You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नोकरीच्या पहिल्याच दिवशी आढळला नर्सचा मृतदेह, बलात्कार करून लटकवल्याचा संशय
- Author, रवि,
- Role, कानपूरहून, बीबीसी हिंदीकरिता..
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
नोकरीच्या पहिल्याच दिवशी कामावर गेलेली एक नर्स फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ माजली आहे.
उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील ही घटना आहे. नोकरीस लागलेली नर्स केवळ 18 वर्षांची होती. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
कुटुंबीयांच्या तक्रारीवरून उन्नाव येथील बांगरमऊ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित रुग्णालय सीलबंद करण्यात आलं आहे.
नोकरीचा पहिलाच दिवस ठरला अखेरचा
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीच्या नोकरीचा हा पहिलाच दिवस होता. तिला उन्नावच्या बांगरमऊ भागातील दुल्लापुरवा परिसरात न्यू जीवन हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून नोकरी मिळाली होती. विशेष म्हणजे, हे रुग्णालय केवळ पाच दिवसांपूर्वीच सुरू झालं होतं.
25 एप्रिल रोजी या भागातील आमदारांनी न्यू जीवन हॉस्पिटलचं उद्घाटन केलं होतं. मृत नर्स तरुणी जवळच्याच गावातील रहिवासी होती.
कुटुंबीयांनी काय आरोप केले?
मृत तरुणीच्या मामांनी दिलेल्या माहितीनुसार, "तरुणी शुक्रवारी (29 एप्रिल) सायंकाळी या रुग्णालयात काम सुरू करण्यासाठी गेली होती. पण त्यावेळी रुग्णालयात एकही रुग्ण नव्हता.
"तरुणीने जवळच एक खोली भाड्याने घेतली होती. रुग्णालयात कुणीच रुग्ण नसल्याने ती खोलीवर परतली. पण रात्री सुमारे 10 च्या सुमारास तिला फोन करून रुग्णालयात बोलावून घेण्यात आलं. याचवेळी तिच्यावर बलात्कार करून खून करण्यात आला," असा आरोप त्यांनी केला आहे.
घटनेची माहिती मिळताच तरुणीची आई घटनास्थळी दाखल झाली. त्यावेळी त्यांना तरुणीचा मृतदेह रुग्णालयाच्याच भिंतीवर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
तरुणीच्या आईने सांगितलं, "शनिवारी सकाळी आम्हाला रुग्णालयातून फोन आला. मुलीने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचं त्यांनी सांगितलं. जाऊन पाहिलं तर मुलीचा मृतदेह छतावरच्या पिलरच्या सळईला लटकलेला होता. या नोकरीसाठीच मुलीने दोन-तीन दिवसांपूर्वी जवळच एक खोली भाड्याने घेतली होती."
"मला आठ मुली आहेत. मृत तरुणी चौथी मुलगी होती. तीन मोठ्या बहिणीसुद्धा नोकरी करतात. वडिलांचा मृत्यू 10 वर्षांपूर्वी झाला होता. तेव्हापासून मुलीच आमचं घर चालवतात. मृत तरुणीने लहान-मोठी कामे करतच नर्सिंगचं शिक्षण घेतलं होतं," असं आईने सांगितलं.
पोलिसांनी काय म्हटलं?
उन्नावचे सहायक पोलीस अधीक्षक शशी शेखर यांनी या घटनेविषयी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, "तरुणीच्या मूळ गावापासून रुग्णालय 15 किलोमीटरवर आहे. त्यामुळे तिने राहण्यासाठी खोली भाड्याने घेतली होती."
"घटना निदर्शनास आली त्यावेळी मुलीच्या तोंडावर मास्क लावलेला होता. हातात एक फडकं अडकलेलं होता. दोन्ही हात छाती आणि भिंत यांच्यात दबलेले होते. ते फडकं नेमकं कुणाचं, याचा तपास केला जात आहे. सध्या हॉस्पिटल सीलबंद करण्यात आलेलं आहे," असंही शेखर यांनी सांगितलं.
या प्रकरणात तिघांविरुद्ध बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बांगरमऊ पोलीस निरीक्षक बृजेंद्र नाथ शुक्ला यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात पोहोचले त्यावेळी संचालकांसोबत तिन्ही आरोपी उपस्थित होते.
मृत तरुणीचं शवविच्छेदन शनिवारी (30 एप्रिल) रात्री उशिरा दोन डॉक्टरांकडून इन-कॅमेरा करण्यात आलं. मुलीचा मृत्यू गळफासामुळेच झाल्याचं प्राथमिक अहवालात समोर आलं आहे.
मुलीवर झालेल्या अत्याचारांचा अधिक तपास करण्यासाठी नमुने प्रयोगशाळेत पाठवून देण्यात आले आहेत. मुलीच्या पायावर एका ठिकाणी जखमेचे व्रणही आढळून आले आहेत.
बांगरमऊ येथील न्यू जीवन हॉस्पिटलने रुग्णालय सुरू करण्यासाठीची आवश्यक ती परवानगी घेतलेली नसल्याचं आढळून आलं आहे. पुढील तपासासाठी हॉस्पिटल सीलबंद करण्यात आलेलं आहे, अशी माहिती उन्नावच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्य प्रकाश यांनी दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)