तेजस्विनी पंडितच्या 'या' पोस्टरवरून वाद का सुरू झालाय?

अनुराधा वेब सीरीज

फोटो स्रोत, Social Media

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

काही दिवसांपूर्वी तो प्रोमो पाहिला होता का तुम्ही? तेजस्विनी पंडीत म्हणते, "माझा लिपस्टीकला विरोध आहे. बॅन लिपस्टीक."

त्याची सोशल मीडियावरही बरीच चर्चा झाली होती. तेव्हा साधारण लोकांच्या लक्षात आलं होतं की हे कुठल्यातरी सिनेमाचं किंवा सीरिजचं प्रमोशन आहे.

आता त्याच तेजस्विनी पंडितचा एक फोटो पुन्हा रिलिज झाला आहे. एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक नवी सीरिज येतेय आणि त्या सीरिजचं हे पोस्टर आहे.

'माझा कधीही न पाहिलेला अंदाज पहा...' असं म्हणत तेजस्विनीनं इन्स्टाग्रामवर हे पोस्टर शेयर केलं आहे. अनेकांनी हे पोस्टर पाहिलंच असेल.

आता त्याच पोस्टरवरून वाद सुरू झाला आहे.

या सीरियलच्या निर्मात्याला महाराष्ट्र राज्य आयोगाने नोटीस पाठवली आहे. आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ट्वीट करून म्हटलंय की, "एका वेबसिरीजच्या जाहिरातीसाठी महिलेच्या हातात सिगारेट देऊन तिचं ओंगळवाणं प्रदर्शन करत असल्याचे होर्डिंग्स फोटो समाजमाध्यमामधून फिरत आहेत आणि याबद्दल बऱ्याच तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत."

महिला आयोग

फोटो स्रोत, Twitter/Rupali Chakankar

या सीरिजचे दिग्दर्शक संजय जाधव यांना राज्य महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे आणि या नोटीशीत म्हटलंय की, "अनुराधा या वेबसीरिजचे पोस्टर पुणे शहरात लागले आहेत. या पोस्टरवरून धुम्रपान आणि अंगप्रदर्शन याबद्दल चुकीचा संदेश समाजात जातोय अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमांमध्ये उमटत आहेत. तरी या पोस्टरच्या बाबतीत आपली भूमिका आणि उद्देश स्पष्ट करणे."

या नोटीशीत असंही म्हटलंय की राज्य महिला आयोगाला टॅग करून अॅड. जयश्री पालवे यांनी ट्वीट केलं होतं होतं आणि याप्रकरणी काही कारवाई करावी असं म्हटलं होतं. अॅड. जयश्री पालवेंच्या ट्वीटचा दाखला या नोटीशीत आहे.

पालवे यांनी लिहिलं होतं, "हे पोस्टर सध्या सगळीकडे पाहावयास मिळत आहे. सार्वजनिक ठिकाणी 'धूम्रपान बंदी'असताना यामध्ये एका महिलेने अंगप्रदर्शन करीत हातात पेटती सिगारेट घेतली आहे. महिलेचे असे ओंगळवाणे प्रदर्शन करणे योग्य आहे का? राज्य महिला आयोगाने याची दखल घ्यावी."

आता प्रश्न असा आहे की हा त्या मालिकाकर्त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला नाही का?

यावर रूपाली चाकणकरांनी आपल्या दुसऱ्या एका ट्वीटमध्ये म्हटलंय की, "अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून या अशा जाहिरातीच्या माध्यमातून स्त्रियांचे ओंगळवाणे प्रदर्शन करणे आणि व्यसनाधीनतेसाठी समाज प्रोत्साहित होईल अशा गोष्टींवर अंकुश लागणे गरजेचं आहे."

यावर अजून मालिकाकर्त्यांची प्रतिक्रिया आलेली नाही, ती आली की या बातमीत अपडेट केली जाईल.

नोटीस पाठवायचे महिला आयोगाचे अधिकार

महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास मंत्रालयाच्या साईटवर महिला आयोगाविषयी माहिती दिलेली आहे.

रुपाली चाकणकर

फोटो स्रोत, @NcpRupaliChakankar

त्यात म्हटलंय की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे एक वैधानिक मंडळ आहे. या आयोगाची स्थापना 1993 सालच्या महाराष्ट्र कायदा क्रमांक XV च्या अंतर्गत झाली आहे. आयोगाची काही प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:

  • महिलांची समाजामधील स्थिती आणि प्रतिष्ठा सुधारणे.
  • महिलांची मानहानी करणाऱ्या प्रथांचा शोध घेणे आणि त्यावर योग्य प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे.
  • महिलांवर परिणाम करणाऱ्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे.
  • महिलांची समाजामधील स्थिती आणि प्रतिष्ठा यामध्ये सुधारणा तसेच उन्नती करण्या संबंधित सर्व मुद्द्यावर शासनाला सल्ला देणे.
  • गरजू महिलांना समुपदेशन आणि नि:शुल्क कायदेशीर सल्ला देणे.
  • आयोग जन्मपूर्व लिंग निदान पद्धती (नियम आणि गैरवापर प्रतिबंध) कायदा 1994 ची कठोर अंमलबजावणी आणि प्रसार माध्यमांतून महिलांच्या प्रतिमेबद्दल असंवेदनशीलता निर्माण करणे, अशा विशिष्ट मुद्द्याबद्दल विशेष दक्ष असतो.
  • आता ही उदिष्ट लक्षात घेतली तर आयोगाचा मुळ हेतू महिलेच्या इच्छेविरुद्ध कोणी तिची समाजात बदनामी करत असेल, अप्रतिष्ठा करत असेल, महिलांची प्रतिमा खराब करत असेल तर त्याविरोधात कारवाई करणं असं आहे.
  • ज्या पोस्टरवरून वाद झालाय, त्यात अभिनेत्री तेजस्विनी पंडीत दिसतेय आणि हे पोस्टर तिच्या संमतीविना रिलीज झालंय किंवा यामुळे तिची बदनामी करण्याचा हेतू होता असं समजायला सध्या तरी काहीच वाव नाही.

मग राज्य महिला आयोगाने कोणत्या अधिकारात ही नोटीस पाठवली?

नोटीशीत म्हटलंय की आयोगाच्या अधिनियम 1993 अंतर्गत कलम 10 (1) (F) (1) आणि (2) नुसार जर आयोगाकडे महिलांच्या तक्रारी आल्या तर त्या स्वीकारणं आणि त्याची दखल घेणं हे आयोगाचं काम आहे.

अॅड. जयश्री पालवेंच्या ट्वीट राज्य महिला आयोगाने तक्रार म्हणून स्वीकारलं आहे. पण मग त्या पोस्टरवर झळकलेली अभिनेत्रीही महिलाच आहे, तिच्या स्वातंत्र्यावर हा घाला नाही का?

वैयक्तिक आवड किंवा समाजमान्यतेच्या कल्पनांवर आधारित कोणी तक्रार केली तर त्यावर कारवाई कशी केली जाऊ शकते?

कबीर सिंह

फोटो स्रोत, kabir singh

प्रॉब्लेम कसला आहे एक स्त्री स्वतःच्या शरीरावर स्वतःचा हक्क सांगते याचा की ती सिगरेट ओढते याचा? की बाईने कसं असावं याचे प्रस्थापित मापदंड धुडकावून लावते याचा?

धुम्रपानाबद्दल बोलूया. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करू नये असा कायदा आहे. त्याचं प्रदर्शन करू नये. सिनेमात, सीरियलमध्ये असे सीन असतील तर त्यावर खाली 'धुम्रपान आरोग्याला हानिकारक आहे' अशी सूचना द्यावी असा नियम आहे.

पोस्टरवर अशी सूचना दिसत नाहीये, निदान माझ्या डोळ्याला दिसली नाही. पण याच गोष्टीला आक्षेप असेल कबीर सिंगचे पोस्टर बरे चालले? त्यात तर दारू, सिगरेट जे म्हणाल ते सगळं आहे.

बरं, या सगळ्या ट्वीटचा सूर असा आहे की यात 'ओंगळवाणं शरीर प्रदर्शन आहे.'

शरीरप्रदर्शनाविषयी कायदा काय सांगतो?

शरीरप्रदर्शनाविषयी भारतात वेगळा कायदा नाही. हा मुद्दा अश्लीलता रोखणं या कलमात अंतर्भूत होतो. पण सर्वसाधारण नियम असा आहे की सार्वजनिक ठिकाणी स्त्रीचे निपल्स आणि गुप्तांग दिसणं, तसं पुरुषाचे गुप्तांग दिसणं याला बंदी आहे.

महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

भारतीय कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लीलतेला बंदी आहे. इंडियन पीनल कोडच्या सेक्शन 294 नुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील बोलणं किंवा अश्लील वागणं याला बंदी आहे. पण अश्लीलतेची व्याख्या स्पष्ट नाहीये. इतरांना त्रास होईल (अश्लील वाटेल) असं वागणं म्हणजे अश्लीलता असं म्हटलं आहे.

या कायद्यानुसार अश्लील कृत्य करण्याऱ्या व्यक्तीला 3 महिने कैदेची शिक्षा होऊ शकते.

आधी या कायद्यात अश्लील पुस्तकं ही यायची. आता इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी कायद्याच्या सेक्शन 67 अश्लीलतेची व्याख्या विस्तारून त्यात पॉर्नही येतं.

पण तरीही अश्लीलतेची नक्की व्याख्या कशी करावी हा वकिलांपुढे पडलेला संभ्रम आहे. कारण कायद्यात वापरलेल्या शब्दांच्या व्याख्या स्पष्ट नाहीत. अश्लील म्हणजे नक्की काय हे ठरवणं कोर्टावर सोडलेलं आहे.

2014 अविक सरकार केसमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं की त्या त्या काळात समाजात जे स्वीकारलं आहे त्या मान्यतेनुसार एका सर्वसाधारण व्यक्तीला जे अश्लील वाटू शकलं त्याला अश्लील असं म्हणावं.

यात समाजातली बदलती मुल्य गृहित धरावीत असं कोर्टाने म्हटलं आहे. जे एका दशकापूर्वी अश्लील असेल ते आता वाटणार नाही या गोष्टी गृहित धरल्या पाहिजेत.

महिलांच्या कपड्यांवर नियंत्रण

अनादी कालापासून पितृसत्ता आणि त्याच्या पाईक, वाहक असणारे स्त्री पुरुष ठासून सांगतात की बाईने असंच वागलं पाहिजे, हेच घातलं पाहिजे, असंच राहिलं पाहिजे.

मग ते आताच्या केसमध्ये अंगप्रदर्शन करायला नको, सिगरेट ओढायला नको म्हणणारे ही आले.

कंबोडिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

'बलात्कार होऊ द्यायचा नसेल तर व्यवस्थित कपडे घातले पाहिजेत.' हे मी, तुम्ही, बाकी महिलांनी हजार वेळा ऐकलं असेल. काही जणींनी अनेकींना ऐकवलंही असेल.

पण महिलांच्या तोकड्या कपड्यांना जबाबदार धरणारे हे सोईस्करपणे विसरतात की बलात्कार 80 वर्षांच्या गावखेड्यातल्या म्हातारीवर होतो, 10 वर्षांच्या चिमुरडीवर होतो आणि 8 महिन्यांच्या बाळाला तर आपण काय कपडे घातले हे कळतही नसतं तरीही होतो. मग इथे महिलांच्या कपड्यांचा संबंध काय?

'तू काय घातलं होतंस?'

जगाच्या पाठीवर कोणत्याही बलात्कारित पीडितेला विचारला जाणारा हा प्रश्न: 'तू काय घातलं होतंस?'

या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न झाला तो अमेरिकेतल्या कॅनसस विद्यापीठात आयोजित केलेल्या एका प्रदर्शनात. बलात्कार झाला तेव्हा पीडितांनी जे कपडे घातले होते त्या प्रदर्शनात मांडले होते.

पिवळा बंद गळ्याचा टी शर्ट, सैल लाल शर्ट आणि खाकी पँट, स्पोर्ट्स जर्सी, घरात घालायचा पायजमा असे कपडे या प्रदर्शनात मांडले होते. एका पीडितेने सांगितलं, "मी छानसा गुलाबी रंगाचा सनड्रेस घातला होता. त्या घटनेनंतर माझ्या आईने कितीवेळा विचारलं की मी तो ड्रेस परत का घातला नाही? माझी हिंमतच झाली नाही तो ड्रेस घालायची. मी सहा वर्षांची होते तेव्हा."

तोकडे कपडे म्हणजे काय याच्या व्याख्या जगभरात वेगवेगळ्या आहेत. पाश्चिमात्य देशात गुडघ्यापर्यंत ड्रेस असणं नॉर्मल समजलं जातं, पण पोट दाखवणं मात्र कॉमन नाही. उलट आपल्याकडे साडी नेसली की पाठ, पोट आणि कंबर दिसतेच पण साडीला आपण अंगभर कपडे समजतो.

मग हाच न्याय लोकांच्या मानसिकतेला पण लागू पडतो ना. एखाद्याला जे कपडे तोकडे वाटतात, ते दुसऱ्याला नाही वाटणार. आपल्या समाजात अनेकदा साडी अंगभर आणि लूज टीशर्ट आणि जीन्स उत्तेजक कपडे समजले जातात. मग बलात्कार करणाराच कोणते कपडे तोकडे आणि कोणते नाही हे ठरवणार का?

तेच लॉजिक महिलांच्या रात्री उशीरापर्यंत बाहेर असण्यालाही लागू पडतं. कोणाला रात्री 10 म्हणजे अपरात्र वाटेल, पण काही म्हणतील बाई म्हटली की 7च्या आत घरात हवी.

खरं तर आपण कोणते कपडे घालावेत, कितीपर्यंत बाहेर असावं, कसं वागावं, सिगरेट प्यावी की नाही, हे ठरवण्याचे अधिकार बाईला हवेत, पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही.

आणि जर तसं एखादीने ठरवलंच तर त्याला समाजातल्या स्त्रियाच विरोध करताना दिसतात हे आणखी दुर्दैव.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)