वर्षभर बंद असलेल्या खाणीत कसा सापडला 50 लाखांचा हिरा? 7 मजुरांना मुसळधार पावसात काय दिसलेलं? वाचा

वर्षभर बंद असलेल्या खाणीत सापडला 50 लाखांचा हिरा आणि बदललं 7 मजुरांचं आयुष्य

फोटो स्रोत, Vishnukant Tiwari/BBC

    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

मध्य प्रदेशातील पन्ना येथे 7 गरीब मजुरांना एक मौल्यवान हिरा सापडला आहे. या हिऱ्यामुळे आता आपलं आयुष्य बदलू शकतं, अशी त्यांना आशा वाटत आहे.

दोन वर्षांपूर्वी भाडेतत्वावर घेतलेल्या जमिनीतून एक मोठा हिरा मिळाला असल्याचे या लोकांनी सांगितलं आहे.

या हिऱ्याचं वजन केल्यानंतर 16.96 कॅरेटचा असल्याचं समोर आलं आहे. हा नैसर्गिक हिऱ्यांच्या सर्वोत्तम प्रकारांपैकी एक असल्याचे जिल्हा खनिज अधिकारी रवी पटेल यांनी म्हटलं आहे.

ऑक्टोबरमध्ये हिऱ्याचा लिलाव, देश-विदेशातील लोक येणार

पटेल यांनी हा हिरा खूप 'मौल्यवान' असल्याचं म्हटलं आहे. या हिऱ्याचा ऑक्टोबरमध्ये लिलाव केला जाणार असून, त्याची किंमत किमान 50 लाख रुपये असण्याचा अंदाज आहे.

Caption- या हिऱ्याचं वजन 16.96 कॅरेट असून, तो एक अत्यंत 'मौल्यवान रत्न' असल्याचं सांगण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Vishnukant Tiwari/BBC

फोटो कॅप्शन, या हिऱ्याचं वजन 16.96 कॅरेट असून, तो एक अत्यंत 'मौल्यवान रत्न' असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पन्ना येथे हिरे सापडणं नवीन किंवा दुर्मीळ घटना नाही. भारतातील हिऱ्यांच्या साठ्यांपैकी बहुतांश साठा येथेच आहे.

शहरात रोजगाराच्या संधी कमी असल्याने अनेक लोक आपलं नशीब बदलण्याच्या आशेनं मौल्यवान हिऱ्यांचा शोध घेत असतात. त्यामुळे हा भाग हिरेप्रेमींसाठी खास मानला जातो.

परंतु, इथे हिरा शोधला म्हणजे तो नक्कीच सापडेलच, याची हमी नसते.

मिळालेल्या माहितीनुसार, पन्ना येथील बहुतांश खाणकामगार हे रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. ते खाण भाड्याने (पट्टेधारक) घेणाऱ्यांसाठी काम करतात. त्यामुळे त्यांना हिरा सापडला तरी त्याचे पैसे मजुरांना नव्हे, तर खाणीचा पट्टा घेणाऱ्यालाच मिळतात.

परंतु, ही ताजी घटना वेगळी आहे. कारण या वेळी हिरा शोधणाऱ्या मजुरांनाच त्याचा फायदा होणार आहे.

नाममात्र दरात खाण घेतली भाड्याने

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अखिलेश पाल आणि इतर 6 जणांनी दोन वर्षांपूर्वी पन्ना येथील सरोखा गावातील ही खाण कमी पैशांत म्हणजे नाममात्र दरावर भाड्याने घेतली होती.

पाल यांनी सांगितलं की, ही खाण वर्षभरापासून बंद होती आणि नुकतीच ती पुन्हा सुरू करण्यात आली होती. सोमवारी (10 ऑगस्ट) मुसळधार पाऊस झाल्यानंतर खाणीची पाहणी करत असताना त्यांना तो खडक दिसून आला.

ते म्हणाले, "आम्ही जवळपास दोन वर्षे तिथे खाणकाम करत होतो. पण तिथे काहीच सापडलं नाही. त्यामुळे आम्ही वर्षभरासाठी ती खाण बंद केली. त्यानंतर शेजारीच दुसऱ्या ठिकाणी आम्ही खाणकाम सुरू केलं होतं."

ते पुढे म्हणाले, "आम्ही नवीन खाणीची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी जुन्या खाणीतही पाहिलं आणि तिथेच आम्हाला हा सापडला. तो अगदी वरच्या बाजूला होता."

हिऱ्याला ऑक्टोबरमध्ये लिलावासाठी ठेवण्यात येईल. देश-विदेशातील खरेदीदार यासाठी बोली लावतील, असं पटेल म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकार विक्रीतून मिळालेल्या रकमेतून 12 टक्के रॉयल्टी वजा करेल आणि उर्वरित रक्कम सर्व 7 मजुरांमध्ये समान वाटली जाईल.

काही गरीब मजुरांसाठी हा हिरा त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा देणारा ठरू शकतो. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, त्यापैकी तिघांनी आता लग्नासाठी मुलगी पाहणार असल्याचं म्हटलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)