नुसरत जहाँ यांनी मुलाला नाही दिलं वडिलांचं नाव, 'सिंगल पेरेंट' राहण्याचा निर्णय?

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांना गुरुवारी (26 ऑगस्ट) मुलगा झाला. नुसरत यांनी मुलाच्या जन्मानंतर एक महत्त्वाचा निर्णय घेतला, ज्यामुळे उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

नुसरत यांनी मुलाला वडिलांचं नाव न देण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकत्यातील अनेक एकल मातांनी नुसरत यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र काही जणांनी नुसरत यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील वादांमुळे हा निर्णय घेतला का, असाही प्रश्न उपस्थित केला आहे.

काही महिन्यांपूर्वीच नुसरत यांनी पती निखिल जैन यांच्यावर वेगवेगळे आरोप करत, आपलं लग्न कायदेशीररित्या वैध नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

बंगाली सिनेअभिनेत्री नुसरत जहाँ दोन वर्षांपूर्वी खूप चर्चेत होत्या. कारण राजकारणात पाऊल टाकत त्यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावरून लढवली आणि बशीरहाट मतदारसंघातून त्या मोठ्या मताधिक्याने जिंकल्या.

त्यानंतर महिनाभरातच त्यांनी निखिल जैन या मारवाडी व्यापाऱ्यासोबत तुर्कीमध्ये लग्न केलं. मात्र अवघ्या काही महिन्यांतच या दोघांमधील मतभेद समोर आले.

एखाद्या सिनेमाची कथा वाटावी अशा गोष्टी या प्रकरणात घडल्या.

लग्न वैध नसल्याचा नुसरत यांचा दावा

एकीकडे नुसरत आणि निखिल जैन यांच्यातील बेबनावाच्या बातम्या समोर येत होत्या, तर दुसरीकडे नुसरत यांचं नाव बंगाली अभिनेते यश दासगुप्ता यांच्यासोबत जोडलं जात होतं.

दरम्यान, नुसरत गर्भवती असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. नुसरत आणि निखिल अनेक महिन्यांपासून विभक्त राहत असल्याने विविध शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या.

या प्रश्नाचं उत्तर शोधताना या जोडप्याच्या खासगी आयुष्यातल्या काही गोष्टी समोर आल्या आणि खुद्द नुसरत यांनीच आपल्या आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला.

आपलं निखिलसोबत लग्न झालं नसल्याचा दावा नुसरतनी केला. हे लग्न नव्हतं तर लिव्ह - इन रिलेशनशिप होतं, त्यामुळे घटस्फोटाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी म्हटलं. आपण पूर्वीच विभक्त झाल्याचंही त्यांनी म्हटलं.

भारतामध्ये दोन धर्मांमधल्या लग्नांना विशेष विवाह कायद्यानुसार मान्यता मिळणं गरजेचं असतं, पण आपण असं न केल्याने निखिल यांच्यासोबतचं आपलं लग्न कधीच वैध नव्हतं, असं नुसरत जहाँ एका निवेदनातून स्पष्ट केलं.

नुसरत म्हणतात, "हे लग्न कायदेशीररित्या वैध नसल्याने घटस्फोट घेण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही खूप आधीच वेगळे झालो. पण मी याबद्दल काही बोलले नाही कारण मला या गोष्टी खासगी ठेवायच्या होत्या."

निखिल यांचं म्हणणं काय होतं?

आपल्या बँक खात्यांमधून बेकायदेशीरपण पैसे काढण्यात आल्याचा आरोपही नुसरत यांनी निखिल यांचं नाव न घेता केला.

निखिल जैन हे कोलकात्यातले एक व्यावसायिक असून लग्नाच्या वर्षभर आधी कोलकात्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात या दोघांची भेट झाली होती.

नुसरत यांच्या गर्भवती असण्याबद्दल आपल्याला माहिती नसून दीर्घ काळापासून आपण नुसरतच्या संपर्कात नसल्याचं निखिल यांनी एका स्थानिक टीव्ही चॅनलशी बोलताना सांगितलं होतं.

नुसरतपासून वेगळं होण्यासाठीचा अर्ज आपण कोलकात्यामध्ये दाखल केला असून हे प्रकरण कोर्टात असल्याने निखिल यांनी पत्रकारांना यापेक्षा अधिक काही सांगता येणार नसल्याचं म्हटलं.

ते म्हणाले, " गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपासूनच (2020) मी नुसरतपासून वेगळा राहतोय. नुसरतला दुसऱ्या कोणासोबत रहायचं असल्याचं मला ज्या दिवशी समजलं, त्याच दिवशी मी दिवाणी खटला दाखल केला होता. लग्नाची नोंदणी न केल्याने मी हे लग्न बरखास्त करण्यात यावं, असं अपील केलं आहे. जुलैमध्ये या प्रकरणाची सुनावणी होईल."

लोकसभेपर्यंत पोहोचला होता वाद

तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांच्या लग्नावरून सुरू झालेला वाद आता लोकसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचला होता. या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी भाजप खासदाराने केली होती.

हे प्रकरण लोकसभेच्या 'एथिक्स कमिटी'कडे तपासासाठी पाठवण्यात यावं अशी मागणी भाजपच्या खासदार संघमित्रा मौर्य यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून केली

नुसरत जहाँ यांच्या 'अवैध आणि अनैतिक' वागण्याची चौकशी करून त्यानंतर कारवाई करण्यात यावी असं संघमित्रा यांनी आपल्या पत्रात म्हटलं.

संघमित्रा मौर्य यांनी म्हटलं होतं, "आपण विवाहित असून पतीचं नाव निखिल जैन असल्याचं तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी लोकसभेला दिलेल्या बायोडेटामध्ये म्हटलंय. नुसरत जहाँ रूही जैन या नावाने त्यांनी संसदेची शपथ घेतली होती आणि आता त्या म्हणतायत की, त्यांचं लग्न वैध नाही. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)