पेनड्राइव्ह प्रकरणातले प्रवीण चव्हाण कोण आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये कॅमेरा कसा प्लांट करण्यात आला?

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या प्रकरणात गोवण्यासाठी महाविकासआघाडी सरकारने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा वापर केला, असा आरोप दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केल्यानंतर राज्यात गदारोळ झाला आहे. आज देखील विधानसभेत प्रवीण चव्हाण यांचा मुद्दा चर्चिला गेला. चव्हाण यांनी राजीनामा दिले असल्याचे

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर अनेक आरोप केले होते. ते आरोप फेटाळून लावत तेजस मोरे या त्यांच्या आशिलाने कॅमेरा असलेलं घड्याळ त्याच्या ऑफिसमध्ये लावल्याचं चव्हाण म्हणाले.

तसंच एका व्यक्तीच्या माध्यमातून ते काढून नेल्याचा आरोप देखील चव्हाण यांनी केला आहे.

पेनड्राइव्ह प्रकरणानंतर सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आपला राजीनामा दिला आहे. या प्रकरणाबाबत बीबीसी मराठीने त्यांच्याशी बातचीत केली. ते या प्रकरणाबाबत काय म्हणाले?

प्रश्न:तेजस मोरे याने तुमच्या ऑफिसमध्ये कॅमेरा असलेलं घड्याळ लावलं होतं हा आरोप मोरे याने फेटाळला आहे तुमची प्रतिक्रिया काय ?

प्रवीण चव्हाण: हे घड्याळ त्यानेच आणलं होतं. आधी त्याने एसी लावण्याचा प्रयत्न केला त्याला मी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर स्मार्ट टीव्ही लावण्याचा सुद्धा त्याने प्रयत्न केला. मी मुंबईला गेलेलो असताना त्याने हे घड्याळ इथे लावलं. त्यासाठी लागणारा इलेक्ट्रिक त्यानेच आणला होता.

मी त्याला म्हटलं होतं हे घड्याळ इथे लावण्याची गरज नाही. त्याने नंतर काढतो असं सांगितलं. माझ्याकडे वेळ नव्हता. इतर केसेससाठी मी नागपूर आणि इतर ठिकाणी जात असतो. त्याचा गैरफायदा घेऊन मॅन्यूपुलेशन त्याने स्टिंग ऑपरेशन द्वारे केले आहे. त्यामध्ये ओव्हरलॅपिंग, लिपसिंग अश्या इतर बाबी करण्यात आल्या आहेत.

प्रश्न: एका व्यक्तीने तुमच्या ऑफिसमधून ते घड्याळ काढून नेलं ती व्यक्ती कोण आहे? ती इथे कधी आली होती ?

प्रवीण चव्हाण: त्या व्यक्तीला तेजस मोरेने दोन तीन वेळेला ऑफिसमध्ये आणलं होतं. या व्यक्तीची काही चूक नसताना याला एका गुन्ह्या मध्ये आरोपी करण्यात आलं आहे, असं सांगून त्याने त्या व्यक्तीला आणलं होतं.

माझ्या पश्चात ऑफिस साफ करण्याच्या बहाण्याने येऊन त्याने माझा मोबाईल ही चोरला आहे. माझ्या लॅपटॉपच्या बॅगमधील काही कागदपत्रे देखील त्याने चोरली असतील. तिसरी गोष्ट म्हणजे आठ तारखेला ही व्यक्ती सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे. तेजस मोरेने त्या व्यक्तीला ऑफिसची चावी दिली होती. आणि खाली उभ्या असलेल्या व्यक्तीला ते घड्याळ द्यायला सांगितले होते. घड्याळ घेतल्यानंतर त्या व्यक्तीने फोन बंद केला तो आजही बंद आहे.

प्रश्न: तेजस मोरे याच्यावर याआधी तुम्हाला संशय आला होता का?

प्रवीण चव्हाण: मला तेजस मोरेवर दोन तीन वेळा संशय आला होता. परंतु मला तेवढा वेळ नव्हता. ऑफिसला आल्यानंतर मी लगेच निघून जात होतो. सगळं चित्रिकरण पाहिलं तर मी बोलत नसताना देखील माझा आवाज येताना दिसतोय.

प्रश्न: तेजस मोरे याने आरोप केले आहेत की त्याचं इंग्लिश चांगलं असल्याने तुम्ही त्याच्याकडून इंग्लिशमध्ये काही जबाब लिहून घेत होतात. गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्यासाठी त्या जबाबाच्या माध्यमातून तुम्ही कट रचत होतात. यावर तुमचं काय म्हणणं आहे?

प्रवीण चव्हाण: यात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. मी इंग्रजीमध्ये कुठलाही जबाब दिला नाही किंवा मराठीतही कुठला जबाब दिलेला नाही.

प्रश्न: तुम्ही पोलिसांना कुठे रेड टाकायची याबाबत सांगत होता असा देखील आरोप मोरे यांच्याकडून करण्यात येतोय.

प्रवीण चव्हाण: यात कुठलंही तथ्य नाही. कुठे रेड टाकायची किंवा कुठे नाही हे सर्वस्वी पोलीस ठरवत असतात.

प्रश्न: जे व्हिडिओ समोर आले आहेत त्यात तुम्ही दिसत आहात. हे व्हिडीओ कधी शूट केले आहेत?

प्रवीण चव्हाण: हे कधी शूट केले माहीत नाही. 2020 मध्ये एनडीटीव्हीने एक स्टोरी केली होती. मनोज तिवारी नावाच्या व्यक्तीचा व्हिडिओ डीफेक केला होता. त्याप्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे केलेलं आहे.

प्रश्न:तुमच्या वर अनेक आरोप झालेले आहेत त्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करणार आहात का?

प्रवीण चव्हाण: यावर सर्व कायदेशीर गोष्टी मी करणार आहे.

प्रश्न:देवेंद्र फडणवीस तुमच्याबाबात आणखी काही गौप्यस्फोट करणार आहेत असं म्हणाले होते.

प्रवीण चव्हाण: असं कुठलंही गौप्य नाहीच तर गौप्यस्फोट करण्याचा प्रश्नच येत नाही.

प्रश्न:देवेंद्र फडणवीस या प्रकरणाच्या सीबीआई चौकशीची मागणी करत आहेत. तुम्ही त्या चौकशीला सामोरे जाणार का?

प्रवीण चव्हाण: कोणतीही चौकशी झाली तरी मी त्या चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)