कुंडलिक खांडे: गुटखा तस्करी प्रकरणात नाव आल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख बडतर्फ

कुंडलिक खांडे

फोटो स्रोत, Kundlik Khande

फोटो कॅप्शन, कुंडलिक खांडे
    • Author, योगेश लाठकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

बीड येथे गुटखा तस्करी आणि छुपी विक्री प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुखांचे नाव आल्यानंतर त्यांना पक्षातर्फे बाजूला करण्यात आले आहे. बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

राज्यात गुटखाबंदी असताना अंदाजे 35 लाख रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी बीड जिल्ह्यातील केज पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्रकरण कसं आलं उघडकीस?

एका छोट्या दुकानात गुटखा आला आहे, अशी टीप पोलिसांना मिळाली. तिथे कारवाई करताना एका मोठ्या गोदामाची माहिती पोलिसांनी मिळाली आणि पोलिसांच्या हाती लाखो रुपयांचा गुटखा लागला.

बीड जिल्ह्यातील केज येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत याना नांदुरघाट येथे एका दुकानात गुटका विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून तेथे छापा टाकण्यात आला. यावेळी दुकानात सुमारे दीड लाख रुपयांचा माल पोलिसांना आढळून आला.

ही कारवाई पूर्ण होईपर्यंत सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना बीड इमामपूर रोडवर एका गोदामात गुटख्याचा मोठा साठा असल्याची पक्की खबर मिळाली. लगोलग तेथेही पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी मात्र पोलिसांना विविध नाव असलेला गुटखा, टेम्पो, एक मोबाईल असा एकूण 32 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गुटखा जप्त करताना पोलीस अधिकारी

फोटो स्रोत, yogesh lathkar/bbc

फोटो कॅप्शन, गुटखा जप्त करताना पोलीस अधिकारी

ही कारवाई सुरू असताना त्याठिकाणी हजर असलेल्या महिलेस पोलिसांनी या मालाबाबत विचारपूस केली. तेव्हा तिने हा माल तिचे पती वसीम शेख आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा असल्याबत माहिती दिली.

या दोन्ही कारवाई नंतर पोलिसांनी केज पोलीस स्थानकांत 2 स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हा क्रमांक 553/21 मध्ये चंद्रकांत कानडे, महारुद्र मुळे, शेख वासिम आणि कुंडलिक खाडे यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 328, 272, 273 अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

'कुंडलिक खाडेचा माल आहे असं सांग'

सहाय्यक पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम हाती घेतली आहे. यातूनच केज आणि परिसरात दररोज पोलीस कारवाया होत आहेत. पण इमामपूर रोडवरील गोदामावर घातलेल्या छाप्यात थेट शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा संबंध असल्याचा पोलिसांनी दावा करत त्यांचे नाव आरोपीच्या रकान्यात टाकले आहे.

या गोदामावर पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या महिलेला एक कॉल आला. यावेळी तो कॉल स्पीकरवर टाकण्यात आला तेव्हा ती समोरील व्यक्ती म्हणाली, 'पोलिसांना हा माल कुंडलिक खाडेचा आहे हे सांगा आणि कारवाई न करता निघून जा.' अशी नोंद पोलिसांच्या कागदपत्रांत आहे.

'मला नाहक या प्रकरणात गोवण्यात आले' - कुंडलिक खांडे

गुटखा प्रकरणात आरोपी असलेले कुंडलिक खांडे यांनी मात्र त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

एका कार्यकर्त्याचा फोन आल्याने आपण घटनास्थळी गेलो होतो. आपला गुटख्याशी काहीही संबंध नाही. पण विनाकारण पोलिसांनी आपल्याला गोवले असल्याचं सांगितलं आहे.

कुंडलिक खांडे

फोटो स्रोत, Kundlik Khande

शिवसेनेने आता कुंडलिक खांडे याना जिल्हाप्रमुखपदाच्या जबाबदारीने तूर्त बाजूला केले आहे.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे करत आहेत.

याप्रकरणाचा पुढील तपास सुरू असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं बीबीसी मराठीशी त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात 2012 साली तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी गुटखा उत्पादन, वाहतूक आणि विक्रीवर बंदी घातली होती. तेव्हापासून आजतागायत राज्यात गुटखा बंदी आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)