परमबीर सिंहांनी कसाबचा मोबाईल नष्ट केला होता - निवृत्त ACP

परमबीर सिंह

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यातील दोषी अजमल कसाब याचा मोबाईल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 'नष्ट' केल्याचा आरोप माजी सहाय्यक पोलीस आयुक्त शमशेर खान पठाण यांनी केलाय. शमशेर खान पठाण हे मुंबईत पोलिसातच सेवेत होते.

शमशेर पठाण यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे यावर्षी जुलै महिन्यात लेखी तक्रार दिली होती. या प्रकरणाची चौकशी करून परमबीर सिंह यांच्याविरोधात आवश्यक कारवाई करण्याची मागणी पठाण यांनी केली होती.

शमशेर पठाण यांनी तक्रार जरी चार महिन्यांपूर्वी केली असली, तरी हे प्रकरण कालपासून (25 नोव्हेंबर) चर्चेत आलंय. कारण अनेक महिन्यांपासून गायब असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त मुंबई गुन्हे शाखेसमोर हजर झाले आणि हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं.

परमबीर सिंह खंडणी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेसमोर जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले होते.

याचवर्षी मार्च महिन्यात परमबीर सिंह यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आलं होतं. त्यानंतर हेमंत नगराळे यांची नियुक्ती पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली.

शमशेर पठाण यांनी तक्रारीत काय म्हटलं?

शमशेर पठाण यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय की, डीबी मार्ग पोलीस ठाण्याचे तत्कालीन एसआय एन. आरमाली यांनी माहिती दिली होती की, त्यांना कसाबकडे एक मोबाईल सापडला, जो कांबळे नामक हवालदाराला दिला होता.

आरोप करण्यात आलाय की, त्यावेळी दहशतवादविरोधी पथकाचे डीआयजी परमबीर सिंह होते आणि त्यांनीच कांबळेंकडून स्वत:कडे घेतला होता. त्यांनी तो मोबाईल 26/11 हल्ल्याची चौकशी करणारे अधिकारी रमेश महाले यांच्याकडे सोपवणं अपेक्षित होतं. मात्र, त्यांनी तो महत्त्वाचा पुरावा नष्ट केला.

परमबीर सिंह

परमबीर सिंह यांनी या आरोपांवर अद्याप कुठलीच प्रतिक्रिया दिली नाहीय.

दुसरीकडे, 26/11 हल्ला प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम ANI शी बोलताना म्हणाले, "माझ्याकडे याबाबत नीट माहिती नाहीय. मात्र, मला हे माहित आहे की, सुनावणीदरम्यान आमच्याकडे कसाबचा मोबाईल नव्हता. मोबाईल नसण्याबाबत तपासाशी संबंधित लोकच माहिती देऊ शकतील."

"मला हे माहिती आहे की, 10 हल्लेखोर पाच-पाचच्या गटात विभागले होते आणि प्रत्येक गटाकडे एक-एक मोबाईल होता. आमच्याकडे मोबाईल असता, तर आम्ही त्याच्या पाकिस्तानातील साथीदारांसोबतचे संबंध सिद्ध करू शकलो असतो," असंही निकम म्हणाले.

मुंबईत 13 वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्यात अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आलं होतं. 26 नोव्हेंबर 2008 रोजी हा हल्ला झाला होता आणि तो चार दिवस सुरू होता.

दोन फाईव्ह स्टार हॉटेल, एक हॉस्पिटल, रेल्वेस्थानक आणि एका ज्यू धर्मियांच्या केंद्रावर हल्ला केला होता. या हल्ल्यात 160 हून अधिक लोकांचा जीव गेला होता.

कसाब वगळता, त्याच्या इतर साथीदारांना ठार करण्यात पोलीस आणि लष्कराला यश आलं होतं.

सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. नोव्हेंबर 2012 मध्य कसाबला फाशी देण्यात आली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)