'माझ्या कपड्यांवर नाही, अफगाणिस्तानातील महिलांवरील अत्याचारांवर चर्चा व्हावी'

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

अफगाणिस्तानच्या माजी पत्रकार आणि टीव्ही प्रेझेंटर गोलाली करीमी यांच्या कपड्यांबाबत आणि जीवनशैलीबाबत सोशल मीडियावर अफगाण नागरिकांमध्ये वाद सुरू झाला आहे.

करीमी सध्या फ्रान्समध्ये मॉडेल म्हणून काम करतात. त्या इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर सक्रिय आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे 2.8 लाख, तर टिकटॉकवर 2.3 लाख फॉलोअर्स आहेत.

यापूर्वी त्यांनी अफगाणिस्तानमध्ये शमशाद टीव्ही, लेमर टीव्ही आणि नंतर पॅरिसमधील बेगम टीव्हीमध्ये काम केलं आहे.

दोन जून रोजी डॉयचे वेले दारीने 'कंदाहार ते पॅरिस : गोलाली करीमी यांची वादग्रस्त कहाणी' या शीर्षकाखाली एक व्हीडिओ रिपोर्ट प्रकाशित केला.

या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, सोशल मीडियावरील अनेक अफगाण वापरकर्त्यांचं मत आहे की, करीमी यांचा पेहराव आणि जीवनशैली अफगाणिस्तानच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या विरोधात आहे.

करीमी यांनी आपल्या निर्णयाचं समर्थन करताना म्हटलं, "मला असे कपडे घालायचे आहेत, ज्यामध्ये मला स्वतःला आकर्षक आणि आनंदी वाटतं."

करीमी काय म्हणाल्या?

करीमी म्हणाल्या, "मी आता सिनेमा आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे इथले कपडे अफगाणिस्तानपेक्षा वेगळे आहेत. लोकांना वाटतं की माझ्या कपड्यांमुळे आणि वागण्याच्या शैलीमुळे मी अश्लील चित्रपटांमध्ये काम करते. अशा गोष्टी मला त्रास देतात."

करीमी यांनी असंही सांगितलं की, पॅरिसमध्ये अफगाणिस्तानातील काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना आतापर्यंत चार वेळा घर बदलावं लागलं आहे.

त्या म्हणाल्या, "मला सांगण्यात आलं की, तू पश्तून मुलगी आहेस. तुला असे कपडे घालता कामा नयेत."

मुलाखतीत करीमी यांनी सांगितलं की, त्यांनी यापूर्वी तालिबानचे मुख्य प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांची मुलाखत घेतली होती. त्यानंतर मुजाहिद यांनी त्यांना फोन आणि व्हॉइस मेसेज पाठवून सांगितलं की, मुस्लिम आणि पश्तून मुलगी म्हणून त्यांनी आपल्या पेहरावाची काळजी घ्यावी.

करीमी म्हणाल्या की, उत्तर देण्याऐवजी त्यांनी मुजाहिद यांना ब्लॉक केलं, कारण त्यांना आपला वेळ वाया घालवायचा नव्हता.

7 जून रोजी अफगाण ब्रॉडकास्टिंग नेटवर्कशी (ABN) बोलताना करीमी यांनी तालिबानवर टीका केली.

त्या म्हणाल्या, "जिथे लोकांना स्वतःच्या कपड्यांबाबत आणि अगदी दाढीबाबतही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही आणि भीतीचं वातावरण आहे, तिथे मूलभूत अधिकारांबाबत गप्प राहणं ही सर्वात मोठी समस्या आहे."

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

अफगाणिस्तानातील बहुतांश सोशल मीडिया वापरकर्त्यांनी करीमी यांच्यावर टीका करत त्यांच्यावर समाजाचे नियम मोडल्याचा आरोप केला. तर काही लोकांनी त्यांच्या निर्णयाचं समर्थनही केलं.

'वतनदोस्त' या वापरकर्त्याने लिहिलं, "हे स्वातंत्र्य नसून अनैतिकतेचा प्रसार आहे, जो पारंपरिक मूल्यांचा ऱ्हास करत आहे."

'गोरबोज' या वापरकर्त्याने आरोप केला की, करीमी यांनी 'स्वातंत्र्याच्या' नावाखाली अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आणि ऐतिहासिक संस्कृतीकडे पाठ फिरवली आहे.

त्यांनी पुढे असंही लिहिलं की, "कंदाहारमधील किझिलबाश समुदायातून आलेल्या गोलाली करीमी यांनी लाज आणि नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत."

तर भाष्यकार हबीब खान यांनी लिहिलं, "तालिबानला त्यांच्यासारख्या पश्तून महिलांपासून धोका वाटतो, कारण तालिबानचे बहुतांश सदस्यही पश्तून आहेत."

करीमी यांच्या समर्थनार्थ 'महमूदी' या वापरकर्त्याने लिहिलं, "पाश्चिमात्य देशांमध्ये लोक कपड्यांकडे लक्ष देत नाहीत. अफगाणिस्तानात दररोज बलात्कार, गुन्हे, अपहरण आणि दडपशाहीच्या बातम्या येतात. खरी चिंता या मुद्द्यांबाबत असायला हवी."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)