You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लखनौमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत किमान 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू; पाच जण जखमी
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमधील अलीगंज भागात एका इमारतीला लागलेल्या आगीत 15 मुलांचा मृत्यू झाला असून, अन्य पाच जण जखमी झाले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी या घटनेला दुजोरा दिला असून त्यांनी सांगितलं आहे की, कोचिंग सेंटरमध्ये आग लागली आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तळमजल्यावर एक पेट शॉप होतं, तर वरच्या मजल्यावर गेमिंग झोन सुरू होता.
केजीएमयू (KGMU) ट्रॉमा सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमिया अग्रवाल यांनी 15 मुलांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.
त्यांनी 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला सांगितलंय की, "एकूण 21 ते 22 मुलांना इथे आणण्यात आलं होतं. त्यापैकी पाच जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उडी मारल्यामुळे जखमी झालेल्या दोघांच्या कमरेच्या खालच्या भागाला दुखापत झाली असून, सीटी स्कॅननंतर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 15 मुले मृत अवस्थेतच आणली गेली होती. कायदेशीर प्रक्रिया (इनक्वेस्ट) पूर्ण झाल्यानंतर त्यांना शवगृहात पाठवले जाईल. पाच जणांना आधीच पाठवण्यात आलं आहे आणि उर्वरित दहा जणांसाठी ती प्रक्रिया सुरू आहे."
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी सांगितलंय की, या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अपघातानंतर अग्निशमन दलाची शोधमोहीम पूर्ण झाली आहे.
यापूर्वी, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी म्हटलं होतं की, "मी स्वतःच्या डोळ्यांनी 11-12 मृतदेह पाहिले आहेत."
त्यानंतर, जेव्हा एका पत्रकारानं विचारलं की "इथून 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत," तेव्हा उपमुख्यमंत्री म्हणाले, "मी 14 किंवा 13 पाहिले आहेत."
उपमुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?
याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक म्हणाले की, "या घटनेत एकूण 14 मुले आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून, चार मुले जखमी झाली आहेत. त्यांना केजीएमयू (KGMU) ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे."
"या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. माननीय मुख्यमंत्री अलीगडमधील त्यांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करून इथे येत आहेत.
जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळवून देणं, हीच प्राथमिकता आहे. संपूर्ण सरकार बाधित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत देऊ.
शोध मोहीम पूर्ण झाली असून आता आतमध्ये कुणीही नाही. संपूर्ण इमारतीची तपासणी करण्यात आली आहे," असंही ते म्हणाले.
या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यात हयगय केली जाणार नाही, असंही उपमुख्यमंत्री म्हणाले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेबाबत निवेदन जारी केलं आहे. ते अलीगडच्या दौऱ्यावर होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते लखनौकडे रवाना झाले आहेत.
योगी आदित्यनाथ म्हणाले की, "लखनौमध्ये एक दुर्घटना घडली आहे. तिथे आगीच्या विळख्यात काही मुले अडकली होती. त्यामध्ये काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रशासन घटनास्थळी मदतकार्यात गुंतले आहे."
योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला आहे.
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 'एक्स' (X) वरील एका पोस्टद्वारे शोकग्रस्त कुटुंबांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
त्यांनी लिहिलं की, "लखनौमधील एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची आणि अनेकजण जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे."
मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांबद्दल माझ्या अत्यंत संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकरात लवकर बरं होण्याची आशा करतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)