नारायण राणे: महाविकास आघाडी म्हणजे टायटॅनिक #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1.महाविकास आघाडी म्हणजे टायटॅनिक-नारायण राणे

महाविकास आघाडी टायटॅनिक बोट आहे, तर भाजपा सेफ बोट आहे, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली आहे. तसंच त्यांच्या बोटीत कोणी चढणार नाही आणि आमच्या बोटीला काही होणार नाही, असंही राणे म्हणाले आहेत. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

पुण्यातल्या सिम्बायोसिस संस्थेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाला नारायण राणे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट दिली.

त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी राणे म्हणाले, "आमच्यातून जाण्याचा कोणी प्रयत्न करणार नाही. टायटॅनिकच्या बोटीत कोणी बसणार नाही.आमची सेफ बोट आहे. इथून सुटते आणि थेट दिल्लीला पोहोचते. शिवसेनेचं काही खरं नाही. टायटॅनिक बोट शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिघांची आहे. प्रत्येकजण आपल्या बाजूनं खेचत असतो".

2. बिहारमध्ये जातिनिहाय जनगणना होणार-नितीश कुमार

बिहारमध्ये जातिनिहाय जनगणना होणार असल्याचं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. सर्वपक्षीय बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असं नितीश यांनी सांगितलं. राज्याच्या हितासाठी अधिक फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

याच मुद्द्यावर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती व जातनिहाय जनगणनेसाठी आग्रह धरला होता. मात्र, देशपातळीवर अशी जातीच्या आधारावर जनगणना करता येणार नाही, असे नंतर केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले होते.

त्यानंतर नितीशकुमार सरकार राज्यस्तरावर अशी जनगणना करण्याचा निर्णय घेईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. सोमवारी नितीशकुमार यांनीच यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली आहे. ते पाहता सरकारही त्यासाठी राजी असल्याने आता यात अडसर येणार नाही असे दिसत आहे.

3. संचालक व्हायचं असेल तर नियम पाळा- अजित पवार

"बारामती बँकेवर जे संचालक म्हणून निवडून येतील त्यांनी स्वतःसाठी बँकेतून कर्ज घ्यायचे नाही आणि नातेवाईकांना देखील कर्ज घेऊ द्यायचं नाही. तसे असेल तरच निवडणुकीला उभा राहा", असा सज्जड दम अजित पवारांनी आज उमेदवारांना भरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज बारामतीतील राष्ट्रवादी भवनात कार्यकर्ता मेळावा घेतला आहे तेव्हा अजित पवार बोलत होते.

जर संचालक म्हणून निवडून आलात तर स्वतःसाठी आणि नातेवाईकांना बँकेतून कर्ज घेऊन देता येणार नाही. जर तसं असेल तरच बँकेच्या संचालकपदासाठी उभे राहा, असे आवाहन अजित पवारांनी इच्छुक उमेदवारांना केले आहे.

दि बारामती सहकार बँकेची पंचवार्षिक निवडणूक आहे. 15 जागांसाठी जवळपास राष्ट्रवादीच्या पॅनेल कडून 85 पेक्षा जास्त अर्ज आले आहेत. बारामती बँकेच्या राज्यभरात 36 शाखा आहेत. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

4. एसटी संप- शंभरहून अधिक आगार कार्यरत

पगारवाढीच्या निर्णयानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातील शंभरहून अधिक आगारांचं कामकाज सुरू झालं आहे.

सर्वसामान्य जनता तसंच शाळा तसंच महाविद्यालयात जाणारी मुलं यांना एसटी संपाचा फटका बसला होता. सोमवारी राज्यभरातील विविध आगारात सुमारे 19 हजार कर्मचारी रूजू झाले. 'न्यूज18 लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

सोमवारी 250 आगारांपैकी 105 आगारातून वाहतूक सुरु झाली आहे. दरम्यान, रविवारी 734 बसेसद्वारे सुमारे 1703 फेऱ्यांच्या माध्यमातून 1 लाख 4 हजार 800 प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. या वाहतूकीतून महामंडळाच्या तिजोरीत 76 लाख 30 हजार रूपयांची भर पडली आहे.

5. सातारा बँक राष्ट्रवादी काँग्रेसच्याच ताब्यात

सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडे राखलं आहे. भाजपचे आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांचं नाव सातारा बँकेच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील यांनी बाजी मारली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत.

अध्यक्षपदाच्या निवडीसाठी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत वेगळाच निर्णय झाला. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, शिवेंद्रराजे भोसले, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, नितीनकाका पाटील, प्रभाकर घार्गे उपस्थित होते. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

सुरुवातीपासूनच अध्यक्षपदासाठी शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावाला विरोध होत होता. शिवेंद्रराजे भोसले यांनी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र जिल्ह्यातून व राष्ट्रवादीमधूनच असलेला विरोध यामुळे शिवेंद्रसिंह यांचं नाव मागे पडलं.

शरद पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर आणि बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांच्यावरच पुढील निर्णयाची जबाबदारी सोपवली. रामराजेंनी शिवेंद्रराजेंची मनधरणी करत राष्ट्रवादीचाच संचालक अध्यक्ष बनवण्यात यश मिळवलं. उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची नियु्क्ती झाली.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)