You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव, जाणून घ्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार कुठे काय स्थिती
राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप पावसाने जोर धरलेला नाही. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजावरून, आजदेखील (12 जून) अनेक भागांत पावसाचा लपंडाव सुरू असणार आहे.
एका बाजूला राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असताना, दुसरीकडे काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, 15 जूनपासून मोसमी वारे अधिक सक्रिय होणार असल्याचं सांगितलं जात असलं तरी ढगाळ वातावरण आणि हवेतील दमटपणा आणि उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
राज्यातील 24 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून 7 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक भागांत पाऊस आणि उकाडा अशी दुहेरी परिस्थिती अनुभवायला मिळू शकते.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट (हीट वेव्ह) येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्याचा त्रास अधिक जाणवू शकतो.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
हवामानातील बदल लक्षात घेऊन नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय, गोव्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. या भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसासह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामानातील या बदलत्या परिस्थितीमुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)