, 'पुरुषानेच जास्त कमवले पाहिजे' असे आता उघडपणे बोलले जात नसले तरी या सामाजिक अपेक्षा आजही मोठ्या प्रमाणावर टिकून आहेत.

गेटिक यांच्या मते, जोडीदार जास्त कमवू लागल्यावर पुरुषांमध्ये मानसिक ताण वाढणे यावरून जोडप्यांच्या वैवाहिक आयुष्यातील आनंद कमी होत असल्याचा अंदाज लावता येतो. जरी त्यांच्या अभ्यासात थेट या मुद्द्याची तपासणी केली गेलेली नव्हती.

दरम्यान, इतर काही वेगवेगळ्या संशोधनांमध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे ज्यांची पत्नी जास्त पैसे कमवते ते पुरुष आपल्या जोडीदाराची फसवणूक करण्याची शक्यता अधिक असते. या संशोधकांच्या मते, पत्नी मुख्य कमवती असल्यामुळे पुरुषांच्या अहंकाराला किंवा पुरुषत्वाला जी ठेच लागलेली असते ती भरून काढण्यासाठी आणि स्वतःचे वर्चस्व पुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरुष कदाचित हे पाऊल उचलतात.

संशोधन असं ही दर्शवते की, कुटुंबाचा पोशिंदा असण्याची पुरुषांवरील सक्ती किंवा दडपण हे त्यांच्या मानसिक आरोग्यास कारणीभूत ठरणारे मुख्य घटक आहे. जेव्हा पुरुष बेरोजगार असतात तेव्हा बेरोजगार महिलांच्या तुलनेत त्यांच्यामध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक असल्याचं दिसून आलं आहे.

याचं एक कारण म्हणजे, महिलांचे नोकरीव्यतिरिक्त इतर ठिकाणी असणारे सामाजिक संबंध (सोशल नेटवर्क) पुरुषांपेक्षा जास्त मजबूत असतात. म्हणूनच घरात राहून मुलांचा सांभाळ करणारे वडील हे घरात राहणाऱ्या मातांच्या तुलनेत अधिक एकटे किंवा समाजापासून तुटलेले असतात.

आपले मानसिक स्वास्थ्य आणि आपली कमाई यांचा इतका जवळचा संबंध का आहे हे समजून घेण्यासाठी गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. सामान्यतः मुख्य कमवत्या महिला या खूप महत्त्वाकांक्षी आणि केवळ करिअरचाच विचार करणाऱ्या असतात असा एक ठराविक समज समाजात आहे. परंतु प्रत्यक्षात अनेक जोडप्यांमध्ये महिला मुख्य कमवती असण्याचं कारण म्हणजे पुरुषांची नोकरी जाणं हे असतं ज्यामुळे कुटुंबावर आर्थिक ताण येतो.

संशोधनातून असं समोर आलं आहे की, ज्या जोडप्यांमध्ये केवळ महिलाच कमवती आहे त्या कुटुंबांचे सरासरी उत्पन्न पुरुष कमवता असलेल्या कुटुंबांच्या तुलनेत कमी असते. ज्या घरात फक्त महिलाच नोकरी करते त्या घराचं एकूण उत्पन्न पुरुष कमवता असलेल्या घरांपेक्षा कमी असतं. कारण आजही महिलांना पुरुषांपेक्षा कमी पगार मिळतो.

याच कारणामुळे बाथ युनिव्हर्सिटीच्या सोशल पॉलिसी आणि विज्ञान विभागातील सहाय्यक प्राध्यापक हेलन कोवालेव्स्का आणि त्यांच्या टीमने एका शोधनिबंधात असं म्हटलं आहे की, "अनेक देश कमावत्या महिलांना मिळणाऱ्या कमी उत्पन्नाची दरी भरून काढण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न करत नाहीत. अशा परिस्थितीत जिथे संपूर्ण कुटुंबाचे उत्पन्न कमी होते तिथे सरकारी कल्याणकारी योजनांनी अधिक मदत केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे.

सगळंच काही वाईट नसतं, पण दुसरीकडे, जेव्हा पुरुष नोकरी सोडून किंवा ब्रेक घेऊन घरी थांबतात तेव्हा त्याचे कुटुंबावर काही चांगले परिणामही होतात. उदाहरणार्थ, यूकेमध्ये वडील आता पूर्वीच्या काळापेक्षा आपल्या मुलांसोबत जास्त वेळ घालवू लागले आहेत.

संशोधनातून असं समोर आलंय की, जे बाबा घरी राहतात ते मुलांसोबत खूप छान आणि दर्जेदार वेळ घालवतात. साहजिकच घरात राहणारे हे बाबा नोकरी करणाऱ्या आई किंवा इतर वडिलांच्या तुलनेत मुलांची जबाबदारी जास्त चांगल्या प्रकारे सांभाळतात. पण ते मुलांची काळजी घेत असले तरी घरकामात मात्र फारशी मदत वाढवत नाहीत. अशा वेळी घरकाम फक्त दोघांमध्ये कसं तरी सारखं वाटून घेतलं जातं.

अमेरिकेतील 2023 च्या प्यू (Pew) अहवालानुसार, इतर कोणत्याही परिस्थितीत पुरुष काहीही करत असले तरी महिलांनाच घरकाम जास्त करावं लागतं.

अनेक देशांमध्ये पितृत्व रजा (पॅटर्निटी लीव्ह) खूप कमी दिवसांची मिळत असली तरीही जेव्हा वडील ही रजा घेतात, तेव्हा त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील समाधान वाढू शकते. सुट्टी घेऊन मुलांसोबत राहणाऱ्या वडिलांचं मुलांशी एक वेगळंच आणि छान नातं तयार होतं. अशी मुलं मोठी होत असताना घरात आई आणि बाबा दोघांनाही सारखं काम करताना बघतात.

आई-वडील घरातल्या कामांची वाटणी कशी करतात यावरूनच मुलं भविष्यात आपल्या संसाराचे नियम ठरवत असतात. घरात कामाची योग्य विभागणी झाली की महिलांनाही आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करणं सोपं जातं आणि त्यामुळे त्यांची कमाई वाढायला मदत होते.

परंतु, समाजातील या बदलांचे महिलांना होणारे फायदे केवळ एवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत. मेक्सिकन कुटुंबांचा अभ्यास करणाऱ्या एका टीमला असं आढळून आलं की, महिलांना घराबाहेर नोकरी-व्यवसायाच्या जितक्या जास्त संधी मिळतात तितकाच त्यांचा इतर क्षेत्रांतील अधिकारही वाढतो.

सोप्या भाषेत सांगायचं तर, पैशांचे मोठे निर्णय घेताना घरात त्यांच्या शब्दाला जास्त वजन मिळतं. इतर संशोधन देखील हेच सांगतात. ज्या महिलांना पूर्वी नेहमीच आर्थिक बाबतीत मागे ठेवलं गेलं त्यांना जर आता आर्थिक स्वातंत्र्य मिळालं तर त्याचा त्यांच्या कमाईवर, स्वतःच्या पायावर उभं राहण्यावर आणि करिअरवर खूप चांगला परिणाम होतो.

जेव्हा समाजाचे जुने नियम बदलतात आणि कुटुंबासाठी पुरुषांनी नोकरीतून सुट्टी घेणं ही एक सामान्य गोष्ट बनते, तेव्हा संपूर्ण कुटुंबाचा आनंद वाढतो.

स्वीडनचं एक उदाहरण पाहूया, 1995 मध्ये जेव्हा तिथे पहिल्यांदा वडिलांसाठी खास एका महिन्याची सुट्टी ('डॅडी मंथ') सुरू करण्यात आली तेव्हा सुरुवातीला ही सुट्टी घेणाऱ्या जोडप्यांमध्ये वाद वाढले आणि त्यांचे घटस्फोट होण्याचं प्रमाण वाढलं. पण जेव्हा 2002 मध्ये सरकारने ही सुट्टी वाढवून दोन महिने केली तेव्हा हा त्रास बंद झाला.

आज स्वीडनमध्ये आई आणि बाबा दोघांनाही प्रत्येकी तीन-तीन महिन्यांची हक्काची सुट्टी मिळते आणि नियम असा आहे की ती सुट्टी घेतली नाही तर ती वाया जाते. त्यामुळे साहजिकच तिथे जवळपास सगळेच बाबा ही सुट्टी घेतात. आता तर स्वीडनमध्ये परिस्थिती अशी आहे की, स्वीडनमध्ये वडिलांनी ही ठरवून दिलेली पितृत्व रजा न घेणं हे सामाजिकदृष्ट्या चुकीचं मानलं जातं.

आज महिलांना सक्षम बनवण्याबाबत समाजात जागरूकता नक्कीच वाढली आहे. पण लोकांचे विचार मात्र अजूनही विभागलेले आहेत. किंग्ज कॉलेज लंडन'ने केलेल्या एका ताज्या 'इप्सॉस' (Ipsos) सर्वेक्षणात असे आढळून आले की, सर्वात तरुण पिढी म्हणजेच 'जेन झी' (Gen Z-ज्यांचे वय त्यावेळी 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान होते) या मुद्द्यावर सर्वाधिक विभागलेली होती.

जवळपास 24,000 लोकांच्या जागतिक सर्वेक्षणात असं दिसून आलं की, तरुण पुरुष या विधानाशी अधिक सहमत होते की मुलांचा सांभाळ करण्यासाठी घरी राहणारा पिता हा खरा पुरुष नसतो. जेथे 28% जेन झी पुरुषांनी याला मान्यता दिली तेथे केवळ 19% जेन झी महिला याच्याशी सहमत होत्या. इतर सर्व वयोगटांमध्ये हा आकडा यापेक्षा कमी होता.

जेव्हा "समानतेला पाठिंबा देण्यासाठी पुरुषांकडून खूप जास्त अपेक्षा केल्या जात आहेत" या विधानावर प्रतिक्रिया विचारण्यात आली, तेव्हा 60% जेन झी पुरुषांनी याला होकार दिला. तर महिलांच्या बाबतीत हे प्रमाण 38% होते. 'बेबी बूमर्स' वयोगटात हा आकडा अनुक्रमे 44% आणि 31% पर्यंत खाली आला होता.

किंग्ज कॉलेज लंडन'मधील 'काम आणि रोजगार' विषयाच्या प्राध्यापक आणि या अहवालाच्या सह-लेखिका हीजुंग चुंग यांनी मला सांगितलं की, हा दृष्टिकोन निर्माण होण्याचं एक कारण म्हणजे आजकाल तरुण मुलांपेक्षा तरुण मुलींचं उच्च शिक्षण घेण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. त्या पुढे म्हणतात की, याच कारणामुळे कदाचित वय वर्षं 25 च्या दरम्यान असलेल्या तरुणी पुरुषांपेक्षा थोडं जास्त कमवत आहेत. किंबहुना, इतिहासात पहिल्यांदाच आता युके (UK) मध्ये पुरुष डॉक्टरांपेक्षा महिला डॉक्टरांची संख्या जास्त झाली आहे.

या निष्कर्षांनंतरही, चुंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे नवीन सर्वेक्षण हेच दर्शवते की, स्त्री-पुरुष समानता असणं खूप गरजेचं आहे यावर बहुतेकांचं एकमत आहे. याशिवाय, एका नव्या संशोधनातून एक चांगली गोष्ट समोर येतेय ती म्हणजे आता पुरुषांची 'पुरुषत्व' आणि 'बाप' असण्याबद्दलची व्याख्या बदलू लागली आहे.

'घरात फक्त पुरुषानेच जास्त पैसे कमवून कुटुंब सांभाळलं पाहिजे' या जुन्या विचारांना बाजूला सारून ते आता मुलांची काळजी घेणं, त्यांच्या भावना समजून घेणं आणि प्रेमळपणा दाखवणं या गोष्टींना महत्त्व देत आहेत. ज्या गोष्टींना सहसा स्त्रीसुलभ मानलं जायचं. या बदलत्या विचारसरणीला आता "केअरिंग मॅस्क्युलिनिटीज" (काळजीवाहू पुरुषत्व) असं म्हटलं जात आहे.

मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथील 'मोनाश युनिव्हर्सिटी'च्या जेंडर स्कॉलर (स्त्री-पुरुष समता तज्ज्ञ) कार्ला इलियट म्हणतात, "पुरुषांनी केवळ कौतुकास पात्र ठरणारी मनोरंजक किंवा मजेशीर कामं करणं पुरेसं नाही तर संगोपनातील किंवा घरकामातील आव्हानात्मक आणि कष्टाच्या जबाबदाऱ्याही त्यांनी मनापासून पार पाडल्या पाहिजेत."

त्यांच्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की, जेव्हा पुरुष काळजी घेण्याची ही व्यावहारिक कामे स्वतःहून अंगावर घेतात तेव्हा त्यांच्यात आपुलकी आणि प्रेमळपणा वाढतो. इलियट यांच्या मते, पुरुषत्वाची ही नवी संकल्पना समाजात रुजवण्यासाठी पुरुषांनी जबाबदारी उचलण्यासोबतच स्वतःमधील वर्चस्व गाजवण्याची वृत्ती आणि भेदभावाची भावना मनातून काढून टाकावी लागेल.

काही संशोधकांचं असं म्हणणं आहे की, जर सरकारने वडिलांसाठी मिळणाऱ्या सुट्ट्या वाढवल्या आणि खास पुरुषांसाठीच काही सुट्ट्या राखीव ठेवल्या तर त्यांना घर आणि मुलांच्या जबाबदाऱ्यांकडे जास्त लक्ष देता येईल. असं झाल्यास, 'घर आपल्यालाच चालवायचं आहे' हा पुरुषांच्या डोक्यावरचा ताण हलका होईल आणि दुसरीकडे महिलांनाही नोकरी-व्यवसायात जास्त पैसे कमावण्याची संधी मिळेल.

सरकारी धोरणांमधील बदल प्रत्यक्षात लागू होण्यासाठी आणि त्याचे परिणाम दिसण्यासाठी वेळ लागू शकतो. म्हणूनच आपल्या सर्वांच्या पातळीवर करता येण्याजोगा एक उपाय म्हणजे समाजातील आपल्या भूमिकांविषयी बदलत असलेल्या अपेक्षांबद्दल सकारात्मक विचार उघडपणे मांडणे.

कार्ला इलियट म्हणतात, "यात एक खूप चांगली संधी लपलेली आहे. जर पत्नीने जास्त पैसे कमवल्यामुळे एखाद्या पुरुषाच्या अहंकाराला किंवा आत्मसन्मानाला धक्का लागत असेल तर त्याने शांतपणे विचार करायला हवा की आपल्याला असं का वाटतंय? पुरुष आणि स्त्रीच्या कामांबद्दल समाजाने जे जुने नियम ठरवून दिलेत त्या चौकटीबाहेर पडून विचार करण्याची हीच ती योग्य वेळ आहे."

आज घर चालवणाऱ्या महिलांची संख्या ज्या वेगाने वाढत आहे ते पाहता येणाऱ्या काळात ही गोष्ट अगदी सामान्य होऊन जाईल. अशा वेळी ज्या जोडप्यांना मुलं आहेत तिथल्या पुरुषांना वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करावा लागेल. त्यांना ऑफिसच्या कामात थोडी लवचिकता आणावी लागेल आणि घराची आणि मुलांची जबाबदारी जास्त सांभाळावी लागेल. जेव्हा पुरुष घराला असा खंबीर पाठिंबा देतील तेव्हा त्यांच्या जास्त कमवत्या पत्नींना कोणत्याही अडचणीशिवाय स्वतःच्या करिअरमध्ये गरुडझेप घेणं आणखी सोपं होईल.

या बदलाला पूर्णपणे स्वीकारायला समाजाला थोडा वेळ नक्कीच लागेल. पण या नव्या विचारसरणीमुळे 'पुरुषानेच कमवायचं आणि स्त्रीनेच घर सांभाळायचं' हा जुना नियम मोडीत निघायला मदत होईल. यामुळे पती-पत्नीच्या नात्यात गोडवा तर वाढेलच सोबतीने घरात दोघांनाही समान हक्क आणि आदर मिळून एक चांगलं वातावरण तयार होईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)