U19 World Cup: राज बावाची अनोखी कहाणी, आजोबा ऑलिम्पिक पदकविजेते आणि नातू वर्ल्डकप चॅम्पियन

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

वर्ल्डकप स्पर्धेची फायनल म्हणजे दडपण असणं साहजिक. पण आजोबा आणि बाबांकडून मिळालेला खेळाचा वारसा जपत राज बावाने 5 विकेट्स आणि 35 धावा करत भारतीय संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

U19 वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये 5 विकेट्स पटकावणारा राज केवळ दुसरा गोलंदाज आहे. इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडत राजने भारताच्या विजयाचा पाया रचला. फलंदाजीत 35 धावांचं योगदान देत बावाने शनिवारचा दिवस आपलाच असल्याचं सिद्ध केलं.

राजचे आजोबा तारलोचन बावा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य होते. भारतीय संघाने 1948 मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. योगायोग स्पर्धेत तारलोचन यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनवर 4-0 विजय मिळवला होता. त्यांच्या नातवाच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर भारताने U19 वर्ल्जकप स्पर्धेत इंग्लंडला नमवलं.

राजचे वडील सुखविंदर हॉकी आणि क्रिकेट खेळायचे, पण दुखापतीमुळे त्यांना क्रिकेट लवकर सोडावं लागलं. यानंतर वयाच्या 22 व्या वर्षीच सुखविंदर क्रिकेट कोच झाले. युवराज सिंगला त्यांनी मार्गदर्शन केलं आहे.

16व्या वर्षापर्यंत फलंदाजांच्या तंत्रकौशल्यावर काम करता येतं. त्यानंतर मानसिक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. त्याच्या वेगवान गोलंदाजीवर फार काम केलं नाही. त्याच्या अक्शनमध्ये थोडा बदल केला. गोलंदाजी करताना त्याचा गुडघा वाकत असे. त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता जास्त होती. तेवढा बदल केला असं सुखविंदर यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं.

शिस्तप्रिय कोच असलेल्या सुखविंदर यांनी पाच वर्ष राजला वेगवान गोलंदाजीपासून रोखलं होतं. मधल्या फळीत खेळणारा राज ऑफस्पिन गोलंदाजी करत असे. फलंदाजीवर त्याने लक्ष केंद्रित करावं असा सल्ला सुखविंदर यांनी दिला. फलंदाजी न येणारा गोलंदाज राजने होऊ नये असं त्यांना वाटत होतं. त्याची फलंदाजाची कौशल्यं त्यांनी घोटवून घेतली.

राज बावाने पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धही 4 विकेट घेतल्या होत्या. आयर्लंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात त्याने 42 रनची खेळी केली, तर युगांडाविरुद्ध राजने 108 बॉलमध्येच 162 रनची आक्रमक खेळी केली, यामध्ये त्याने 14 चौकार आणि 8 षटकार लगावले.

युगांडाविरुद्धच्या 162 रनच्या खेळीसोबतच राज बावाने भारताचा ओपनर शिखर धवनचा विक्रमही मोडला. अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम बावाच्या नावावर झाला. 2004 साली धवनने स्कॉटलंडविरुद्ध ढाक्यात 155 रन केले होते.

बॉलिंग उजव्या हाताने करणारा राज बावा डावखुरी बॅटिंग करतो. राज बावाचा रोल मॉडेल भारताचा दिग्गज खेळाडू युवराज सिंग युवराज सिंगनेही राज बावाच्या वडिलांच्या मार्गदर्शनात क्रिकेटचे धडे गिरवले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)