IPL 2021: रविचंद्रन अश्विनचं कृत्य योग्य की मॉर्गन-साऊदीचं म्हणणं खरं, सोशल मीडियावर चर्चेला ऊत

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

कोलकाता-दिल्ली मॅचदरम्यान ऋषभ पंतच्या बॅटला लागून डिफ्लेक्ट झालेल्या बॉलवर सिंगल घेण्यावरून परवाच्या मॅचमध्ये रवीचंद्रन अश्विन आणि आयोन मॉर्गन- टीम साऊदी यांच्यात वाद झाला होता.

हे प्रकरण आता वाढत असून सोशल मीडियावर यावरून दोन गट निर्माण झाल्यांचं दिसून येत आहे.

नेमकं प्रकरण काय?

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सोमवारी (28 सप्टेंबर) सामना झाला.

या सामन्यात दिल्लीच्या दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत आणि रविचंद्रन अश्विन हे फलंदाजीसाठी मैदानावर होते. त्यावेळी राहुल त्रिपाठीने फेकलेला चेंडू थेट ऋषभ पंतच्या बॅटला लागून उडाला.

अश्विनने यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार आयोन मॉर्गन आणि गोलंदाज टीम साऊदीने त्यावर आक्षेप घेतला.

यामुळे अश्विन संतप्त झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्याचा मॉर्गन आणि साऊदी यांच्याशी वादही झाल्याचं पाहायला मिलालं. अखेरीस, दिनेश कार्तिकने त्यांच्यातील भांडण सोडवलं.

मात्र, ऑस्ट्रेलियन मीडिया, इंग्रजी मीडियाने स्पिरिट ऑफ द गेम फॉलो न केल्याप्रकरणी अश्विनला व्हिलन ठरवलं आहे. अश्विनने सीरिज ऑफ ट्वीट्स करून त्याची बाजू मांडली आहे.

वर्ल्डकप 2019 मध्ये बेन स्टोक्सच्या बॅटला बॉल डिफ्लेक्ट होऊन गेला आणि इंग्लंडला 6 रन्स मिळाले. त्यावेळी इंग्लंडचं, मॉर्गनचं स्पिरिट कुठे गेलं असा सवाल लोक करत आहेत. वीरेंद्र सेहवागने याच घटनेचा संदर्भ देत ट्वीट केलं आहे.

दिल्ली कॅपिटल्सचे ओनर पार्थ जिंदालनेही अश्विनच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे.

अश्विनने जोस बटलरला मंकडेड केलं होतं. त्यावेळीही स्पिरीट ऑफ क्रिकेटचा मुद्दा निघाला होता.

2019 मध्ये नेमकं काय घडलं होतं?

जयपूर इथल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या बॉलर्सची यथेच्छ धुलाई करत होता.

किंग्ज इलेव्हन पंजाबने सुरूवातीला बॅटिंग करताना 184 धावांची मजल मारली होती. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 12.4 ओव्हर्समध्ये 1 बाद 108 अशा सुस्थितीत होता.

त्याक्षणी राजस्थानला जिंकण्यासाठी 7.2 ओव्हर्समध्ये म्हणजेच 44 चेंडूत 77 रन्स हव्या होत्या. हे करण्यासाठी त्यांच्या हातात 9 विकेट्स होत्या. विजयाचं पारडं राजस्थानच्या बाजूने झुकलेलं आहे असं चित्र होतं.

पाचव्या चेंडूवर अश्विनने रनअप सुरू केला. अंपायरच्या इथे येताच त्याने बाजूला बघितलं. त्यावेळी बटलर क्रीझच्या बाहेर असल्याचं त्याच्या लक्षात आलं. अश्विनने झटकन रनअप थांबवून बटलरला आऊट केलं.

अश्विसनह किंग्ज इलेव्हन पंजाबच्या खेळाडूंनी अपील केलं. तू खरंच अपील करतो आहेस का? असं बटलरने अश्विनला विचारलं. अश्विन तात्काळ हो म्हणाला.

तू अपील कसं करू शकतोस असं बटलरने विचारलं. त्यावर इट्स माय स्पेस असं अश्विनने प्रत्युत्तर दिलं. अश्विनने मंकडेड आऊट केल्याने बटलर नाराज झाला.

मैदानावरील अंपायर्सनी निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवला. अश्विनने बेल्स उडवल्या त्यावेळी बटलर क्रीझमध्ये नसल्याचं स्पष्ट होताच थर्ड अंपायर ब्रुस ऑक्सनफर्ड यांनी बटलर बाद असल्याचा निर्णय दिला.

नाराजी व्यक्त करत बटलर पॅव्हेलियनमध्ये परतला. बटलरने 43 चेंडूत 10 फोर आणि 2 सिक्सेससह 69 धावांची खेळी केली.

"युक्तिवाद करण्याचा प्रश्नच नाही. मी जे केलं ती रिफ्लेक्स अॅक्शन होती. मी जेमतेम रनअपला सुरुवात केली होती, त्याचवेळी त्याने क्रीझ सोडलं होतं. त्यामुळे आऊट करणं साहजिक होतं. तो माझ्याकडे बघत देखील नव्हता. तो सहज क्रीझ सोडून पुढे गेला होता," असं स्पष्टीकरण अश्विनने त्यावेळी दिलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)