एन. डी. पाटील यांच्या 3 अपूर्णच राहिल्या इच्छा

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

प्राध्यापक एन. डी. पाटील यांचं पूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील असं होतं. त्यांचा जन्म 15 जुलै 1929 ला सांगलीतल्या ढवळी गावात अशिक्षित शेतकरी कुटुंबात झाला होता. तर 17 जानेवारी 2022 कोल्हापुरातील खासगी रुग्णलयात त्यांचं निधन झालं. तेव्हा ते 93 वर्षांचे होते.

शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न आणि बेळगाव सीमा प्रश्नी त्यांनी दिलेलं योगदान मोठं मानलं जातं.

त्यांनी उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवल.

एन. डी. पाटील यांच्या 3 अपूर्ण इच्छा

प्रा. एन. डी. पाटील यांच्या 3 इच्छा मात्र अपूर्णच राहील्या आहेत. त्यांचे सहकारी टी. एस. पाटील यांनी बीबीसीसाठी स्वाती पाटील यांच्याशी बोलताना सरांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा सांगितल्या. त्यानुसार

  • महाराष्ट्राने बेळगावचा सीमालढा जिंकायला हवा. या न्यायालयीन लढ्यासाठी ते अखेरपर्यंत झटले.
  • कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं.
  • शेतकऱ्यांना सदैव न्याय मिळवून देणे.

मृत्यूच्या काही दिवस आधी टी.एस. पाटील यांच्याशी बोलताना एन. डी. पाटील सरांनी त्यांच्या या अपूर्ण इच्छा बोलून दाखवल्या होत्या.

'महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी'

एन. डी. पाटील म्हणजे सामान्य माणसाच्या संघर्षाचा कृतीशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनानं शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल , वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्व हरपलं आहे. सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचा आधारवड कोसळला आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

"प्रा. एन. डी. पाटील निर्भिड, नि:स्पृह, निडर नेते होते. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी काम केलं. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही रस्त्यावर उतरुन संघर्ष करणाऱ्या प्रा. एन. डी. पाटील साहेबांचं निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी आहे," असंही अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त करताना म्हटलंय.

"ए. डी. पाटील यांच्या निधनाने खूप जेष्ठ आणि अनुभवी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला... चळवळीच्या संस्कारांचे ते भक्कम स्तंभ राहतील... त्यांच्या कडून येणारी पीढी भविष्यात ही शिकत राहील," असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट केलं आहे.

राजकीय प्रवास

प्राध्यापक एन. डी. पाटील यांनी 1948 मध्ये शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. 1957 साली ते मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस झाले.

तर 1960-66,1970-76, 1976-82 अशी 18 वर्षं ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते.

1969-1978,1985-2010 या दरम्यान ते शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस होते.

1978-1980 दरम्यान ते सहकारमंत्री होते.

1985-1990 दरम्यान ते महाराष्ट्र विधानसभेत कोल्हापूरचे आमदार राहिले.

1999-2002 ते लोकशाही आघाडी सरकारचे निमंत्रक होते.

एन. डी. पाटील यांचं शैक्षणिक क्षेत्रातील कार्य

शिवाजी विद्यापीठ - पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य 1962

शिवाजी विद्यापीठ - सिनेट सदस्य 1965

शिवाजी विद्यापीठ - कार्यकारिणी सदस्य 1962-78

शिवाजी विद्यापीठ - सामाजिकशास्त्र विभागाचे डीन 1976-78

सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१

रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- 1959 पासून

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन - 1990 पासून

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बेळगाव अध्यक्ष - 1980 पासून

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)