एन. डी. पाटील यांच्या कारकीर्दीतले पाच टप्पे आणि पाच किस्से

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचा आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं, त्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचं 17 जानेवारी 2022 रोजी निधन झालं.

एन. डी. पाटलांनी गेल्या साठ-सत्तर वर्षांच्या सक्रीय सार्वजनिक आयुष्यात सर्वसामान्य, कष्टकरी, शोषित-वंचितांसाठी अनेक आंदोलनं केली.

प्रा. एन. डी. पाटील महाराष्ट्राचे मंत्रीही होते. मात्र, मंत्रिपदाचा त्यांचा कार्यकाळ अल्पच राहिला. असं असलं तरी मंत्री होण्याची गोष्ट शरद पवारांच्या बंडाशी संबंधित आहे.

हा किंवा यासह आणखी काही टप्पे, किस्से, ज्यातून प्रा. डॉ. एन. डी. पाटलांना थोडं आणखी जाणून घेता येईल, ते आपण पाहूया.

1) पवारांच्या बंडामुळे मंत्री

प्रा. डॉ. एन. डी. पाटील हे राजकारणात तसे शरद पवारांचे सीनियर. मात्र, एन. डी. पाटील पहिल्यांदा मंत्री झाले, ते शरद पवारांच्या एका धाडसी बंडामुळे.

1978 साली ज्यावेळी ऐन अधिवेशनात शरद पवारांनी बंड केलं आणि काँग्रेसमधले आमदार घेऊन बाहेर पडले, त्यावेळी त्यांना सत्ता स्थापनेसाठी जशी जनता पक्षानं साथ दिली, तशीच शेतकरी कामगार पक्षानंही दिली. शेकापचे त्यावेळी 13 आमदार होते. त्यातले एक एन. डी. पाटील होते.

पवारांना पहिल्यांदा मुख्यमंत्री बनवणाऱ्या या 1978 च्या पुलोदच्या प्रयोगात शेकापला दोन मंत्रिपदं मिळाली. मग शेकापकडून गणपतराव देशमुख आणि एन. डी. पाटील मंत्री झाले.

पवारांच्या या सरकारमध्ये एन. डी. पाटील सहकार मंत्री होते. कापसाच्या खरेदी-विक्रीतलं धोरण आखून, शेतकऱ्याला एका दिवसात पैसे मिळण्याची तरतूद करण्याचा निर्णय एन. डी. पाटलांनी मंत्री असतानाच घेतला.

त्यांच्या मंत्रिपदाच्या काळातला एक किस्सा प्रसाद कुलकर्णी सांगतात. प्रसाद कुलकर्णी हे एन. डी. पाटलांनी स्थापन केलेल्या समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस आहेत.

ते सांगतात, "साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे एन. डी. पाटील सरांच्याबाबत तंतोतंत खरे आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचे सहकार मंत्री असतानाही स्वतःचे कपडे स्वतः धुताना एनडी दिसले."

एन. डी. पाटील दोनच वर्षे मंत्री राहिले. मात्र, पुलोद, शरद पवार यांप्रमाणे शेकापचा मंत्रिमंडळातील सहभाग हाही पुढे चर्चेचा विषय राहिला.

2) दोन दशकांहून अधिक विधिमंडळात

काँग्रेसनं उपपक्षांबाबत घेतलेल्या निर्णयानंतर अनकेजण बाहेर पडले. लोहिया वगैरे मंडळी जशी बाहेर पडून समाजवादाच्या छताखाली एकत्र आले, तसे महाराष्ट्रातले त्यावेळचे काही नेत्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या छताखाली एक होण्याचं ठरवलं. 1947-48 चा हा काळ.

एन. डी. पाटील तेव्हा तरुण होते. आधी काँग्रेसमध्ये ते सक्रीय होते. मात्र, नंतर त्यांनी शेकापसोबत कारण्यास सुरुवात केली आणि अखेरपर्यंत त्यांनी शेकापच्या विचारधारेशी तडजोड केली नाही.

एन. डी. पाटील विधिमंडळात जवळपास दोन दशकांहून अधिक काळ राहिले.

1960 साली एन. डी. पाटलांनी पहिल्यांदा विधान परिषदेचे सदस्य म्हणून विधिमंडळात प्रवेश केला. मग पुढे 1960 ते 1966, 1970 ते 76, 1976 ते 82 अशी 18 वर्षे ते विधानपरिषदेत राहिले.

तसंच, 1985 साली ते विधानसभेच्या रिंगणात उतरले आणि कोल्हापुरातून ते जिंकलेही. मग 1985 ते 1990 पर्यंत त्यांनी विधानसभेत आमदार म्हणून काम पाहिलं.

3) सीमावासियांसाठी मैदानात ते सेझ, टोल आंदोलनं

प्रा. डॉ. एन. डी. पाटलांनी गेल्या सत्तर वर्षांच्या सक्रीय सार्वजनिक आयुष्यात बरीच आंदोलनं केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांना आस्था होती. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधिमंडळात आणि रस्त्यावरही आवाज उठवला. आंदोलनं केली.

1980 साली शरद पवारांनी जळगावहून नागपूरपर्यंत काढलेल्या शेतकरी दिंडीत शरद पवार, राजारामबापू पाटील यांच्यासह खांद्याला खांदा लावून एन. डी. पाटील सहभागी होते.

विधिमंडळातर्फे 2020 साली जेव्हा महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यात बोलताना पवार म्हणाले, जळगाव-नागपूर शेतकरी दिंडीत एकही दिवस विश्रांती न घेता, सलग चालत जाणारा माणूस म्हणजे एन. डी. पाटील होते.

एन. डी. पाटलांनी जनआंदोलनं हे आपलं शस्त्र म्हणूनच कायम बाळगलं. रायगड जिल्ह्यातील विशेष आर्थिक क्षेत्राच्या (SEZ) विरोधातील आंदोलनात सर्वहारा जनआंदोलनाच्या सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांच्या पाठीशी ठामपणे राहिले. हा लढा यशस्वीही झाला आणि सरकारला हा सेझ गुंडाळावा लागला होता.

कोल्हापुरातील टोलनाक्यांविरोधातील आंदोलनात तर ते व्हिलचेअरवर आंदोलनस्थळी उपस्थित राहत. लोकांसाठी लढण्यासाठी आपण तत्पर असल्याचं त्यांनी टोलविरोधी आंदोलनातही दाखवून दिलं होतं.

सीमावासीयांच्या लढ्याला बळ देण्याचं कामही त्यांनी केलं. बीबीसी मराठीशी बोलताना एन. डी. पाटलांचे सहकारी सुद्धा हेच म्हणाले की, एनडींची तीन इच्छा अपूर्ण राहिल्यात, त्यातली एक सीमावासीयांचा लढा पूर्णत्वास नेता आला नाही.

महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या, आंदोलनांना आपलं शस्त्र मानून शोषित-वंचितांचा आवाज बनणाऱ्य अनेक कार्यकर्त्यांना प्रा. डॉ. एन. डी. पाटील आधार वाटत असत.

4) पवारांचे मेहुणे

प्रा. डॉ. एन. डी. पाटील हे अनेकदा शरद पवारांच्या भूमिकांचा विरोध करताना महाराष्ट्रानं पाहिलंय.

मात्र, फार कमी लोकांना हे माहित आहे की, एन डी पाटील आणि पवार हे नात्यातले आहेत. शरद पवार यांची बहीण सरोज या प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे नात्यानं पवार आणि एनडी हे मेहुणे. मात्र, लोकांच्या मुद्द्यांसाठी लढत असताना, एन. डी. पाटलांनी कधीच हे नातं आडवं येऊ दिलं नाही. आपला लढा सत्ताधाऱ्यांशी असतो, हे त्यांनी मनात स्पष्ट ठेवलं.

ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्या 'ग्रेट भेट'मधील मुलाखतीत प्रा. डॉ. एन. डी. पाटलांनी पवारांसोबतच्या संबंधांवर भाष्य केलं होतं.

एन. डी. पाटील म्हणाले होते, "पूर्वी मी त्यांच्या राजकारणाची टिंगल करायचो. खिल्ली उडवायचो. पण अलीकडच्या काळात राजकारणातले मतभेद जास्त तीव्र झाल्यामुळे शक्य तितकं आम्ही या विषयावर बोलत नाही.

"म्हणजे अगदी टू बी फ्रॅक सांगायचं झालं तर आम्ही आता राजकीय मतांची चर्चा करत नाही. आम्ही एकत्र येतो. इतर गोष्टी बोलतो. कुटुंबातल्या गोष्टी बोलतो. लग्नकार्य असतात किंवा कोणाचा वाढदिवस असतो, या निमित्तानं आम्ही एकत्र येतो आणि त्या वेळेला राजकारणाची चर्चा करत नाही," पाटील यांनी सांगितलं होतं.

पण आपल्या भूमिकांच्या आड कधीच नातं न आणता, प्रा. डॉ. एन. डी. पाटील लढत राहिले, हे त्यांचे राजकीय विरोधकही मान्य करतात.

5) 'रयत'चे चेअरमन आणि शिक्षण क्षेत्रातली कामगिरी

प्रा. डॉ. एन. डी. पाटील हे पुढे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन झाले हे खरं, पण त्यापूर्वी एक गोष्ट नमूद करायला हवी, ज्यावरून त्यांच्या या पदाचं महत्व लक्षात येईल. ती म्हणजे, स्वत: कर्मवीर भाऊराव पाटलांनी एन. डी. पाटलांना रयत शिक्षण संस्थेचं सदस्य करून घेतलं होतं.

पुढे ते रयत शिक्षण संस्थेचे चेअरमनही झाले.

चेअरमनपदाच्या काळा त्यांनी साखरशाळा, आश्रमशाळा, श्रमिक विद्यापीठ, स्पर्धा परीक्षा केंद्रे, शिष्यवृत्ती योजना इत्यादी बरीच कामं केलं. राजकारणात लोकांच्या प्रश्नांवर काम करत असताना, त्यांनी शिक्षण क्षेत्राकडे कधीच दुर्लक्ष केला नाही.

रयत शिक्षण संस्थेच्या 120 वर्षांच्या वाटचालीत एन. डी. पाटलांनी जवळपास 20वर्षे चेअरमनपद सांभाळलं. 1959 पासून ते संस्थेचे सदस्य होते.

रयतन शिक्षण संस्थेनं 'रयत जीवन गौरव' पुरस्कार सुरू केला, त्याचा पहिला मान एन. डी. पाटलांनाच दिला. शिक्षण क्षेत्रात एन. डी. पाटालांनी केलेल्या कामाचा तो गौरव होता.

नांदेडमधील स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ यांनी अनुक्रमे 1999, 2000 आणि 2001 अशा तीन डी. लिट. पदव्या त्यांना दिल्या.

भारत सरकारच्या राष्ट्रीय बियाणे महामंडळाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं.

अंधश्रद्ध निर्मुलन समितीचं अध्यक्षपद असो वा दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्थेचं अध्यक्षपद असो, अनेक पदांवर त्यांनी काम केलं. आंदोलनांना पूरक लेखन केलं. मग कधी महागाईवरील पुस्तिका असो, तर कधी शेतीसंबंधी सरकारच्या कायद्यांवर असो किंवा 'शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी?' म्हणत शिक्षणावरील पुस्तिका असो.

त्यांच्या या सर्व कारकीर्दीवर एका वाक्यात भाष्य करायचं झाल्यास, ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांची प्रतिक्रिया सांगता येईल.

निखील वागळे यांनी एन. डी. पाटलांच्या निधनाच्या वृत्तानंतर प्रतिक्रियेत म्हटलंय, 'एन. डी. पाटील सर गेले. महाराष्ट्राच्या समाज जीवनातला नैतिकतेचा दरारा हरपला. आदरांजली.'

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)