घराचं खोदकाम करताना चकाकला सोन्याचा तुकडा, नंतर पाहिलं तर सापडला एवढा मोठा खजिना

पोलिसांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सापडलेल्या खजिन्याचे फोटो शेअर केले आहेत.

फोटो स्रोत, Lokale Politie Dendermonde

फोटो कॅप्शन, पोलिसांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सापडलेल्या खजिन्याचे फोटो शेअर केले आहेत.
    • Author, निक बीक
    • Role, युरोप प्रतिनिधी आणि माया डेव्हिस
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

बेल्जियममधील ईस्ट फ्लँडर्समध्ये एका घराचं नुतनीकरण सुरू असताना कामगारांना भिंतीमध्ये सोन्याचा प्रचंड मोठा खजिना सापडला आहे. या खजिन्याची किंमत सुमारे 90 लाख युरो किंवा अंदाजे 98 कोटी रुपये आहे.

या भिंतीमध्ये सोन्याच्या विटा आणि नाणी सापडली आहेत.

स्थानिक माध्यमांनुसार, सांडपाण्याच्या ड्रेनेज लाईनसाठी खोदकाम करताना कामगारांना हा खजिना सापडला.

पण हा खजिना सापडल्यानंतर या सोन्याचा मालक कोण असेल, याबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. कामगार तसेच जागेची मालकी असलेल्या स्थानिक संस्थेला या खजिन्यावर दावा करण्याची संधी आहे.

याबाबत तपास सुरू केल्यानंतर लोकांनी आणखी खजिना शोधायला जाऊ नये, असा इशारा पोलिसांनी लोकांना दिला आहे. घराची कसून तपासणी करण्यात आली असून सर्व सोनं सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

एका इमारतीचं बांधकाम करत असताना कामगारांना हे सोनं सापडलं. त्यांच्यात एक 18 वर्षांचा विद्यार्थी होता. हा विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुटीत थोडे अतिरिक्त पैसे कमवण्यासाठी काम करत होता.

"सुरुवातीला आम्हाला विश्वासच बसला नाही आणि खूप धक्का बसला होता," असं कोबे नावाच्या विद्यार्थ्यानं बेल्जियमच्या सार्वजनिक प्रसारक व्हीआरटीला सांगितलं.

"सुरुवातीला मला वाटलं की ही युरोची नाणी आहेत. पण नंतर आम्हाला तिथं सोन्याचा एक तुकडाही दिसला. तेव्हाच आमच्या लक्षात आलं की हे काहीतरी मोठं आहे," असं तो म्हणाला.

अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, त्यांनी सोने सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

फोटो स्रोत, Lokale Politie Dendermonde

फोटो कॅप्शन, अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, त्यांनी सोने सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

यानंतर लगेचच त्यानं पोलिसांना याबद्दल माहिती दिली आणि हा खजिना स्वतःजवळ ठेवणं शक्य नसल्याचं सांगितलं.

"तिथं सोन्याची इतकी नाणी आणि बिस्किटं आहेत की तसं करणं जवळजवळ अशक्य आहे. शिवाय, ती चोरी ठरेल," असं साईट मॅनेजर मारिओ यांनी व्हीआरटीला सांगितलं.

कोबीनं सहमती दर्शवत, "90 लाख युरो, ही रक्कम लपवता येणार नाही," असं म्हटलं.

ज्या ठिकाणी सोनं सापडलं ती जागा सध्या CAW Oost-Vlaanderen या संस्थेच्या मालकीची आहे, डेंडरमोंडे प्रदेशातील लोकांना सामाजिक आणि कल्याणकारी मदत पुरवण्याचं काम ही संस्था करते.

संस्थेचे संचालक, गिर्ट हिलर्ट यांनी पहिली प्रतिक्रिया अत्यंत धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारी होती, असं सांगितलं.

या खजिन्याचा उपयोग भविष्यात संस्थेच्या कामाला पाठबळ देण्यासाठी आणि 'दररोज निर्माण होणारी मोठी गरज' भागवण्यासाठी केला जाऊ शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

स्थानिक पोलिसांनी लोकांना बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खजिना शोधण्यासाठी जाऊ नये असं आवाहन केलं आहे. पोलिसांनीही फेसबुकवर या खजिन्याचे फोटोही पोस्ट केले आहेत.

याठिकाणी सापडलेलं सोनं 'योग्य ठिकाणी' पोहोचेल आणि लोकांचं जीवन बदलेल, अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सोनं कुणाला मिळेल?

बेल्जियन कायद्यानुसार, मूळ मालकाला खजिन्यावर दावा करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी असतो.

मात्र, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या स्थानिक सरकारी वकिलांनी मालक कोण आहे, हे अद्याप समजलं नसल्याचं म्हटलं आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

कोणी पुढं आलं नाही, तर कायद्यानुसार दुसऱ्याच्या जमिनीवर लपवलेला खजिना शोधणारी व्यक्ती आणि जागेच्या मालकामध्ये विभागला जातो.

पण, या खजिन्याचा संबंध गुन्ह्याशी नाही हे सिद्ध झाल्यानंतरच तसं करता येईल.

सध्या बांधकाम व्यावसायिक आणि संस्था या दोघांनाही मालक सोमर येईपर्यंत 1823 दिवस वाट पाहावी लागू शकते. या काळात कोणी पुढं येऊन खजिना त्याचाच असल्याचं सिद्ध केलं नाही, तर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)