ED च्या 13 तास चौकशीनंतर अनिल परब म्हणाले...

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित 7 जागांवर ईडीने गुरुवारी छापा टाकला. तब्बल 12 तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी परब यांच्या मालमत्तांमध्ये शोध मोहिम राबवली. त्याची चौकशी केली. मुंबई आणि पुण्यात परब यांच्याशी संबंधित ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. त्यातच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं परब यांच्याविरोधात कोर्टात तक्रार केली आहे.

यानंतर पत्रकारांशी बोलताना अनिल परब यांनी साई रेसॉर्ट प्रकरणी ही चौकशी करण्यात आल्याचं सांगितलं आहे.

"दापोलीतील साई रेसॉर्टचे मालक सदानंद कदम आहेत. त्यांनी कोर्टात तसं सांगितलं आहे. त्यांनी त्याचा हिशेब दिलेला आहे. हे रिसॉर्ट अजूनही सुरू झालेलं नाही. पर्यावरणाची 2 कलमं लावून त्यातून सांडपाणी समुद्रात जातं अशी तक्रार पर्यावरण मंत्रालयानं दिली. त्यावरून आज ईडीच्या लोकांनी ही छापेमारी केली. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिली आहेत. याआधीसुद्धा उत्तरं दिली आहेत. आजदेखील दिली आहे. त्यापुढेसुद्धा देईन. या सर्व गोष्टींचा खुलासा कोर्टात होईल. तसंच सहा कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप खोटा आहे," असं अनिल परब यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय.

"6 कोटी रूपयांच्या बातम्या खोट्या आहेत. आयकर विभागाचा रिपोर्ट अजून आलेला नाही. यात मनी लाँडरिंग झालेलं नाही" असा दावा परब यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातले संसदीय कार्यमंत्री आणि परिवहन मंत्री अनिल परब कायम चर्चेत असतात. शिवसेनेवर केलेली टीकेला प्रत्युत्तर असो वा न्यायप्रविष्ट प्रकरणांवर शिवसेनेची बाजू असो त्यासाठी संजय राऊत यांच्याबरोबर अनिल परब आघाडीवर असतात.

शिवसेना कुठल्याही अडचणीत सापडली तर ते प्रकरण कायद्याचा अभ्यास करून नियमांचे दाखले देऊन मांडणारे नेते अशी अनिल परब यांची ओळख आहे.

अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई सुरू करताच भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी एक प्रतिक्रिया प्रसिद्ध केला आहे. ट्वीटरवर अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात आहेत, आता अनिल परब यांनी तयार राहावे, असं सोमय्या यांनी लिहिलं आहे.

अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याबद्दल पवारांनी खंत व्यक्त केली.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची पराबांविरोधात तक्रार

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अनिल परब यांच्या रिसॅार्ट प्रकरणी दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीत सांगण्यात आलंय की, 'आरोपी नंबर 1 अनिल परब यांनी 2017 मध्ये जमीन विकत घेतली. पण याचं रजिस्टेृशन दोन वर्षानंतर केलं. यावेळी ही जमीन शेतजमीन होती. दापोलीच्या सरकारी अधिकाऱ्यांनी अनिल परब यांच्यासोबत संगनमताने ही जमीन Non Agriculture केली

अनिल परब यांनी या जमीनीवर अवैध बांधकाम केलं. CRZ नियंमांचं उल्लंघन केलं. त्यानंतर या जमीनीवर उभं राहिलेल्या अवैध बांधकामासहीत ही जमीन विकत घेतल्याचं दाखवलं.'

'मुरूड ग्रामपंचायतीने ही गोष्ट मान्य केली आहे. तसंच या जमीनीवर रिसॅार्ट बांधण्यात आलं आणि ग्राउंड अधिक एक मजल्याची परवानगी असताना दोन मजली रिसार्ट बांधण्यात आलं. नंतर हे रिसार्ट सदानंद कदमला विकण्यात आलं,' असा दावा पर्यावरण मंत्रालयानं त्यांच्या तक्रारीत केला आहे.

'अनिल परब यांनी CRZ कायद्यानुसार परवानगी घेतली नाही. हे रिसॅार्ट अवैध आहे. खरेदी-विक्री अवैध आहे हे माहिती असूनही अनिल परब यांनी हा व्यवहार केला, असं मंत्रालयानं कोर्टात सांगितलं आहे.

या प्रकरणातल्या दोषींना शिक्षा व्हावी. तसंच संपूर्ण गुन्ह्याच्या तपासाचे आदेश द्यावेत, अशी मागणी पर्यावरण मंत्रालयाने कोर्टात केली आहे.

कोण आहेत अनिल परब?

अनिल दत्तात्रय परब हे मागच्या 20 वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. बीकॉमनंतर एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं ते पेशाने वकील आहेत.

वकिली करता करता सार्वजनिक उत्सवाचे आयोजन, गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, रक्तदान शिबिरं, आरोग्य तपासण्या, सामान्यांना कायदे विषयक मोफत सल्ले अश्या कार्यक्रमांमधून ते राजकारणात सक्रिय होत होते.

शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार दिवंगत मधुकर सरपोतदार यांच्या ते अत्यंत जवळचे मानले जायचे. विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून जी आंदोलनं व्हायची त्यात परब यांचा पुढाकार असायचा. 2001 साली पहिल्यांदा ते शिवसेनेचे विभाग प्रमुख झाले. तिथून त्यांची खऱ्या अर्थाने राजकीय प्रवासाची सुरवात झाली.

2015 साली पहिल्यांदा प्रकाशझोतात?

अनिल परब यांच्या कामाची दखल घेऊन 2004 साली पहिल्यांदा त्यांनी विधानपरिषदेवर वर्णी लागली. परब हे 2004 ते 2010, 2012 ते 2018 आणि 2018 साली फेरनिवड अशा पध्दतीने ते विधान परिषदेवर निवडून गेले आहेत.

2015 साली अनिल परब हे प्रकाशझोतात आले. जानेवारी 2015 मध्ये वांद्रे पश्चिमचे आमदार बाळा सावंत यांचं निधन झालं.

त्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून बाळा सामंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी कॉंग्रेसकडून नारायण राणे हे रिंगणात उतरले.

राणे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली. तृप्ती सावंत यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी अनिल परब यांच्यावर देण्यात आली होती. तृप्ती सावंत विरूद्ध राणे यापेक्षा शिवसेना विरूद्ध राणे असा संघर्ष वांद्र्यात रंगला होता. या निवडणुकीत नारायण राणे यांना पराभूत करण्यात शिवसेना यशस्वी ठरली. त्यामुळे अनिल परब यांच्यावरचा विश्वास वाढत गेला.

2017 साली महापालिकेची जबाबदारी

2017 साली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागली. यादरम्यान शिवसेना भाजपची महापालिकेत असलेली युती तुटली. मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार या मुद्यावरून भाजपने शिवसेनेला अनेकदा घेरण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी अनिल परब यांनी भाजपच्या सर्व आरोपांना उत्तरं दिली. जेव्हा गरज होती तेव्हा कायद्याच्या आधारावर अनिल परब समोर येऊन बोलू लागले.

या निवडणुकीत अनिल परब यांच्यावर प्रमुख जबाबदार्‍या देण्यात आल्या होत्या. या निवडणुकीच्या रणनितीत भ्रष्टाचाराचा मुद्दा मागे पडून पुन्हा मराठी माणसाचा मुद्दा चर्चेत आला. शिवसेना महापालिकेत पुन्हा सत्तेत बसली. अनिल परब यांच्यावर दिलेली जबाबदारी त्यांनी चोख पाडली त्यामुळे त्यांच्याबाबतची पक्षात प्रतिमा उंचावत गेली.

महाविकास आघाडीत प्रमुख मंत्री?

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली. महाविकास आघाडी स्थापन झाली. दरम्यानच्या काळात अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे शपथविधी पार पडला. त्यानंतर अजित पवार हे राजीनामा देऊन पुन्हा महाविकास आघाडीत परतले. त्यानंतर आमदार फुटू नयेत म्हणून त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले.

'मोठा जनाधार नसतानाही महत्त्वाच्या पदावर'

सत्ताधारी पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा घेऊन सत्तेसाठी दावा करेपर्यंत कायदेशीर बाबी तपासण्याची सर्व जबाबदारी अनिल परब यांच्यावर देण्यात आली होती. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या अनेक जेष्ठ नेत्यांना डावलण्यात आलं.

त्याचबरोबर महापालिकेपासून सक्रिय असलेले सुनिल प्रभू, प्रताप सरनाईक यांच्यासारख्या नेत्यांना डावलून अनिल परब यांना मंत्रिपद देण्यात आलं.

शिवसेनेचे जेष्ठ नेते दिवाकर रावते यांच्या युतीची सत्ता असताना असलेलं परिवहन मंत्रीपद अनिल परब यांना मिळालं. त्याचबरोबर संसदीय कार्यमंत्रीही त्यांना करण्यात आलं. त्यामुळे शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांचा एक गट त्यांच्यावर नाराज असल्याचंही बोललं जातं. व्यापक जनाधार नसतानाही ते शिवसेनेचे महत्त्वाचे नेते बनल्यामुळेही त्यांच्यावर पक्षातील लोक नाराज असल्याचं जाणकार सांगतात.

जेष्ठ पत्रकार धवल कुलकर्णी सांगतात, "अनिल परब हे सायलेंट वर्कर आहेत. कुठलही काम दिलं की तडीस नेण्याची त्यांच्यात क्षमता आहे. पण त्यांच्यामागे जनाधार नाही. ते मोठ्या जनाधाराने निवडून येण्याची शक्यता कमी आहे. मंत्री म्हणून ते जबाबदारीवर खरे उतरलेले अद्याप त्यांच्या कामातून सिद्ध झालेलं नाही असं वाटतं. त्यांच्याकडे जे खातं आहे त्यात बरचसं काम करण्यासारखं आहे. पण ते काम होताना दिसत नाहीये."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)