धनंजय मुंडेंवर ब्रीच कँडीत उपचार, पंकजा आणि प्रीतम मुंडे यांनी घेतली भेट #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी विविध वेबसाईट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

1. धनंजय मुंडेंना ह्रदयविकाराचा सौम्य झटका, ब्रीच कँडीमध्ये उपचार

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. प्रकृती अस्वास्थ्य जाणवू लागल्यानंतर त्यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असून रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

धनंजय मुंडे यांना संध्याकाळच्या सुमारास छातीत वेदना जाणवू लागल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धनंजय मुंडे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली असून त्यांच्या कुटुंबीयांशी देखील त्यांनी संपर्क साधला.

TV9 या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.

2. माझी दिशा 3 मे नंतर वेगळी असणार : खासदार संभाजीराजे

3 मे नंतर माझी दिशा वेगळी असणार आहे, असं सूचक वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापुरात केलं आहे. येत्या 3 मे रोजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत संपत आहे.

ABP माझा या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी मतदान करतेवेळी संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, "आज मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यासाठी 30 सेकंद विचार करून मी मतदान केले. 3 मे रोजी माझ्या खासदारकीची मुदत संपत आहे. त्यानंतर आपली दिशा वेगळी असणार आहे. तीन तारखेनंतरच याबाबतची भूमिका काय असेल हे जाहीर करणार आहे."

3.मुख्यमंत्री नितीश कुमारांपासून 15 फूट अंतरावर झाला स्फोट

बिहारच्या नालंदामधून मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या जनसंवाद कार्यक्रमादरम्यान स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यापासून 15 ते 18 फुटांवर हा स्फोट झाला. त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.

सकाळ ने दिलेया बातमीनुसार हा स्फोट काही छोट्या फटाक्यांमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं असून अटक करण्यात आलेला तरुण शुभम आदित्य हा इस्लामपूरच्या सत्यरगंज गावचा रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री त्याचं म्हणणं ऐकत नव्हते, त्यामुळं त्यानं लक्ष वेधण्यासाठी फटाके फोडल्याचं सांगितलं जात आहे. अटक करण्यात आलेला तरुण इस्लामपूरमधील बीएस्सी पदवीधर महाविद्यालयात शिकत आहे. यापूर्वी बख्तियारपूरमध्ये सीएम नितीश कुमार यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.

4. मोदी सत्तेत आल्यापासून पेट्रोल डिझेलचे दर चौपट

गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहे. इतकंच नाही तर गेल्या 20 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत तब्बल 10 रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याचं सांगितलं जात आहे.

किंमती वाढल्यानं सामान्य लोकांच्या खिशावर ताण पडतोय. पण असं असलं तरी सरकारी खजिना मात्र भरत आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अॅनालिसिस सेल (PPAC) नुसार 8 वर्षांमध्ये पेट्रोलची किंमत 45 टक्के आणि डिझेलची किंमत तब्बल 75 टक्क्यांनी वाढली आहे. 1 एप्रिल 2014 रोजी दिल्लीत पेट्रोलचे दर 72.26 रुपये इतके होते. तर डिझेलचे दर 55.49 रुपये प्रति लिटर इतके होते.

8 वर्षांनंतर 11 एप्रिल 2022 रोजी दिल्लीत पेट्रोलचे दर 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 96.67 रुपये प्रति लिटर इतके झाले होते. या आठ वर्षांच्या कालावधीत पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटीनं केंद्र सरकारची कमाई तब्बल चौपट झाली आहे. पीपीएसीनुसार 2014-15 मध्ये केंद्रानं एक्साईज ड्युटीच्या माध्यमातून 99 हजार 068 कोटी रुपये कमावले होते. 2020-21 मध्ये केंद्राला या माध्यमातून 3.73 लाख कोटी रुपये मिळाले. 2021-22 मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत केंद्राला एक्साईज ड्युटीतून 1.70 लाख कोटी मिळाले आहेत.

लोकमत या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.

5. पत्रा चाळ प्रकल्पातील 100 हून अधिक फ्लॅटचे बुकिंग बनावट?

गोरेगावातील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात विक्रीसाठी बांधण्यात येत असलेल्या प्रस्तावित मेडोज इमारतीमध्ये 100 हून अधिक फ्लॅट बनावट पद्धतीने बुक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या तपासात समोर आली आहे. या प्रकल्पाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. पुढारी या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.

हाउसिंग डेव्हलपमेंट इफ्रास्ट्रक्चर लि. (एचडीआयएल) आणि पंजाब अँड महाराष्ट्र बँकेत (पीएमसी) झालेल्या घोटाळ्याशी संबंधित असलेल्या राकेशकुमार वाधवान आणि सारंगकुमार वाधवान कुटुंबियांसोबतच शिवसेनेचे खा. संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र प्रवीण राऊत यांचा घोटाळ्यात सहभाग असल्याची ईडीला खात्री आहे. प्रवीण राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळ्यातील सुमारे 100 कोटी रुपये एचडीआयएलच्या माध्यमातून हडपल्याच्या आरोपाखाली ईडीने फेब्रुवारी महिन्यात प्रवीण राऊत अटक केली होती.

ईडीच्या तपासात काही खरेदीदारांचे पत्ते बनावट असल्याचे आढळून आले. विकासकाने नाममात्र रक्कम आकारून किंवा काहीच रक्कम न घेता डमी नावावर हे फ्लॅट बुक केल्याचे उघड झाल्याने या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार्‍या गुरु आशिष कन्स्ट्रक्शनकडे फ्लॅट बुक करणार्‍यांना आता ईडीने समन्स बजावले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)