रिया चक्रवर्ती : सामाजिक मुद्द्यांवर परखड मतं मांडणारी वादग्रस्त अभिनेत्री

    • Author, वंदना
    • Role, संपादक(TV) , भारतीय भाषा, बीबीसी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

"जीवनात माझा उद्देश केवळ जगत राहणं हा नाही तर उत्साहानं आणि आनंदानं जीवन जगणं हा आहे."

रिया चक्रवर्तीनं एप्रिल 2020 मध्ये इन्स्टाग्राम पोस्टमध्ये असं लिहिलं होतं. त्यानंतरच्या एका वर्षात तिच्याबरोबर असं काहीतरी घडेल हे तेव्हा कुणाला वाटलंही नसेल.

जून 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रियाच्या जीवनात जे काही घडलं, ज्या प्रकारचे गंभीर आरोप तिच्यावर झाले आणि ती तुरुंगात गेली, या सर्व घटनांनंतर ती खरंच फक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करत होती.

पण आता हळूहळू ती पुन्हा तिच्या पद्धतीनं जीवन जगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर रियाचा पहिला चित्रपट चेहरे रिलीज झाला आहे.

मात्र रियावरचे आरोप चुकीचे ठरले आहेत, असंही नाही. पोलिसांचा तपास अजूनही सुरू असून, तिच्याबाबत अजूनही अनेक प्रश्न कायम आहेत.

गेल्यावर्षी ती दररोज माध्यमांच्या बातम्यामध्ये झळकत होती. तिच्यावर आरोप झाले नसतील असा दिवसच तेव्हा उगवत नव्हता. रियानं 15 कोटी रुपयांची हेराफेरी केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी केला.

ड्रग्स प्रकरणात अटक झाली. अनेक लोकांनी दोषी ठरवून टाकलं. रियाचीच नव्हे तर तिच्या घरी पिझ्झा डिलिव्हरीसाठी येणाऱ्याचीही मीडियानं चौकशी केली.

आरोप होते तसेच आहेत. तपास सुरू आहे, पण गेल्या एका वर्षात काही गोष्टी नक्कीच बदलल्या आहेत.

गेल्या वर्षी रियामुळे माध्यमांमध्ये जे काही वातावरण पाहायला मिळालं होतं. तोच मीडिया आता रियाचा उल्लेख करायलाही तयार नाही.

या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा चेहरे या चित्रपटाचा उल्लेख सुरू झाला तेव्हा त्यात रियाचा उल्लेखही करण्यात आला नाही. बहुतांश लोकांनी मौन धारण केलं. पण आता ती चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही दिसत आहे आणि चित्रपटाचे कलाकार, दिग्दर्शक हेदेखील विविध व्यासपीठांवर रियाला साथ देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

उदाहरण द्यायचं झाल्यास अभिनेता इम्रान हाश्मीनं क्विंटशी बोलताना रियाच्या मीडिया ट्रायलवर प्रश्न उपस्थित केले.

गेल्या काही दिवसांत रिया जवळपास मीडियासमोर आलेलीच नाही. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी लोक रियाला ओळखत तर होते, पण कुणालाही तेव्हा तिच्यात एवढा रस नव्हता.

त्यामुळे सुशांत वादाच्या पलिकडे विचार करता, तिचे विचार नेमके कसं आहेत. तिला काय आवडायचं याचा अंदाज लावणंही कठीण आहे.

पण सोशल मीडियाच्या काळामध्ये याठिकाणी केलेल्या पोस्टच्या माध्यमातून काही प्रमाणात का होईना, एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेण्याची संधी नक्कीच मिळते.

ट्विटर पाहता 16 जुलै 2020 नंतर तिच्या अकाऊंटवर शांतता दिसते. पण त्यापूर्वी तसं नव्हतं. सुशांतपासून ते तिचे चित्रपट आणि फोटोशूट याबाबत रिया अगदी मनमोकळेपणानं पोस्ट टाकायची.

ग्लॅमरच्या पलिकडे विचार करता जगातिल इतर मुद्द्यांवर तिचे विचारही समोर येत होते. 26 फेब्रुवारी 2020 मध्ये रियानं लिहिलं होतं, "आपले नेते काय घडतंय यापासून किती अनभिज्ञ आहेत. दिल्ली जळतेय आणि ते शांतपणे चहाचा आनंद घेत आहेत." हा काळ दिल्लीत दंगली भडकल्या तेव्हाचा होता.

किंवा तिची 15 एप्रिलची ही पोस्ट पाहा. "पोलिस कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांनी मनाला वेदना झाल्या आहेत. ते आपल्यासाठीच काम करत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस आपल्यासाठी काम करत आहेत. त्यांचा अपमान करण्याऐवजी त्यांचा उत्साह वाढवण्याची गरज आहे."

7 जानेवारी 2020 ची तिची पोस्टही लक्ष देण्यासारखी आहे. रियानं जेएनयू आणि एएमयूच्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीवर पोस्ट केली होती. "निरपराध मुलं आणि निशस्त्र शिक्षक... आता उद्या तुमच्या आणि माझ्यावर वेळ येईल. भारतात कोण सुरक्षित आहे? आपल्यापैकी कुणीही नाही!"

त्याआधी रियानं 2019 मध्ये डॉक्टर प्रियंका रेड्डीच्या कथित बलात्कार आणि हत्येनंतर पोस्ट केली होती. "आपल्या देशात केवळ राजकारण होतं. आपली सरकारं आपसांत भांडणातच व्यग्र आहेत. आणि पोलिस केवळ ही आमची हद्द नाही एवढंच म्हणतात, या सर्वासाठी मला माफ कर," असं तिनं या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

या भूतकाळात जाण्याचा उद्देश हा सुशांत सिंह राजपूतच्या शिवाय इतर दृष्टीकोनातून रियाला समजून घेण्याचा प्रयत्न करणं हा आहे.

रियाच्या या विचारांशी काही जण सहमत किंवा असहमत असू शकतात. पण जगातील सर्व सामाजिक किंवा राजकीय मुद्द्यांवर स्वतःचं मत असणारी अशी रिया आहे. विशेष म्हणजे ती ही मतं परखडपणे मांडत असेल. लहान असली तरी रियाची स्वतंत्र अशी या वादांपासून दूर अशी एक ओळख होती.

पण सुशांतच्या मृत्यूनंतर सगळे रियाला ओळखू लागले. पण ती ओळख वाद आणि आरोपांचा वेढा असलेली होती. आताही तशीच स्थिती आहे.

रियाचं बॉलिवूड करिअर गेल्यावर्षीपर्यंत फार जोमात होतं असंही नाही.

रियानं तिच्या करिअरची सुरुवात 2009 मध्ये एमटीव्हीवरील रियलिटी शो टीन दिवामधून केली होती. 2012 मध्ये तिनं पहिला तेलुगू चित्रपट तुनिगा तुनिगा (Tuneega Tuneega)मध्ये काम केलं आणि 2013 मध्ये पहिला बॉलिवूड चित्रपट 'मेरे डॅड की मारुती' मध्ये काम केलं.

तेव्हापासून आतापर्यंत रिया हिंदी चित्रपटांच्या बड्या नावांच्या यादीत स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. असं असतानाच 2020 मध्ये जे काही घडलं त्यानं सगळंच बदलून गेलं.

रिया चक्रवर्ती दोषी आहे का? तिनं काही चुकीचं केलं आहे की तिच्याबरोबर काही चुकीचं घडलं? सुशांतच्या मृत्यूच्या एका वर्षापेक्षा अधिक काळानंतरही हे प्रश्न अजूनही कायम आहेत आणि तिच्यावरील आरोप गंभीर आहेत.

पण ज्या रियाचं जीवन जणू एका ठिकाणी थांबलं होतं, ते आता हळूहळू पुन्हा मार्गावर येताना दिसत आहे, हे मात्र नक्की. इन्स्टाग्रामवर तिच्या पोस्ट येतात कधी स्वतःबद्दल तर कधी सुशांतबद्दल.

ज्या चेहऱ्याला यावर्षाच्या सुरुवातीला पोस्टरवरही स्थान मिळालं नव्हतं. त्याच चेहऱ्याला चित्रपट रिलीज होण्यापूर्वी स्थान मिळालं आहे.

चित्रपट रिलीज होत असताना रियाचा विरोध करणारे सोशल मीडियावर Boycott Bollywood सारखे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. मात्र रियाचे दिग्दर्शक आणि सहकलाकार तिच्याबरोबर उभे असल्याचं पाहायला मिळत आहे.

चित्रपट क्षेत्रात अनेक उदाहरणं आहेत. संजय दत्त, सलमान खान, शाइनी आहुजा - या सर्वांवर कोर्टात खटले सुरू आहेत आणि त्या सर्वांचे परिणामही वेगवेगळे झाले आहेत.

आता कोर्टाचा निर्णय आल्यानंतर निर्दोष मुक्त केल्यानंतर किंवा दोषी ठरवल्यानंतर रियाचं जीवन नवं वळण घेईल हे नक्की पण ते कोणत्या दिशेला असेल हे सांगणं कठीण आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)