You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अफगणिस्तान: तालिबानचं घूमजाव, मुलींसाठी माध्यमिक शाळा पहिल्याच दिवशी बंद
मुलींसाठीही माध्यमिक शाळा सुरू करू, हा शब्द तालिबाननं फिरवला आहे. अफगाणिस्तानमधल्या तालिबान प्रशासनानं म्हटलं की, मुलींसाठी अजून गणवेश काय असावा हे निश्चित झालं नाहीये. त्यामुळेच शाळा सुरू केल्या जाऊ शकत नाहीत.
ऑगस्ट 2021 मध्ये जेव्हा अफगाणिस्तानवर तालिबाननं नियंत्रण मिळवलं, तेव्हा पूर्ण देशातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. या शाळा आता पुन्हा सुरू होणार होत्या, मात्र त्यावर अजूनपर्यंत तरी कोणताही निर्णय झालेला नाही.
शिक्षण मंत्रालयाने अचानकपणे जाहीर केलं की, मुलींसाठी उच्च माध्यमिक शाळा बंद राहतील. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. तालिबान सरकारच्या या निर्णयानंतर काही मुलींना रडूच फुटलं.
काही मुली आणि त्यांचे आई-वडीलही या निर्णयानंतर नाराज झाले होते. अगदी ऐनवेळी जाहीर केलेल्या या निर्णयावर त्यांनी आपला रागही व्यक्त केला होता.
दुसरीकडे माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थिनी पुन्हा एकदा शाळेत जायला मिळणार या विचारानेच खूश झाल्या होत्या.
तालिबाननं नेमकं काय म्हटलं?
आठवड्याभरापूर्वी शिक्षण मंत्रालयानं म्हटलं की, देशातील मुलींच्या शाळांसह सर्व शाळा या बुधवारी (24 मार्च) सुरू करण्यात येतील. पण आता सांगितलं जात आहे की, मुलींच्या सर्व शाळा या पुढचा आदेश येईपर्यंत बंद राहतील.
नोटीसमध्ये म्हटलं आलं आहे की, मुलींसाठी गणवेश निश्चित केल्यानंतरच शाळा सुरू केल्या जातील. गणवेश 'शरीयत कायदा आणि अफगाणी परंपरे'नुसारच तयार केला जाईल.
पण गणवेशचा कारण देत शाळा सुरू न करण्याच्या निर्णयावर मुलींचे आईवडील रागावले आहेत.
नाव न छापण्याच्या अटीवर एका व्यक्तीनं सांगितलं की, शाळा सुरू न करण्याच्या निर्णयाचा माझ्या मुलीला मानसिक धक्का बसला आहे. आज सकाळी जेव्हा तालिबानच्या अधिकाऱ्यांनी तिला शाळेत घुसू दिलं नाही, तेव्हा तिला रडूच फुटलं.
ते सांगतात की, जर माझ्या मुलीला काही झालं, तर मी तालिबानला कधीच माफ करणार नाही.
मुलींच्या शाळा सुरू करण्यावरून तालिबानमध्ये मतभेद
नव्वदच्या दशकात अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीने मुलींच्या शिक्षण घेण्यावर बंदी घातली होती. यानंतर तालिबानने मागील वर्षी अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळवला तेव्हा मुलांच्या शाळा आणि मुलींच्या फक्त प्राथमिक शाळा उघडण्यास परवानगी देण्यात आली होती.
मुलींच्या माध्यमिक शाळा बुधवारी (23 मार्च) सुरू होणार होत्या. मात्र त्याआधीच शाळा सुरू होणार नसल्याचा निर्णय तालिबानने प्रसिद्ध केला. मुलींच्या शिक्षणाचा मुद्दा अजूनही कट्टरतावाद्यांमध्ये विवादित असल्याचं काही तालिबान सदस्य खाजगीत कबूल करतात.
शेवटच्या क्षणी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे तालिबानी संघटनेत उभी फूट निर्माण झाली आहे. आधुनिक अफगाणी समाजाच्या आकांक्षांपासून नेतृत्व अनभिज्ञ असल्याची चर्चा ही त्यांच्यात होती.
महिला हक्क कार्यकर्त्या आणि अफगाण महिला नेटवर्कच्या संस्थापक महोबा सिराज मुलींच्या शाळा उघडण्यासंबंधी तालिबानने घेतलेल्या यू-टर्नमुळे आश्चर्यचकित झाल्या आहेत.
त्यांनी बीबीसीला बोलताना सांगितलं की, "महिलांनी हिजाब नीट घातला नसल्याची सबब त्यांनी शोधून काढली. असा कोणताही नियम नाहीये. त्यांनी आज सकाळीच हिजाब नीट घातला जात नसल्याचं ठरवलं. त्यांनी असा निर्णय का घेतला माहीत नाही?"
त्या म्हणाल्या की, अफगाणिस्तानमधील मुलींचा शालेय गणवेश अशा पद्धतीचा आहे की त्यात त्यांचं शरीर पूर्णपणे झाकलं जातं.
तालिबानला परदेशी निधी हवा असेल तर आंतरराष्ट्रीय समुदायाने त्यांच्यासाठी एक अट ठेवली होती. त्याप्रमाणे जर महिला आणि मुलींना शिक्षण घेण्याची परवानगी दिली तरच तालिबनला परदेशी निधी मिळेल.
सिराज म्हणतात, "आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढं यावं आणि म्हणावं की, तुम्ही (तालिबान) हे करण्याचा निर्णय घेतला असेल, तर आम्हीही निर्णय घेतला आहे. जर तुम्ही मुली आणि महिलांच्या शिक्षणाला मान्यता दिली नाही तर आम्ही ही तुम्हाला पैसे देणार नाही."
नोबेल शांतता पारितोषिक विजेती आणि पाकिस्तानातील महिला हक्क कार्यकर्ती मलालाने ट्वीट करून या विषयावर आपलं मत मांडलं आहे.
ती लिहिते की, मला आज एक आशा होती की अफगाणिस्तानातील शाळेत जाणाऱ्या मुलींना परत पाठवलं जाणार नाही. मात्र तालिबानने त्यांच आश्वासन पूर्ण केलेलं नाही. मुलींना शिकण्यापासून रोखता यावं यासाठी ते फक्त निमित्त शोधत राहतील, कारण त्यांना सुशिक्षित मुली आणि सशक्त महिलांची भीती वाटते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)