चांगले निर्णय घ्यायचे आहेत? मुंग्या, मधमाशा, झुरळं आणि टोळांकडून शिका हे 5 महत्त्वाचे धडे

मुंगी

फोटो स्रोत, Pawich Sattalerd via Getty Images

    • Author, सोफिया क्वालिया
    • Role, बीबीसी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

आपण माणसं स्वतःला उत्क्रांतीच्या शिखरावर असल्याचं समजतो, कारण विचार करण्याची आपली क्षमता इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, असं आपल्याला वाटतं. पण इतका विचार करूनही आपण नेहमी योग्य निर्णय घेतोच असं नाही. आपण चुका करतो, चुकीचे निर्णय घेतो आणि अनेकदा योग्य पर्याय निवडण्यात अपयशी ठरतो.

दुसरीकडे, कीटकांकडे अगदी खसखशीच्या दाण्याएवढे लहान मेंदू असले तरी निर्णय घेण्याबाबत त्यांच्याकडे आश्चर्यकारक शहाणपण असतं. खरं तर, कीटकांच्या अनेक समस्या सोडवण्याच्या पद्धतींवरून मानवी उद्योगक्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या प्रभावी अल्गोरिदमची प्रेरणा मिळाली आहे.

सूज्ञ वाटणारे निर्णय घेण्यासाठी कीटकांकडून आपण शिकू शकणाऱ्या पाच गोष्टी येथे दिल्या आहेत.

सर्वोत्तम पर्याय शोधणाऱ्या मुंग्या

एखादं काम करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता हे ठरवणं सोपं नसतं, विशेषतः आजच्या माहितीचा आणि पर्यायांचा भडिमार असलेल्या जगात तर अगदीच कठीण असतं. या समस्येला चॉइस ओव्हरलोड म्हणजेच 'पर्यायांचा अतिरेक' असं म्हणतात.

मुंग्यांनाही अशीच समस्या भेडसावते. समूहाने मिळून अन्न शोधण्यासाठी पुढचा ठिकाणा निवडायचा असतो तेव्हा ही समस्या येतेच. पण त्यासाठी त्यांनी एक अत्यंत हुशार युक्ती विकसित केली आहे, जी अनेक प्रजातींमध्ये आढळते.

सुरुवातीला काही मुंग्या आपल्या वारुळाबाहेर पडतात आणि जवळचं व सर्वोत्तम अन्नस्रोत शोधण्यासाठी वेगवेगळ्या दिशांनी निघतात. त्या कोणतीही दिशा निश्चित न ठेवता यादृच्छिकपणे वेगवेगळे मार्ग तपासतात. जाताना आणि परतताना त्या जमिनीवर फिकटसा फेरोमोनचा माग सोडतात, ज्याचा इतर मुंग्या नंतर पाठलाग करू शकतात. कालांतराने हे फेरोमोन हवेत विरून जातात आणि मुंग्या सर्वाधिक तीव्र वास असलेल्या मार्गाकडे अधिक आकर्षित होतात.

मुंगी

फोटो स्रोत, Getty Images

ज्या मुंग्यांना सर्वाधिक कार्यक्षम अन्नस्रोत सापडतो त्या अन्न घेऊन लवकर परततात आणि फेरोमोन पूर्णपणे नाहीसा होण्यापूर्वी त्या त्याच मार्गावर पुन्हा आपला सुगंधी माग मजबूत करतात.

मागून येणाऱ्या इतर अन्नशोधक मुंग्यांनाही त्या लवकर दिशा दाखवतात. त्यामुळे हळूहळू अधिकाधिक मुंग्या त्याच मार्गाने ये-जा करू लागतात आणि त्या मार्गावर फेरोमोनचा साठा वाढत जातो. परिणामी त्या वाटेचा गंध अधिक तीव्र होतो.

अशा प्रकारे वस्तुनिष्ठदृष्ट्या लहान आणि कार्यक्षम मार्ग अधिकाधिक मजबूत होत जातात, तर इतर मार्ग हळूहळू अदृश्य होतात. शेवटी संपूर्ण वसाहत मिळून सर्वांत कमी अंतराचा आणि सर्वाधिक उपयुक्त मार्ग शोधून काढते आणि कोणत्याही एका मुंगीला तो मार्ग तिनेच शोधला आहे याचं भानही नसतं.

मुंगी

फोटो स्रोत, Muhammad Owais Khan via Getty Images

बेल्जियममधील युनिव्हर्सिते लिब्रे द ब्रुसेल्सच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळेचे सहसंचालक मार्को डोरिगो म्हणतात, "यातून मिळणारा मुख्य धडा असा आहे की, केंद्रीकृत नियंत्रण नसतानाही प्रभावी सामूहिक निर्णयप्रक्रिया विकसित होऊ शकते. मर्यादित क्षमता आणि फक्त स्थानिक माहिती असलेल्या साध्यासुध्या जीवांनाही एकत्र येऊन गुंतागुंतीच्या समन्वयाच्या समस्या सोडवता येतात."

ही पद्धतच पुढे अँट कॉलनी ऑप्टिमायझेशन या नावाने विकसित झाली आणि तिच्यावर आधारित अल्गोरिदम जगभरात वेळापत्रक नियोजन, दूरसंचार, वाहतूक व पुरवठा व्यवस्थापन सुधारण्यासाठी वापरले जात आहेत. उदाहरणार्थ, रेल्वे नियोजनासाठी अशा अल्गोरिदमचा उपयोग करण्यात आला आहे. स्वतः डोरिगो यांनी AntNET ही प्रणाली विकसित केली, जी संप्रेषण नेटवर्कमध्ये माहिती अधिक कार्यक्षमपणे फिरवण्यास मदत करते.

लोकशाहीवादी मधमाशा

नवीन पोळ्यासाठी योग्य जागा निवडताना मधमाशा मुंग्यांसारखीच पण किंचित वेगळी पद्धत वापरतात.

शोध घेणाऱ्या काही मधमाशा पोळ्याबाहेर पडून वेगवेगळ्या जागांची पाहणी करतात. मात्र फेरोमोनचा माग सोडण्याऐवजी त्या परत आल्यावर आपल्या पसंतीची माहिती थेट इतर मधमाशांना देतात.

त्या आपल्या शरीराला विशिष्ट लयीत हलवत वॅगल डान्स करतात. या नृत्याद्वारे त्या सुचवत असलेली जागा किती सुरक्षित आहे, किती जवळ आहे, किती मोठी आहे आणि तिची स्थिती किती योग्य आहे, याची माहिती इतरांना मिळते. जागा जितकी चांगली, तितकं नृत्य अधिक वेळ आणि अधिक उत्साहाने केलं जातं.

मधमाशी

फोटो स्रोत, NurPhoto via Getty Images

या नृत्यातून त्या त्या जागेचं नेमकं स्थानही सांगतात. किती दूर उडायचं आणि कोणत्या दिशेने उडायचं याची माहिती मिळताच मधमाशांचा आणखी एक गट तिथे पडताळणीसाठी जातो. परत आल्यावर तेही नृत्याद्वारे आपला निर्णय व्यक्त करतात. काही आधीच्या मताला पाठिंबा देतात, तर काही नवीन पर्याय मांडतात.

काळाच्या ओघात एखाद्या विशिष्ट ठिकाणाच्या बाजूने मतमतांतरे वाढू लागतात. काही डझन मधमाशा एकाच जागेबद्दल सकारात्मक संकेत देऊ लागतात. जेव्हा एक प्रकारची बहुमताची मर्यादा गाठली जाते, तेव्हा संपूर्ण समूह त्या दिशेने स्थलांतर करतो. मानवी लोकशाहीप्रमाणेच.

तटस्थ राहणारे टोळ

लोकांची मतं बदलणं अवघड असतं, विशेषतः एखादा समूह दोन पर्यायांमध्ये विभागला गेला असेल तर. अशा वेळी चर्चा पटकन 'काळं किंवा पांढरं', 'हे किंवा ते' अशा द्विध्रुवी स्वरूपात अडकते आणि प्रत्येकजण आपल्या मतावर अधिक ठाम होतो.

मात्र टोळांवरील एका अलीकडील अभ्यासातून या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग समोर आला आहे.

उड्डाण करण्याइतके मोठे न झालेले, अजून किशोरावस्थेत असलेले टोळ उडू शकत नाहीत. त्यामुळे ते चालत प्रवास करतात. ब्रिटनमधील बाथ विद्यापीठातील गणितीय जीवशास्त्राचे प्राध्यापक ख्रिश्चन (किट) येट्स यांनी अशा टोळांच्या समूहांना वर्तुळाकार मैदानात सोडून ते एकत्रितपणे दिशा कशी ठरवतात हे पाहिलं.

त्यांच्या लक्षात आलं की हे टोळ वारंवार दिशा बदलतात पण प्रत्येकवेळी त्यापूर्वी ते थोडावेळ थांबतात.

टोळ
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

येट्स यांना आढळलं की, हाच क्षण महत्त्वाचा असतो. अधिकाधिक टोळ चालणं थांबवून तटस्थ होतात, आणि ही तात्पुरती तटस्थता त्यांना एका सामूहिक मतातून बाहेर पडून दुसऱ्या मताकडे वळण्यास मदत करते.

या प्रयोगात येट्स यांनी 19 माणसांवरही असाच प्रयोग केला. सहभागी व्यक्तींना X, Y किंवा मतदान न करण्याचा पर्याय देण्यात आला. टोळांप्रमाणेच, लोकांनाही मतदान टाळण्याचा पर्याय दिल्यास ते X किंवा Y यापैकी एका मतावर अधिक वेगाने आणि अधिक स्पष्टपणे एकमत होत असल्याचं दिसून आलं.

येट्स म्हणतात, "मोठ्या आणि अत्यंत सक्रिय समूहामध्ये अनेक स्वतंत्र प्रभाव एकमेकांना रद्दबातल करतात. त्यामुळे समूहाची एकूण दिशा बदलणं कठीण होतं. पण जर अनेक जण क्षणभरासाठी जरी तटस्थ झाले, तर निर्णय घेणाऱ्या समूहाचा आकार कमी होतो."

ते पुढे स्पष्ट करतात, "जेव्हा सक्रिय मतांची संख्या कमी होते, तेव्हा अगदी छोटासा बदलसुद्धा तुलनेने मोठा परिणाम घडवू शकतो. एखादा लहान गट वेगळ्या दिशेने जाणं, एखादी नवीन माहिती समोर येणं किंवा काही लोकांनी बाजू बदलणं यांचा प्रभाव अचानक मोठा होतो."

म्हणजेच, टोळ आपल्याला शिकवतात की तटस्थता काहीवेळा आवश्यक विराम निर्माण करते, ज्यामुळे सगळ्यांना पुन्हा विचार करता येतो आणि सामूहिक एकमत साधता येतं. त्यातून मिळणारा धडा असा की जर तुम्हाला विद्यमान स्थिती बदलायची असेल, तर निर्णय न घेणाऱ्यांची चिंता करू नका. उलट अधिक लोकांना तटस्थ होण्यासाठी प्रोत्साहित करा.

व्यक्तिमत्त्व असलेले झुरळ

एखाद्या समूहामध्ये अनेक ठाम व्यक्तिमत्त्वं असतील तर सामूहिक निर्णय घेणं कठीण होतं. 'मुख्य पात्र' बनण्याची ऊर्जा असलेले लोक अनेकदा चर्चेचा प्रवाह आपल्या दिशेने वळवतात आणि सामूहिक हित मागे पडतं.

मात्र झुरळांवरील एका अभ्यासातून वेगळंच चित्र समोर आलं. समूहातील ठळक व्यक्तिमत्त्वं निर्णयप्रक्रिया जलद करू शकतात.

काही झुरळं धाडसी असतात, तर काही भित्र्या स्वभावाची. जपानमधील टोकियो मेट्रोपॉलिटन विद्यापीठाचे साहाय्यक प्राध्यापक आयझॅक प्लानास-सित्या यांनी संगणकीय प्रतिमानांच्या मदतीने झुरळं एखाद्या निवाऱ्याभोवती कशी एकत्र येतात याचा अभ्यास केला. उदाहरणार्थ, फ्रिजच्या मागे असलेल्या अंधाऱ्या कोपऱ्यात ती का जमा होतात याचं अनुकरण करण्यात आलं.

त्यांनी वेगवेगळ्या प्रतिमानांमध्ये कधी कोणताही स्वभावभेद ठेवला नाही, कधी थोडा ठेवला, तर कधी भरपूर भिन्नता ठेवली.

परिणाम आश्चर्यकारक होते. ज्या प्रतिमानांमध्ये सर्व झुरळं सारखीच वागत होती, ती वास्तविक जगातील झुरळांच्या निर्णयप्रक्रियेचं चित्र मांडू शकली नाहीत. उलट, ज्या समूहांमध्ये व्यक्तिमत्त्वातील विविधता जास्त होती, त्यांनी सामूहिक निर्णय अधिक जलद घेतले, कारण त्यांच्यात परस्पर सामाजिक संवाद जास्त घडत होते.

झुरळ

फोटो स्रोत, Soumyabrata Roy/NurPhoto via Getty Images

"मला खूप आश्चर्य वाटलं. एखादा कल दिसेल अशी अपेक्षा होती, पण इतका स्पष्ट आणि सातत्याने दिसणारा नमुना दिसेल असं वाटलं नव्हतं," असं प्लानास-सित्या म्हणतात.

त्यांच्या मते, फक्त धाडसी किंवा सतत शोध घेणाऱ्या झुरळांच्या समूहांना योग्य निवारा निवडणं कठीण जातं, कारण ती खूप हालचाल करतात. उलट, फक्त लाजऱ्या झुरळांचा समूह लवकर स्थिरावू शकतो, पण चुकीचा निवारा निवडण्याचा धोका वाढतो.

"सहकार्याची पातळी आणि वर्तनातील विविधता यांच्यातील सूक्ष्म समतोलच सामूहिक बुद्धिमत्तेला चालना देतो," ते म्हणतात. "या छोट्या प्राण्यांमध्ये व्यक्तिमत्त्व महत्त्वाचं असेल, तर अधिक गुंतागुंतीच्या सामाजिक रचनांमध्ये राहणाऱ्या प्राण्यांवर त्याचा किती खोल परिणाम होऊ शकतो याची आपण कल्पना करू शकतो."

आत्मपरीक्षण करणाऱ्या फळमाशा

काहीवेळा आपण आपल्या अंतर्मनातील भावना दाबून तर्कशुद्ध वाटणारे निर्णय घेतो, अगदी ते आपल्याला आतून चुकीचे वाटत असले तरी. तर काहीवेळा आपण आपल्या ठाम श्रद्धांवर इतके विसंबून राहतो की भूतकाळातील चुका आणि अनुभवांकडून काहीही शिकत नाही.

फळमाशांकडून, आश्चर्यकारकरीत्या, आपण आत्मजागरूकतेबद्दल खूप काही शिकू शकतो.

संशोधनातून दिसून आलं आहे की फळमाशा बाह्य आणि अंतर्गत माहिती एकत्र करून प्रत्येक हालचाल कशी करायची हे अत्यंत बारकाईने ठरवतात. उदाहरणार्थ, दोन वेगवेगळ्या वासांपैकी एक निवडायचा असेल, तर ते वास जितके एकमेकांसारखे असतील तितका निर्णय घेण्यासाठी त्या जास्त वेळ घेतात. हे सगळं जणू त्या फायदे आणि तोटे मोजत असल्यासारख्या करतात.

फळमाशा

फोटो स्रोत, Joao Paulo Burini via Getty Images

त्यांच्यासमोर स्वादिष्ट पण पोषणमूल्य नसलेला पर्याय आणि कडू चवीचा पण पौष्टिक साखरेयुक्त पर्याय ठेवला, तर त्या त्या निर्णयाचं एकूण मूल्य मोजू शकतात आणि पोषणासाठी अप्रिय चव सहन करतात.

धोक्याची शक्यता असलेल्या मोठ्या बक्षिसापेक्षा सुरक्षित आणि लहान बक्षीस स्वीकारण्याची शक्यताही त्यांच्यात जास्त असते. मात्र त्यांना खूप भूक लागलेली असेल किंवा त्या तणावाखाली असतील, तर परिस्थिती बदलते. तसेच सकारात्मक किंवा नकारात्मक अनुभवांशी जोडलेल्या विशिष्ट वासांवर केलेल्या प्रशिक्षणानंतर निरोगी फळमाशा एखाद्या संदिग्ध वासाकडेही उत्सुकतेने जातात. पण तणावग्रस्त माशा तो धोका पत्करण्याची शक्यता कमी असते.

फळमाशांप्रमाणेच आपल्याही निर्णयक्षमतेवर आपल्या अंतर्गत अवस्थेचा प्रभाव पडतो. पण त्या आपल्याला हेही स्मरण करून देतात की आपल्या भावना, पूर्वानुभव आणि स्वतःबद्दल तसेच इतरांबद्दलच्या सूक्ष्म जाणिवा यांचा गुंता काहीवेळा आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)