You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भक्त आहे, अंध भक्त नाही #5मोठ्याबातम्या
आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. उद्धव ठाकरे : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भक्त आहे, अंध भक्त नाही
"अंध भक्तांचा सुळसुळाट पहायला मिळत असून अंध भक्त सोयीनुसार भूमिका घेत असतात. जिथे फायदा असतो तिथे ते झुकतात," असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरे असंही म्हणाले की, मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भक्त आहे, अंध भक्त नाही.
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या 'आंबेडकर ऑन पॉप्युलेशन पॉलिसी' या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते झालं. उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली.
ते पुढे म्हणाले, "मागच्या अडीच वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे आगळेवेगळे तयार झालेले रसायन आहे. नितीन राऊत यांनी अभ्यासपूर्वक पुस्तक लिहिल्याचा मला आनंद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ राज्यघटना लिहिली नाही तर काय अडथळे येऊ शकतात ते सुद्धा दाखवले आणि त्यानुसार मार्ग दाखवला. नितीन राऊत, तुम्ही आणि आम्ही बाबासाहेबांचे भक्त आहोत, पण अंध भक्त नाही. सध्या अंधभक्तांचा सुळसुळाट आहे."
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची केवळ जयंती साजरी करून चालणार नाही तर त्यांचे विचार आचरणात आणणंही महत्त्वाचं आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
2. मुंबईत बिगरभाजप मुख्यमंत्र्यांची बैठक होणार
भाजपविरोधात लढण्याासाठी दिल्लीत विरोधी पक्षांच्या बैठक होताना दिसल्या. आता महाराष्ट्रात याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक होऊ शकते.
बिगरभाजप मुख्यमंत्र्यांची एक बैठक मुंबईत लवकरच होऊ शकते. पश्चिम बंगालच्या मुख्ममंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
त्यांनी म्हटलं, "राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रस्तावावर चर्चा केली. तसंच मुंबई ही परिषद आयोजित करण्याची तयारी सुरू झाली आहे. बेरोजगारी, महागाई, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, जातीय-धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न अशा विविध राष्ट्रीय मुद्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे."
झी 24 तासने हे वृत्त दिलं आहे.
दरम्यान, रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त कार्यक्रमांमध्ये झालेले हल्ले राजकीयपुरस्कृत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. ज्या राज्यांमध्ये आगामी निवडणुका आहेत त्याठिकाणी असे प्रकार वाढतील असंही ते म्हणाले.
3. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात अकोला आणि बीडमध्येही गुन्हा दाखल
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे नेतृत्त्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, सातारा, याठिकाणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता अकोला आणि बीडमध्येही सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अकोल्यातील अकोट पोलीस स्टेशनमध्ये सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा न्यायलयीन लढा लढण्यासाठी गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी कर्मचाऱ्यांकडून पैसे रुपये गोळा केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
अकोट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांन औरंगाबादमधून अजयकुमार गुजर आणि अकोल्यातून प्रफूल्ल गावंडेला अटक केली आहे. तसंच यासंबंधी अधिक तपास करण्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा मिळावा म्हणून अकोट पोलिसांनी आता कोर्टात अर्ज केला आहे.
दरम्यान, बीडमध्ये मराठा आरक्षणाविषयी आणि समाजबांधवांच्या मोर्चाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
4. शिवसेना आमदाराच्या पत्नीची आत्महत्या
मुंबईतील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. रजनी कुडाळकर यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे.
रविवारी (17 एप्रिल) रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मंगेश कुडाळकर कुर्ला विधानसभेचे शिवसेनेचे आमदार आहेत. कुर्ल्याच्या नेहरू नगर परिसरात ते राहतात.
पोलिसांनी जागेची पाहणी केल्यानंतर रजनी कुडाळकर यांचा मृतदेह राजावाी पोलीस स्टेशनला शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे
5. एक अपत्य असणाऱ्या दाम्पत्याला सरकारी योजनांमध्ये लाभ द्या, नितीन राऊत यांची मागणी
दारिद्र्यरेषेखालील दाम्पत्याला एक अपत्य असल्यास त्यांना महाविकास आघाडी सरकारकडून वाढीव शासकीय मदत करण्यात यावी, अशी मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.
अल्प उत्पन्न गट तसंच दारिद्र्यरेषेखालील कुटुंब असल्यास आणि दाम्पत्याला एकच अपत्य असल्यास सरकारने त्यांच्या शासकीय योजनांच्या लाभात वाढ करावी असंही ते म्हणाले आहेत.
देशात वाढती लोकसंख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा आणि राज्याच्या आरोग्य विभागाला निर्देश द्यावे. तसंच एकच अपत्य ठेवणाऱ्या कुटुंबाला एकरकमी बक्षीस देण्याची मागणी नितीन राऊत यांनी केली आहे.
नितीन राऊत यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)