You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
श्वेता तिवारीच्या विरोधात ब्रा बद्दलच्या 'या' वक्तव्यामुळे गुन्हा दाखल
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी एका वादग्रस्त वक्तव्यामुळं चांगलीच अडचणीत आली आहे.
"माझ्या ब्राचं माप देव घेत आहे," अशा प्रकारचं वक्तव्य श्वेता तिवारीनं केलं होतं. त्यामुळं तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
श्वेता तिवारी हिनं तिच्या आगामी वेब सिरीजच्या प्रमोशनसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे.
श्वेतानं या संपूर्ण प्रकारावरून निर्माण झालेल्या गदारोळानंतर माध्यमांत निवेदन देत, माफी मागितली आहे. तसंच वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं स्पष्टीकरणही दिलं आहे.
श्वेता विरोधात गुन्हा दाखल
श्वेताच्या या वक्तव्यानंतर तिच्याविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिले आहेत.
नरोत्तम मिश्रा यांनी ट्विटरवर एक व्हीडिओ पोस्ट करत श्वेता तिवारीविरोधात IPC च्या कलम 295 A के अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे.
त्यापूर्वी याबाबत माहिती मिळाल्यानं नरोत्तम मिश्रा यांनी याबाबत निषेध व्यक्त केला होता.
"अभिनेत्री श्वेता तिवारीचं भोपाळमधील वक्तव्य निषेधार्ह आहे. भोपाळचे पोलिस आयुक्त मकरंद देऊस्कर यांना 24 तासांत याची माहिती घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत," असं त्यांनी म्हटलं होतं.
नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या आगामी 'शो स्टॉपर' या वेब सिरीजच्या प्रमोशनसाठी भोपाळमध्ये आली होती. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना तिनं ब्रा संदर्भात एक वक्तव्य केलं.
श्वेता तिवारीबरोबर या वेबसिरीजमध्ये दिगांगना सूर्यवंशी, रोहित रॉय आणि सौरभ राज जैन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. त्यापैकी सौरभ राज जैन यांनी यापूर्वी टिव्हीवर कृष्णाची भूमिका साकारलेली आहे.
या वेबसिरीजमध्ये सौरभ जैन यांनी एका 'ब्रा फिटर'ची भूमिका केली आहे. त्यासंदर्भात पत्रकारांबरोबर बोलताना श्वेता तिवारीनं गमतीनं "माझ्या ब्राचं माप देव घेत आहे," अशा अर्थाचं वक्तव्य केलं होतं.
पण काही काळातच याबाबत सोशल मीडियावर प्रचंड माहिती पसरली आणि श्वेता तिवारीवर टीकेची झोड सुरू झाली.
'वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला'
दरम्यान, श्वेतानं या संपूर्ण प्रकारावरून निर्माण झालेल्या गदारोळानंतर माध्यमांत निवेदन देत, माफी मागितली आहे. तसंच वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं स्पष्टीकरणही दिलं आहे.
"देव असा उल्लेख करून मी केलेलं वक्तव्य हे प्रत्यक्षात सौरभ राज जैन यांच्या संदर्भात केलेलं होतं, हे लक्षात घ्यायला हवा. त्यांनी पूर्वी केलेल्या भूमिकेच्या अर्थानं मी तसं म्हटलं होते.
"लोक अभिनेत्याचा संबंध त्यांनी निभावलेल्या पात्रांशी जोडत असतात. त्यामुळं मी माध्यमांशी बोलताना असं उदाहरण देत बोलले," असं श्वेतानं म्हटलं.
माझं वक्तव्य पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं सादर करण्यात आलं, हे पाहून वाईट वाटत आहे. माझ्यासारखी देवावर प्रचंड विश्वास असणारी व्यक्ती, जाणून बुजून अशा प्रकारचं वक्तव्य करूच शकत नाही, ज्यामुळं लोकांच्या भावना दुखावल्या जातील, असंही ती म्हणाली.
"तरीही नकळतपणे माझ्याकडून काही जणांच्या भावना दुखावल्या गेल्या. पण माझा तसा हेतू नव्हता. त्यामुळं मी त्या सर्वांची माफी मागते," असं म्हणत तिनं जाहीर माफी मागितली आहे.
श्वेता तिवारी टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बिग बॉस शोच्या चौथ्या पर्वाची ती विजेती होती. त्यानंतर तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. तसंच खासगी आयुष्यातील वादांसाठीही श्वेता कायम प्रसिद्धीच्या झोतात असते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)