हिजाब कर्नाटक : जय श्रीरामला उत्तर देणारी मुस्कान खान म्हणते, 'भीती वाटल्यावर मी अल्लाहचं नाव घेते'

    • Author, इम्रान कुरैशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

"मी 'अल्लाहू अकबर' म्हणाले, कारण मी त्यावेळी खूप घाबरले होते. भीती वाटल्यानंतर नेहमी मी अल्लाहचं नाव घेते."

कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील एका प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजात बी. कॉमच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या मुस्कान खानचं हे वक्तव्य.

दोन दिवसांपूर्वी एक व्हीडिओ देशभरात व्हायरल झाला होता. यामध्ये एक हिजाब घातलेली मुलगी आपली गाडी स्टँडवर उभी करून क्लासकडे जात असते. त्याचवेळी एक जमाव तिच्या मागे-मागे येतो.

भगवे शेले खांद्यावर टाकून हा जमाव 'जय श्रीराम'ची आक्रमक घोषणाबाजी करताना दिसतो.

घोषणा देत-देतच जमाव मुलीच्या मागे चाल करून जातो. त्याच्या प्रत्युत्तरादाखल मुलगीही मागे फिरते आणि दोन्ही हात उंचावून 'अल्लाहू अकबर'च्या घोषणा देऊ लागते.

सध्या देशभरात या व्हीडिओची चर्चा आहे. या प्रसंगी धैर्य दाखवणाऱ्या मुस्कानचं कौतुकही केलं जात आहे.

बीबीसीने या विद्यार्थिनीशी बातचीत करून त्यावेळची नेमकी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

त्या दिवशी तुझ्यासोबत काय घडलं?

मला काहीच माहिती नव्हतं. मी नेहमी जशी कॉलेजला जाते, तशीत त्यादिवशीही गेले होते. तिथे बाहेरून आलेले काही जण गटागटात उभे होते.

ते मला म्हणाले, तू बुरखा घालून कॉलेजच्या आत जाऊ शकणार नाहीस. तुला कॉलेजात जायचं असेल तर बुरखा आणि हिजाब काढूनच आत जावं लागेल. बुरख्यातच राहायचं असेल तर पुन्हा घरी निघून जा.

मी आत आले, विचार केला की गुपचूप तिथून पुढे निघून जावं. पण तिथं खूप घोषणाबाजी होत होती.

'बुरखा काढ', 'जय श्रीराम' अशा प्रकारच्या घोषणा देण्यात येत होत्या. मी विचार केला की सरळ क्लासमध्ये निघून जावं. पण सगळी मुले माझ्या मागे येताना मला दिसलं. त्यांना माझ्यावर हल्ला करायचा होता.

ते जवळपास 40 जण होते. मी तिथं एकटीच होते. त्यांच्यात काहीच माणुसकी नव्हती. सगळे माझ्याजवळ येऊन आरडाओरडा करू लागले. त्यातल्या काहींनी भगवे शेले घातलेले होते.

ते माझ्यासमोर येऊन शेले फिरवत होते. जय श्रीराम, निघून जा, बुरखा काढ, असं ते सतत म्हणत होते.

तू कधीपासून हिजाब वापरत आहेस?

पहिल्यांदा प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजात गेले, तेव्हापासूनच मी हिजाब वापरते. कॉलेजमध्ये कोणतीच अडचण नव्हती. सगळं पूर्वीसारखंच सुरू होतं. आम्ही हिजाब घालूनच क्लासमध्ये जायचो.

आम्ही पूर्वी बुरखा घालत नसायचो. फक्त हिजाब वापरायचो. आपले केस लपवत होतो. पण हे लोक मला कँपसच्या आतही जाऊ देत नव्हते. त्यात बरेचजण बाहेरचेच होते.

लोक काय म्हणत होते?

ते म्हणत होते की बुरखा काढ. नाहीतर कॉलेजला जाऊ शकणार नाहीस. ते सगळे मला धमकावत होते. माझ्यापूर्वी तिथं चार मुली आल्या होत्या.

त्यांच्यासमोर तर गेटसुद्धा लॉक केलं होतं. नंतर प्रिन्सिपल आले. त्यांनी आणि इतर शिक्षकांनी मला संरक्षण दिलं.

इतर चार मुलींसोबतही असंच करण्यात आलं. त्या रडत रडत आतमध्ये निघून गेल्या.

माझ्यासोबतही तसंच करण्याचा प्रयत्न झाला. मी रडले नाही. त्यांच्याविरोधात आवाज उठवला.

तू त्यांना काय म्हटलं?

मी 'अल्लाहू अकबर' म्हणाले, कारण मी त्यावेळी खूप घाबरले होते. भीती वाटल्यानंतर नेहमी मी अल्लाहचं नाव घेते.

अल्लाहचं नाव घेतल्यानंतर माझ्यात थोडं धाडस येतं. फक्त इतकंच.

हिजाब वापरण्याबाबत तुला काय वाटतं?

कॉलेजमध्ये स्वतः प्रिन्सिपलनी मला हिजाब घालून येण्याची परवानगी दिली आहे. आता काही बाहेरचे लोक येऊन कॉलेजमध्ये तमाशा करत आहेत.

तू आधी कशी यायची, तशीच आताही येऊ शकतेस, असं मला प्रिन्सिपलनी सांगितलेलं आहे.

पण बाहेरून येऊन लोक इथं असे प्रकार करत आहेत.

हिजाब वापरावा किंवा नाही?

मला वाटतं, हिजाब हा वापरायलाच हवा.

यावर आक्षेप असल्यास तुझं मत काय?

माझा भारताच्या संविधानावर विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळेल. आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करत आहोत.

सध्या हिजाबविरोधात भगवा शेला असा वाद सुरू आहे, त्याबद्दल तुला काय वाटतं?

मी इथं हिंदू-मुस्लीम असा कोणताच जातीयवाद निर्माण करत नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावं.

मी फक्त माझ्या शिक्षणासाठी, माझ्या हक्कांसाठी इथं उभी आहे. आम्हाला शिक्षणात पुढे जाऊ देण्यात येत नाही. हिजाब असल्यामुळे कॉलेजमध्ये प्रवेश करू दिला जात नाही.

हिजाब आम्ही वर्षानुवर्षे वापरत आहोत. नवीन वापरतोय, असं काही नाही. हे लोक अलिकडेच शेले वापरत म्हणतात की तू हे घातलंस की आम्हीही हे वापरणार.

माझ्या कॉलेजातील मुलं प्रिन्सिपलना बोलत होती की ती बुरखा घालून आली तर आम्हीसुद्धा मागे हटणार नाही.

आम्हाला काही अडचण नाही. ज्याला जसं यायचंय, त्याने तसं यावं. आम्हाला फक्त हिजाब वापरण्याची परवानगी द्यावी. ती कशीही असो. आम्हाला इतर काहीच म्हणायचं नाही. प्रिन्सिपल आमच्यासोबत आहेत. शिक्षकआमच्यासोबत आहेत. फक्त हे बाहेरचे लोक येऊन इथं तमाशा करत आहेत.

आम्हाला संविधानावर विश्वास आहे. हायकोर्टातूनही नकारात्मक निर्णय येणार नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)