देशी दारू : गावठी दारू तयार करताना कोणत्या चुकीमुळं ती विषारी बनते?

    • Author, आभा चौधरी
    • Role, रसायन शास्त्रज्ञ
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

दारुबंदी लागू करण्याचा दावा करणाऱ्या बिहारच्या विविध जिल्ह्यांमध्ये दिवाळीनंतर विषारी दारूमुळं मृत्यू होणाऱ्यांचा आकडा वाढून 40 वर गेला आहे.

विषारी दारूमुळं झालेल्या या मृत्यूमुळं पुन्हा एकदा एक प्रश्न उपस्थित झाला आहे. तो म्हणजे, गावठी किंवा देशी दारू तयार करताना नेमक्या कोणत्या चुकीमुळं, ती दारू विषारी बनते.

गावठी दारू तयार करणाऱ्यांचा धंदा अगदीच नवा आहे किंवा विषारी दारूमुळं मृत्यू होण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे, असं नाही.

हा व्यवसाय जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून हे प्रकार सुरुच आहेत. देशातील विविध भागांमधून अनेकदा विषारू दारुमुळं लोकांच्या मृत्यूच्या बातम्या येत असतात.

देशी दारू जिला 'कच्ची दारू' देखील म्हटलं जातं, तिचं रासायनिक सत्य हे अगदीच सर्वसामान्य आहे.

जास्त नशा आणणारी दारु बनवण्याच्या नादामध्ये ती विषारी बनते. साधारणपणे ही दारू गुळ, मळी यापासून तयार केली जाते. पण यापासून जास्त नशा व्हावी आणि ती जास्त काळ राहावी म्हणून, यात युरिया आणि बेशरमाच्या झाडाची पानंही टाकली जातात.

मिथाइल अल्कोहोल

दारुमुळं अधिक नशा व्हावी म्हणून त्यात ऑक्सिटोसिन मिसळलं जातं. तेच दारू विषारी बनण्याचं आणि लोकांच्या मृत्यूचं कारण बनतं.

ऑक्सिटोसिनमुळं नपुंसकता आणि मज्जासंस्थेशी संबंधित अनेक भयंकर आजार होऊ शकतात, अशी माहितीही गेल्या काही वर्षांमध्ये ऑक्सिटोसिनबाबत पुढं आलेली आहे.

याच्या सेवनानं डोळ्यात जळजळ, खाज येणे, पोटात जळजळ असे त्रास होऊ शकतात. शिवाय यामुळं दृष्टी जाण्याचा धोकाही असतो.

या कच्च्या दारुमध्ये युरिया आणि ऑक्सिटोसिनसारखे रासायनिक पदार्थ मिसळल्यामुळं मिथाइल अल्कोहोल तयार होतं. तेच लोकांच्या मृत्यूचं कारण बनतं.

शास्त्रज्ञांच्या मते, मिथाइल शरिरात जाताच वेगानं रासायनिक प्रक्रिया होतात. त्यामुळं शरिरातील अंतर्गत अवयव काम करणं बंद करतात आणि लगेचच मृत्यू होतो.

असंतुलित मिश्रण

काही लोकांच्या शरिरात ही रासायनिक प्रक्रिया हळू-हळू होते, त्यामुळं त्यांना वाचवण्यात यश येतं.

गावठी दारू म्हणून विक्री केली जाणारी दारू 95 टक्के शुद्ध म्हणजे भेसळ नसलेलं अल्कोहोल असतं. त्याला इथेनॉलही म्हणतात.

ही दारु ऊसाचा रस, ग्लुकोज, नवसागर, मोहाची फुलं, बटाटे, तांदूळ, जव, मका अशा अनेक स्टार्च असलेल्या पदार्थांचं फर्मन्टेशन (आंबण्याची किंवा किण्वन प्रक्रिया) करुन तयार केलं जातं.

इथेनॉल अधिक नशा देणारं तयार करण्यासाठी व्यावसायिक त्यात मिथेनॉल मिसळतात.

यात 'काष्ठ अल्कोहोल', 'काष्ठ नॅफ्था' नावाने प्रसिद्ध असलेलं मिथेनॉलच्या मिश्रणाचं प्रमाण बिघडल्यानं दारू विषारी बनत असते.

मिथेनॉल हे विषारी द्रव

मिथेनॉल रसायनशास्त्रातील सर्वांत सर्वसामान्य अल्कोहोल आहे. साधारण तापमानात ते द्रव स्वरुपात असतं.

त्याचा वापर अँटिफ्रिझर (फ्रीझिंग पॉइंट कमी करण्यासाठी कोणत्याही कुलिंग सिस्टीममध्ये पाण्यासह मिसळलं जाणारं लिक्विड) म्हणून, इतर पदार्थांचं मिश्रण तयार करण्यासाठी इंधनाच्या रुपात वापरलं जातं.

हा एक रंगहीन आणि ज्वलनशील द्रव पदार्थ आहे. त्याचा गंध इथेनॉल (पिण्यासाठी वापरलं जाणारं अल्कोहोल) सारखाच असतो.

पण मिथेनॉल हे विषारी असतं आणि ते सेवन करण्यासाठी नसतं, हे लक्षात असायला हवं. त्याच्या सेवनानं मृत्यू होऊ शकतो आणि दृष्टी गमावण्याचा धोकाही असतो.

इथेनॉलमध्ये इतर पदार्थांत मिसळण्याची चांगली क्षमता असल्याने त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

त्याचा वापर वॉर्निश, पॉलिश, औषधांचे मिश्रण, ईथर, क्लोरोफॉर्म, कृत्रिम रंग, पारदर्शक साबण, अत्तर आणि फळांचे सुगंध तसंच इतर केमिकल कंपाऊंड तयार करण्यासाठी केला जातो.

सेवनासाठी अनेक प्रकारची दारू, जखमा स्वच्छ करताना बॅक्टेरिया किलर म्हणून आणि प्रयोगशाळांमध्ये सॉलव्हंटच्या रुपात ते कामी येतं.

मृत्यू नेमका कसा होतो?

विषारी दारु प्यायल्यानंतर शरिर कशा पद्धतीनं प्रतिक्रिया देतं?

या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर अजित श्रीवास्तव यांनी दिलं.

ते सांगतात, "सर्वसाधारणपणे दारू म्हणजे इथाइल अल्कोहोल असतं. तर विषारी दारू मिथाइल अल्कोहोल असते. कोणतंही अल्कोहोल शरिरात लिव्हरच्या माध्यमातून एल्डिहाइडमध्ये रुपांतरीत होतं. पण मिथाइल अल्कोहोल फॉर्मेल्डाइड नावाच्या विषामध्ये रुपांतरीत होतं.

"हे विष डोळ्यांवर सर्वाधिक परिणाम करतं. आंधळेपणा हे याचं पहिलं लक्षण आहे. एखाद्यानं अशी दारू खूप जास्त प्यायली तर त्यामुळं फॉर्मिक अॅसिड नावाचा विषारी पदार्थ शरिरात तयार होऊ लागतो. त्यामुळं मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो."

विशेष म्हणजे विषारी दारुवर उपचारही दारुचा वापर करुनच होतो.

"मिथाइल अल्कोहोलच्या विषावरील उपचार इथाइल अल्कोहोल आहे. विषारी दारूचा अँटिडोट म्हणून काही गोळयाही मिळतात. मात्र, भारतात त्याची उपलब्धता कमी आहे," असं डॉक्टर अजित श्रीवास्तव म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.